कुंभमेळ्यातील अन्नछत्रे : जगाच्या पाठीवरील एकमेवाद्वितीय व्यवस्था !

महाकुंभपर्वासाठी प्रयागराजमध्ये कुंभक्षेत्रात कोट्यवधी भाविक आले. या सर्व भाविकांची न्याहारी आणि भोजन यांची व्यवस्था शासनाद्वारे नव्हे, तर आखाडे अन् आध्यात्मिक संस्था यांद्वारे केली जात आहे. अमृतस्नानाच्या कालावधीत तर महाकुंभक्षेत्रात येणार्‍या भाविकांची संख्या काही कोटींमध्ये होती. या सर्वांची भोजनाची व्यवस्था, म्हणजे मोठे दिव्यच आहे. घरी पाहुणे आल्यावर त्यांच्या भोजनाची सिद्धता करण्यात घरातील गृहणींची किती धावपळ होते. विवाहादी समारंभाच्या वेळी काही शेकडा आलेल्या पाहुण्यांची व्यवस्था करतांना यजमानांची किती त्रेधातिरपीट होते. याचा अनुभव प्रत्येकाला कधी ना कधी येतो. मग कुंभमेळ्यात नियमित लाखो भाविकांच्या भोजनाची व्यवस्था कशी होते ? प्रशासकीय यंत्रणेचे प्रत्यक्षपणे कोणतेही साहाय्य नसतांना लाखो-कोट्यवधी लोकांची होणारी भोजनव्यवस्था हा विषय कुतुहलाचा, तसेच अभ्यासाचाही आहे. एवढ्या मोठ्या जनसमुदायाची सलग १ मासाहून अधिक काळ आणि प्रशासकीय यंत्रणेच्या प्रत्यक्ष साहाय्याविना भोजनाची व्यवस्था याचे जगाच्या पाठीवर अन्य एकही उदाहरण देता येणार नाही. हिंदु धर्माला अफूची गोळी, मलेरिया म्हणणार्‍यांची हिंदु धर्म समजून घेण्याची पात्रता नाही. त्यांनी किमान जिज्ञासा म्हणून तरी महाकुंभमधील या भोजनव्यवस्थेचा अभ्यास करावा, म्हणजे तरी त्यांना हिंदु धर्माची व्यापकता कळू शकेल. लाखो लोकांना भोजन देण्याची व्यवस्था एक वेळ पैसे देऊन उभारताही येईल; मात्र त्यामागील उदात्त विचार ही खरी हिंदु धर्माची अद्वितीयता आहे. सर्वच हिंदु बांधवांना कुंभमेळ्यात येण्याचे सौभाग्य लाभेलच, असे नाही. लाभले तरी त्यांना ही व्यवस्था समजून घ्यायला जमेलच असेही नाही. या लेखाच्या माध्यमातून ही व्यवस्था समजून घेण्याचा प्रयत्न करूया !

कुंभमेळ्यातील एक अन्नछत्र

१. अन्नपूर्णामातेच्या वरदहस्ताविना अशक्य !

महाकुंभमेळ्यामध्ये देशाच्या कानाकोपर्‍यातून, म्हणजे अगदी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, गरीब-श्रीमंत, बालक-वृद्ध आदी समाजातील सर्व भागातील आणि सर्व स्तरांतील भाविक येतात; परंतु एकाही भाविकाला उपाशी झोपण्याची वेळ येत नाही. साक्षात् अन्नपूर्णामातेच्या कृपेविना हे शक्य नाही. अन्नपूर्णामातेची अशी कृपा असण्यामागे काय कारण असू शकते ?

