भारतात ऋषी परंपरा पुष्कळ प्राचीन काळापासून चालू आहे. साधू संन्याशांची परंपराही अतिशय जुनी असल्याचे मानतात. भगवान महावीर यांच्या जीवनचरित्रात नागा साधूच्या मार्गदर्शनाचा उल्लेख येतो; मात्र हे सर्व साधू संन्यासी स्वयंप्रेरणेने देशाच्या विविध भागात पर्वत, गुहा, जंगल यांमधून कार्यरत असतात. त्यांचे संघटित स्वरूपातील दर्शन सर्वसामान्यांना होत नसे. इसवी सनाच्या प्रारंभीच्या काळात भारतात सर्वत्र बौद्ध संप्रदायाचा प्रसार झालेला होता. वैदिक संस्कृतीवर कठोर आघात होत होते. सामाजिक विषमता, तसेच अकर्मण्यवाद शिगेला पोचला होता, अशा वेळी आद्यशंकराचार्यांचा उदय झाला. त्यांनी अद्वैत चिंतनाचा देशभर प्रचार केला. सामाजिक एकात्मता साधण्याच्या दृष्टीने दैदिप्यमान कार्य केले. त्यांच्या कार्याचाच एक भाग म्हणून त्यांनी देशाच्या चारही दिशांना धर्मपिठांची स्थापना केली. द्वारकेमध्ये शारदा पीठ, पुरी येथे गोवर्धन पीठ, बद्रीनाथ येथे ज्योतिष पीठ, मैसुरू येथे शृंगेरी पीठ स्थापले. या पिठांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीच्या संरक्षणाचे, राष्ट्रीय ऐक्य साधण्याचे आणि एकात्मभाव सुदृढ करण्याचे प्रयत्न होऊ लागले. विखुरलेल्या साधू सज्जनांना एकत्रित आणि संघटित करण्याचे प्रयत्नही होऊ लागले. सामाजिक ऐक्य आणि भक्ती मार्गाची पुनःस्थापना करण्याचा एक भाग म्हणून देशातील हरिद्वार, प्रयाग, उज्जैन आणि नाशिक-त्र्यंबकेश्वर या ४ मुख्य तीर्थक्षेत्री कुंभमेळ्याचे संघटित स्वरूपातील आयोजन केले जाऊ लागले. कुंभमेळ्याच्या वेळी देशभरातील सर्व साधू-संन्यासी एकत्र येऊन आपली अंतर्गत रचना निश्चित करू लागले, भावी कार्याची योजना आखू लागले. कुंभमेळ्याचे स्थान, हे सर्व साधूसंन्यासांच्या धार्मिक चर्चेचे, तसेच गतीविधीच्या निश्चितीचे केंद्र झाले. दीर्घकालीन परकीय आक्रमणाच्या काळात साधू-संन्याशांचे एकत्र येणे, ही गोष्ट सोपी नव्हती. पर्वणीचे निमित्त साधून धार्मिक जागृती आणि सामाजिक बळकटी यांसाठीचे प्रयत्न होत असत. मठ, आखाडे यांची ती परंपरा आजतागायत चालू आहे.
(साभार : मासिक ‘सांस्कृतिक वार्तापत्र’, ‘महाकुंभ’ विशेषांक, ऑगस्ट २००३)