सर्वाधिक २०५ बलात्कारासंबंधी गुन्हे
पणजी, ८ फेब्रुवारी (वार्ता.) – गोव्यात वर्ष २०२३ आणि २०२४ मध्ये महिलांवरील बलात्कार, विनयभंग, अपहरण आणि अन्य अत्याचार यांसंबंधी ६५३ गुन्हे नोंद झालेले आहेत. यामधील २०५ गुन्हे हे बलात्कारासंबंधी आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ७ फेब्रुवारी या दिवशी विधानसभेत एका लेखी उत्तरात दिली. काँग्रेसचे हळदोणाचे आमदार कार्लुस फेरेरा यांनी याविषयी विधानसभेत अतारांकित लेखी प्रश्न विचारला होता.
उत्तर देतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘वर्ष २०२३ मध्ये बलात्काराचे ९७, छेडछाड १०७, विनयभंग २५, तर अपहरण आणि अन्य प्रकारच्या अत्याचारासंबंधी ५९ मिळून एकूण २८८ गुन्हे नोंद झालेले आहेत. वर्ष २०२४ मध्ये बलात्काराचे १०८, छेडछाड १३३, विनयभंग ३८, तर अपहरण आणि अन्य प्रकारच्या अत्याचारासंबंधी ८६ मिळून एकूण ३६५ गुन्हे नोंद झालेले आहेत. यामधील ५ प्रकरणांमध्ये न्यायालयाने संशयितांना शिक्षा ठोठावली आहे, तर ६ प्रकरणांमध्ये संशयितांची पुराव्याच्या अभावी निर्दाेष सुटका झालेली आहे. एकूण गुन्ह्यांमधील ३९८ गुन्ह्यांची सुनावणी न्यायालयात चालू आहे. ३ गुन्हे न्यायालयाने रहित केले आहेत, तर पोलिसांनी ११३ गुन्ह्यांमध्ये न्यायालयात अंतिम अहवाल सादर केला आहे. १२५ गुन्ह्यांचे अन्वेषण पोलीस करत आहेत.’’ (ही आकडेवारी महिलांसंबंधी सर्व प्रकारच्या गुन्ह्यांत झालेली वाढ दर्शवते, तसेच वर्षभरात ३६५ गुन्हे म्हणजे प्रतिदिन महिलांशी संबंधित १ गुन्हा नोंद होतो. गुन्ह्यांतील आरोपींना त्वरित शिक्षा होण्याचे प्रमाणही अल्प आहे. त्यामुळे यंत्रणेत पालट करणे आवश्यक ठरते ! – संपादक)
गोमंतकीय महिलेची विदेशात तस्करी केल्याच्या प्रकरणी अक्रम शेख कह्यात
पणजी – नोकरीचे आमीष दाखवून एका गोमंतकीय महिलेची मस्कत येथे तस्करी केल्याच्या प्रकरणी गोवा पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने आंध्रप्रदेश येथील रहिवासी असलेला अक्रम शेख याला चेन्नई येथून कह्यात घेतले आहे. या प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने यापूर्वी अन्य २ संशयितांना कह्यात घेतले आहे. अन्य एका प्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीवरून गुन्हे अन्वेषण विभागाने मडगाव येथील रहिवासी तथा संशयित सचिन जोगळेकर (वय ५२ वर्षे)
याला ‘बाल अश्लील साहित्य’ समवेत बाळगल्याच्या प्रकरणी कह्यात घेतले.