श्री. प्रीतम नाचणकर

२. भंडार्‍यामागील उदात्त हेतू

दुर्गम भागात साधनारत असलेले अनेक साधू, संत कुंभपर्व काळात येऊन कुंभक्षेत्री निवास करतात. लाखो कल्पवासी साधना करण्यासाठी कुंभकाळात येथे निवास करतात. अनेक आध्यात्मिक संस्था अध्यात्म, धर्म, राष्ट्र यांच्या प्रसाराच्या उदात्त हेतूने, तर अनेक जण व्यष्टी साधना करण्यासाठी कुंभक्षेत्रात येतात. साधना, धर्मप्रसार या प्राधान्याने आलेल्या कोणत्याही जीवाचा पोटापाण्याच्या प्रपंचासाठी वेळ न जाता त्यांच्या हातून धर्म, अध्यात्म यांच्या प्रसाराचे उदात्त कार्य व्हावे; साधकांनी साधनेकडे लक्ष द्यावे आणि जिज्ञासूंनी साधना समजून घ्यावी, यासाठी कुंभमेळ्यात आखाडे आणि आध्यात्मिक संस्था यांद्वारे अन्नछत्रे चालवली जातात.

३. अन्नदान पुण्यकर्म मानून दान !

हिंदु धर्माची महानता समजलेल्या आणि धार्मिक असलेल्या अनेक धनाढ्य लोकांना त्यांच्या व्यवसायातून धर्मकार्यासाठी प्रत्यक्ष योगदान देता येत नाही. असे अनेक धनाढ्य पुण्य मिळावे, यासाठी कुंभमेळ्यात अन्नदानासाठी धन अर्पण करतात. यांतील अनेक जण स्वत:च्या हाताने साधूसंतांना भोजन वाढण्याची सेवाही कुंभमेळ्यात येऊन करतात. काही दाते कुंभक्षेत्रात संबंधित संतांच्या आश्रमात काही दिवस थांबून सेवाही करतात. आखाडे आणि आध्यात्मिक संस्था यांना अन्नछत्राकरता दानशूर व्यक्तींकडून मिळणार्‍या अर्पणामुळे कुंभमध्ये अन्नछत्रे चालवली जातात. अशा या दानशूर व्यक्तींचा धर्मप्रसाराच्या कार्यातील हा एक प्रकारचा मोठा सहभागच म्हणता येईल. प्रसिद्ध उद्योजक गौतम अदानी, रिलायन्स उद्योगसमूह यांसह विविध व्यावसायिक संस्था भोजन, तसेच विविध सेवांसाठी संस्थांना अर्थपुरवठा करतात. कुंभमेळ्यामध्ये अन्नदान हे मोठे पुण्यकर्म मानले जाते.

४. भोजनाच्या सेवेसाठी विविध राज्यांतून येणारे सेवेकरी

आखाडे किंवा आध्यात्मिक संस्था यांमध्ये भोजन सिद्ध करणे, भोजन वाढणे, भांडी घासणे, आवरणे आदी विविध सेवांसाठी त्या संस्थेशी जोडलेले साधक, सेवेकरी विविध राज्यांमधून येतात. काही कुंभमेळा संपेपर्यंत, तर काही शक्य तेवढे दिवस राहून सेवा करतात. भोजनाची सेवा करतांना भजन, नामजप करत सेवा केली जाते. बहुतांश शिबिरामध्ये नियमितपणे सायंकाळी भागवत कथेचा कार्यक्रम असतो. त्यांचे श्रवण सेवेकरी करतात.

५. भगवंताचा प्रसाद असल्याचा भाव ठेवून वाढणे !

अन्नछत्रांमध्ये भोजनच प्रसाद म्हणून वाढण्याचा भाव सर्वांमध्ये दिसून येतो. अनेक ठिकाणी भोजनाचा उल्लेखही ‘चावलराम’, ‘दालराम’, ‘सब्जीराम’, ‘जलराम’ असा वैशिष्ट्यपूर्ण करून प्रत्येकाचे नाव रामाशी जोडले जाते.

अन्नछत्रामध्ये भोजनासाठी आलेले सर्वच भाविक अनोळखी, तसेच विविध प्रांतातील असतात. भिकारी, दुकानदार, सर्वसामान्य भाविक असे गरीब, श्रीमंत सर्व स्तरांचे भाविक अन्नछत्रात येतात. या सर्वांना ‘अतिथी देवो भव ।’ या भावाने भोजन देण्याची सेवा होत असते. ‘भोजन ग्रहण करून साधू-संत, भाविक आम्हाला उपकृत करतात’, असा अन्नछत्र करणार्‍यांचा भाव असतो. अनेक ठिकाणी साधू-संतांची पहिली पंगत बसवून त्यांना भोजनानंतर दक्षिणा किंवा भेटवस्तू दिली जाते.

