दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘ए.पी.एम्.सी. मार्केट परिसरात वाहन ठेवण्याच्या शुल्काची बेकायदा वसुली’ या मथळ्याखाली दोनदा वृत्ते प्रसिद्ध करण्यात आली होती.

नवी मुंबई, ८ फेब्रुवारी (वार्ता.) – नवी मुंबई महापालिकेच्या नावाच्या बेकायदेशीरपणे पावत्या बनवून वाहनतळाच्या शुल्काची वसुली करणार्या अमर ढावरे याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी ए.पी.एम्.सी. पोलीस ठाण्यात शासकीय नावाचा गैरवापर करून खंडणी वसूल केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता. अमर हा तुर्भे गाव येथे रहातो.
१. याची नोंद घेत नवी मुंबई महानगरपालिकेचे मालमत्ता विभागाचे उपायुक्त भागवत डोईफोडे यांनी या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले होते. गुन्हा नोंद झाल्यानंतर अधिकच्या अन्वेषणात अमर याला अटक करण्यात आली. मुख्य सूत्रधाराचा पोलीस शोध घेत आहेत.
२. बाजाराच्या जवळचे काही रस्ते महापालिकेने ‘पे अँड पार्किंग’साठी दिलेले नसतांनाही काही जण तेथे बेकायदेशीरपणे वाहन ठेवण्याचे शुल्क वसूल करत होते. पैसे न दिल्यास ठेकेदाराची मुले रात्रीच्या वेळी गाड्यांच्या टायरमधील हवा सोडून देणे, ट्रकच्या काचा फोडून चालकांचे भ्रमणभाष, पैसे चोरून नेणे, चालकाला मारहाण करणे असे प्रकार करत होती. वसुलीचा हा आकडा महिन्याला ५ लाख रुपयांहून अधिक होता.
३. महापालिकेने जी.टी. रौंदळे या ठेकेदाराला वाहन ठेवण्याच्या शुक्ल वसुलीचा ठेका दिला आहे; पण तो नाममात्र असून ढावरे हा गेल्या १५ वर्षांपासून या ठेकेदाराकडे शुक्ल वसुलीचे काम करतो.
संपादकीय भूमिकाअशांकडून आतापर्यंत केलेल्या वसुलीचे पैसे व्याजासह वसूल करायला हवेत ! |