कुंभमेळ्याला असलेला ब्रिटिशांचा विरोध : हिंदूंच्या संघटनाचे माध्यम !

प्रयागराज येथे अगदी युगायुगांपासून कुंभमेळा भरत आहे. मोगलांच्या काळात कुंभमेळा चालू होता, त्यानंतर इंग्रजांच्या काळातही तो चालू राहिला. या कुंभमेळ्याला इंग्रजांनी विरोध केला होता. मोगलांसह इंग्रजांनी त्यावर पुष्कळ निर्बंध लादण्याचा प्रयत्न केला होता आणि बंद करण्याचाही प्रयत्न केला; मात्र त्यानंतर ब्रिटिशांना कुंभमेळ्याचे आर्थिक महत्त्व (धार्मिक नव्हे) लक्षात आले आणि त्यांनी कुंभमेळ्याच्या आयोजनात रस दाखवून अधिकार्‍यांची नियुक्ती केली.

कुंभमेळा हा केवळ हिंदूंच्या धार्मिक, आध्यात्मिक लाभाचे ठिकाण झाले नाही, तर तेथे जमलेल्या विविध धार्मिक, आध्यात्मिक संस्था आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना सुराज्यासाठी प्रयत्नशील झाल्यामुळे हिंदु राष्ट्र स्थापनेच्या चळवळीला गती आली, हे निश्चित !

१. इंग्रजांनी कुंभमेळ्याचे नियंत्रण स्वत:कडे घेणे

कुंभमेळ्याचे आयोजन, त्यातील व्यवस्था हे इंग्रजांनी भारत कह्यात घेण्यापूर्वी आखाड्यांकडूनच केले जायचे; मात्र शैव आखाडे, वैष्णव आखाडे यांच्यात स्नानाला जाण्याचा क्रम, त्यातील मानापमान यांमुळे वारंवार युद्धे होऊ लागली. परिणामी ही संधी ओळखून ब्रिटिशांनी त्याचे नियंत्रण स्वत:कडे घेतले.

जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीने भारत पादाक्रांत केला, तेव्हा ब्रिटिशांनी कुंभमेळ्यात एकत्र येणारी हिंदूंची विशाल संख्या पाहिली. हे हिंदू आणि तेथे वस्तू वितरणासाठी येणारे व्यापारी, दुकानदार यांच्यावर मोठ्या प्रमाणात कर लावून महसूल गोळा करता येईल, असे ब्रिटिशांनी ठरवले. त्यानुसार त्यांनी भाविकांवर ‘यात्रा कर’ लावला, त्याचप्रमाणे दुकानदारांवर मोठा कर लावला. ईस्ट इंडिया कंपनीच्या डुबे नावाच्या अधिकार्‍याने भाविक आणि दुकानदार यांच्यावर मोठा कर लावला. हा कर एवढ्या मोठ्या प्रमाणात होता की, कुंभसाठी हिंदूंची उपस्थिती एकदम घटली. या कराविरुद्ध प्रयागवाल, म्हणजेच प्रयागमधील पुरोहितवर्गाने आवाज उठवला. त्यांनी या कराचा विरोध चालू केला. त्यामुळे इंग्रजांना हा कर रहित करावा लागला. कुंभमेळ्यावर इंग्रजांप्रमाणे मोगलांनीही कर लावला होता. तो दीर्घकाळ होता; मात्र नंतर रहित करावा लागला.

श्री. यज्ञेश सावंत

२. अफवा पसरवून हिंदूंना परावृत्त करणे !