६. अशी होते भोजनाची व्यवस्था !

भोजनामध्ये पोळी, पुरी, भाकरी, भात, आमटी, अनेक ठिकाणी खीर, शिरा, गुलाबजाम आदी गोड पदार्थ, फळे आदी वैविध्यपूर्ण भोजन असते. प्रारंभी अनेक ठिकाणी खिचडी केली जाते. उत्तर भारतामध्ये बटाटे, फ्लॉवर पिकवले जात असल्यामुळे बहुतांश वेळा त्यांच्या भाज्या असतात. विविध अन्नछत्रात न्याहरीसाठी शिरा, डोसा, पोहे, भजी, इडली-सांबार, कचोरी आदी विविध पदार्थ असतात. आखाडे आणि आध्यात्मिक संस्था त्यांच्या क्षमतेनुसार भोजनाची व्यवस्था करतात. येथे थंडी असल्यामुळे अनेक ठिकाणी गरम गरम भोजन दिले जाते.

प्रयागराजमध्ये कुंभक्षेत्रात गंगा नदीच्या वाळवंटावर प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिबिरे उभारून तेथे अशा प्रकारे वैविध्यपूर्ण भोजन, न्याहरी यांची व्यवस्था असणे, ही भगवंताची कृपाच आहे. गृहस्थाश्रमातील वातावरण मायेत ओढणारे असते; मात्र प्रयागराज ही आध्यात्मिक भूमी असल्याने, तसेच कुंभपर्वात येथे स्थूल आणि सूक्ष्म रूपाने येथे सहस्रो पुण्यात्मांचा वास असल्यामुळे येथील वातावरण आल्हाददायक, चैतन्यमय असे साधनेला अत्यंत अनुकूल आहे. संसारामध्ये नाम आठवावे लागते, तर कुंभक्षेत्रात नाम घेण्यासाठी विशेष स्मरण करण्याची आवश्यकता भासत नाही. हा येथील सत्संगाचा परिणाम आहे. अशा तीर्थक्षेत्री पर्यटकही येतात; मात्र त्यांची हेतू मजा करणे, हा असतो. कुंभक्षेत्रात मिळणारे भोजन केवळ जिभेचे चोचले पुरवण्यासाठी ग्रहण केल्यास ते पर्यटकाप्रमाणे ठरेल. साधकाने येथील भोजनाच्या प्रत्येक घासाविषयी भगवंताच्या प्रती कृतज्ञता बाळगल्यास त्याला साधनेच्या दृष्टीने लाभ होईल.

७. कृतज्ञता

भंडारे आणि अन्नछत्र यांमध्ये येणारे अनेक जण अन्न वाया घालवतात. अन्नछत्रांच्या बाहेर असलेल्या कचराकुड्यांमध्ये अनेकदा शिल्लक पदार्थ मोठ्या प्रमाणात टाकलेले असतात. बहुतांश वेळा कुंभक्षेत्रात असलेल्या कर्मचारी वर्गाकडून असे होतात, तसेच अनेक भाविकही अन्न वाया घालवतांना दिसतात. अनेक सेवेकरी स्वत:च्या घरादाराचा त्याग करून सेवा म्हणून भोजन करण्यासाठी येतात, अनेक दाते ईश्वरीकार्य म्हणून यासाठी धन अर्पण करतात आणि अन्न वाढणारे भगवंताचा प्रसाद म्हणून तो देत असतात. यामध्ये अनेकांचा त्याग आहे. व्यावसायिक हेतूने किंवा पर्यटन म्हणून कुंभक्षेत्रात येणार्‍यांना कदाचित याची जाणीव नसेल; परंतु साधनेसाठी, सेवेसाठी येणार्‍या प्रत्येकाने भगवंताने प्रतिकूल परिस्थिती उपलब्ध करून दिलेल्या भोजनाप्रती आणि ज्यांच्या माध्यमातून ते उपलब्ध झाले त्याविषयी सतत कृतज्ञ रहायला हवे !

– श्री. प्रीतम नाचणकर, विशेष प्रतिनिधी, प्रयागराज, उत्तरप्रदेश. (७.२.२०२५)