वर्ष १९४२ मध्ये दुसर्‍या महायुद्धाच्या काळात कुंभमेळ्याच्या ठिकाणी हिंदूंनी एकत्र येऊ नये; म्हणून इंग्रजांना युद्धाच्या निमित्ताने संधी मिळाली होती. त्यांनी हिंदूंमध्ये ‘जपान कुंभमेळ्यावर बाँब टाकेल, त्यामुळे पुष्कळ मनुष्यहानी होईल’, अशी बातमी पसरवली. हिंदू यामुळे घाबरतील आणि कुंभमेळ्याची परंपरा खंडित होईल, असा ब्रिटिशांचा यामागे हेतू होता. त्यासाठी त्यांनी प्रयागराज येथे हिंदूंच्या प्रवासावरही निर्बंध लादले होते; मात्र कालांतराने काही मासांनी ही अफवा असल्याचे आणि ब्रिटिशांनी जाणीवपूर्वक खोटे सांगितल्याचे उघड झाले होते. या प्रसंगातूनही इंग्रज कुंभमेळा आणि त्याद्वारे होणारे हिंदूंचे संघटन यांच्या विरोधात होते, हे लक्षात येते. कुंभमेळ्यासाठी ठेवलेला राखीव निधीसुद्धा इंग्रजांनी लढाईसाठीच वापरला. येथे एक महत्त्वाचे, म्हणजे वर्ष १९४२ मध्ये इंग्रजांविरुद्ध ‘चले जाव’ चळवळीने पुष्कळ जोर पकडला होता. त्यामुळे कुंभमध्ये एकत्र येणारे लाखोंच्या संख्येतील हिंदू या चळवळीत सहभागी झाल्यास त्यांच्या साम्राज्याला धोका होऊ शकतो, याचीही भीती इंग्रजांना वाटत होती. त्यामुळेही ते कुंभमेळा आयोजनाच्या विरोधात होते.

३. कुंभमेळ्यासाठी ‘प्रयागवाल’ यांचा लढा

वर्ष १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये भारतभरात मोठ्या प्रमाणात जागृती झाल्यामुळे अनेक क्रांतीकारक इंग्रजांच्या जुलमी सत्तेविरुद्ध उभे राहिले होते. प्रयागराजच्या शहरी भागातील सध्याच्या ‘स्वरूप राणी वैद्यकीय महाविद्यालया’च्या जागेवर इंग्रजांच्या काळात कारागृह होते आणि त्यामध्ये अनेक क्रांतीकारकांना फाशी देण्यात आली होती. प्रयागराज येथील ‘प्रयागवाल’ हेसुद्धा इंग्रजी सत्तेच्या विरोधात होते. त्यांनीही स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा दिला होता. इंग्रज अधिकार्‍यांच्या नोंदीनुसार ‘प्रयागवाल यांना इंग्रज शासनाच्या पाठिंब्याने कार्यरत ख्रिस्ती संस्थांना कुंभमेळ्यात ख्रिस्ती धर्माचा प्रचार करण्यास आणि हिंदूंचे धर्मांतर करण्यास आक्षेप होता.’ प्रयागवाल यांच्या विरुद्ध इंग्रजांनी क्रौर्य दाखवत कुंभमेळ्याचा परिसर आणि प्रयागवाल यांच्या रहाण्याच्या जागांवर बाँबवर्षाव करून ती नष्ट केली. याचा सूड म्हणून प्रयागवाल यांनी ख्रिस्ती संस्थांची कार्यालये, चर्च यांवर आक्रमणे करून ती नष्ट केली. अनेक चर्च जाळण्यात आली. त्यामुळे मिशनर्‍यांच्या कारवायांना याद्वारे काही काळासाठी पायबंद बसला; मात्र जेव्हा इंग्रजांनी १८५७ चे बंड मोडून काढले, तेव्हा त्यांनी प्रयागवाल यांचा अनन्वित छळ करण्यास प्रारंभ केला, अनेकांना फाशी दिले. संगमाजवळील मोठा परिसर कह्यात घेऊन त्या ठिकाणी इंग्रज सेनेची छावणी उभी केली. स्थानिकांना संगमाकडे जाण्यास आणि धार्मिक विधी करण्यास प्रतिबंध केला. तरी काही प्रयागवाल यांनी संगमातून गंगेचे पाणी मिळवून ते प्रयागवाल यांच्या वस्तीपर्यंत पोचवण्यास यश मिळवले.

४. कुंभमेळ्याद्वारे पुष्कळ महसूल मिळत असल्याचा इंग्रजांचा अभ्यास

‘कुंभमेळ्याच्या आयोजनावर निर्बंध लादण्यासह कुंभच्या आयोजनात पुष्कळ व्यय करावा लागेल, त्यामुळे ते आयोजन नको’, असा ब्रिटिशांचा विचार होता; मात्र कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी, विविध सेवा पुरवण्यासाठी प्रशासनाने व्यय केलेल्या निधीच्या दुप्पटीहून अधिक महसूल इंग्रजांकडे गोळा होऊ लागला. कुंभाच्या आयोजनासाठी पैसे व्यय केल्यावर एवढा महसूल गोळा होतो की, त्याद्वारे कुंभाच्या आयोजनाचा व्यय भरून निघतोच, त्यासह अनेक विकासकामेही करता येतात, हे इंग्रजांनी हेरले. त्यामुळे त्यांनी नंतरच्या काळात कुंभाच्या आयोजनासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या.

त्यातही त्यांनी हिंदूंना डिवचण्यासाठी काही गोष्टी केल्याच. त्यात महत्त्वाचे म्हणजे कुंभाच्या आयोजनाचे दायित्व काही दशके ‘इनस्पेक्टर’ (निरीक्षक) लियाकत हुसेन यांच्याकडे देण्यात आले होते. कुंभाचे यशस्वी आयोजन, म्हणजे त्यामध्ये काही गडबड-गोंधळ न झाल्यामुळे लियाकत हुसेन यांना तेव्हाचे ५०० रुपयांचे बक्षीस (म्हणजे आताचे काही लाख रुपये) दिल्याचाही उल्लेख इंग्रजांच्या कागदपत्रांमध्ये आहे. कुंभमेळ्यात गोळा झालेल्या महसुलाने अल्फ्रेर्ड पार्क, पुस्तकालये, संग्रहालय, काल्विन डिस्पेंसरी अशा अधार्मिक गोष्टींसाठी पैसा व्यय करण्याचे निदेॅश इंग्रजांच्या पत्रात आहेत.

वर्ष १८७६ मध्ये पार पडलेल्या अर्धकुंभविषयी जे.सी. राबर्टसन या जिल्हाधिकार्‍याने प्रयागराजच्या आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात पुढील उल्लेख आढळतो, ‘२६ जानेवारीपर्यंत १ लाख ५० सहस्र लोक कुंभाला उपस्थित आहेत. कुंभासाठी सरकारकडून १० सहस्र २२० रुपये उपलब्ध करण्यात आले, यामध्ये मेळ्याच्या आयोजनावर ९ सहस्र ३६८ रुपये १४ आणे आणि १ पैसा व्यय झाला. सरकारला कुंभमेळ्यातून ३० सहस्र ८८१ रुपयांचा महसूल मिळाला. कुंभमेळ्याद्वारे सरकारला ११ सहस्र २९२ रुपये ३ आणे आणि ५ पैसे यांचा लाभ झाला. या पैशांचा उपयोग सामान्य कार्यांसाठी केला जाऊ शकतो.’

५. ख्रिस्ती संस्थांचा साधूंच्या मिरवणुकीला विरोध !

नागा साधूंचे वाजत-गाजत, पारंपरिक शस्त्रांस्त्रांसह मिरवणुकीद्वारे कुंभक्षेत्री आगमन होते. या मिरवणुकीच्या स्वागताच्या वेळी पूर्वापार राज्याच्या प्रशासनातील अधिकारी उपस्थित असे. इंग्रजांच्या काळात महाकुंभमेळ्याचे आयोजन इंग्रजांकडे गेल्यावर या मिरवणुकीसाठी इंग्रज अधिकारी स्वागत करण्यासाठी उपस्थित असे. याला ‘ख्रिश्चन ब्रदरहूड’ नावाच्या ख्रिस्ती संस्थेने आक्षेप घेतला आणि याविषयी इंग्लडंच्या राजाला ‘ही कृती अयोग्य आहे, ख्रिस्ती पंथांचा अधिकारी हिंदु साधूंच्या मिरवणुकीचे स्वागत करतो, हे चुकीचे आहे. हे हिंदूंचे लांगूलचालन आहे’, असे पत्राद्वारे कळवले. याविषयी इंग्लंडच्या तत्कालीन राज्यकर्त्याने भारतातील इंग्रज अधिकार्‍याला याविषयी विचारल्यावर इंग्रज अधिकार्‍याने ही पूर्वापार परंपरा आहे. नागा साधूंची मिरवणूक अश्लील नाही, ती धार्मिक परंपरा आहे. या मिरवणुकीच्या वेळी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अन्य अधिकार्‍यांसह युरोपियन अधिकारीही उपस्थित असतात. त्यामुळे यामध्ये काही नवीन नाही. त्यामुळे प्रशासकीय अधिकार्‍याने स्वागत करण्याची परंपरा आजतागायत चालू आहे.

६. कुंभमेळ्यामध्ये झालेले हिंदूहिताचे संघटन !

वर्ष १९०६ मध्ये सनातन धर्म सभेने कुंभमेळ्यात एका बैठकीचे आयोजन केले. या बैठकीत भारतरत्न पंडित मदन मोहन मालवीय यांच्या पुढाकाराने बनारस हिंदु विश्वविद्यालयाची स्थापना झाली. वर्ष १९५४ मध्ये हरिद्वारच्या कुंभमेळ्यात विश्व हिंदु परिषदेची स्थापना झाली. प्रयागवाल समुहाने पूर्वीपासूनच भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा दिला होता. आता पुन्हा एकदा भारत हिंदु राष्ट्र करण्याची घोषणा सध्याच्या महाकुंभमेळ्यात गुंजत आहे. त्यामुळे कुंभमेळा हा केवळ हिंदूंच्या धार्मिक, आध्यात्मिक लाभाचे ठिकाण न बनता हिंदूंवरील अत्याचार, अन्याय यांविरुद्ध संघटनाचे एक केंद्र म्हणून पुढे आले आहे. आताही हिंदूंच्या या विशाल समुदायाला ‘हिंदु राष्ट्रा’च्या व्यापक आणि भव्य संकल्पाने दिशादर्शन करण्याची आवश्यकता आहे. कुंभमेळ्यात धार्मिक, आध्यात्मिक संस्था आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यासाठी प्रयत्नशील झाल्यामुळे हिंदु राष्ट्र स्थापनेच्या चळवळीला गती येईल, हे निश्चित !

श्री गुरुचरणार्पणमस्तु ।

– श्री. यज्ञेश सावंत, कुंभनगरी, प्रयागराज, उत्तरप्रदेश. (६.२.२०२५)

कुंभमेळ्याचा इंग्रजांनी घेतलेला धसका

हिंदूंच्या मोठ्या प्रमाणात एकत्र होण्याचा, हिंदूंच्या गर्दीचा इंग्रजांनी धसका घेतला होता. त्यांना वाटायचे की, एवढ्या मोठ्या संख्येत हिंदू एकत्र आले आणि ते भारताला स्वतंत्र करण्यासाठी संघटित झाले, तर त्यांच्या साम्राज्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ते सावध होते. कुंभमेळ्यामुळे स्वातंत्र्याच्या आंदोलनाला बळ मिळेल, असे त्यांना वाटायचे. त्यामुळे ते कुंभमेळ्यातील गर्दीवर नियंत्रण कसे आणता येईल ? हिंदूंची संख्या न्यून कशी राहील, यासाठी प्रयत्नशील असत.

इंग्रजांनी कुंभमेळ्यात गंगा स्नानाला विरोध केला. त्यामुळे कुणीही हिंदु गंगा स्नानाला जाण्यास धजावला नाही. तेव्हा पंडित मदन मोहन मालवीय यांनी याचा विरोध चालू केला. भाविकांना गंगा स्नानापासून रोखण्यासाठी मोठ्या संख्येत पोलिसांचा फौजफाटा आणला होता. तेव्हा संगमाजवळ तणावाची परिस्थिती होती. आंदोलन करणारे पंडित मदन मोहन मालवीय यांनी कसलाही विचार न करता नदीमध्ये उडी घेतली आणि स्नान केले. त्यांच्या पाठोपाठ अन्य आंदोलकांनीही उड्या घेतल्या. तेव्हा इंग्रज पोलीस लोकांच्या या रेट्यापुढे नमले आणि त्यांनी स्नानासाठी अनुमती दिली. अशा रितीने पंडित मदन मोहन मालवीय यांनी पुढाकार घेऊन कुंभामध्ये स्नान करण्यासाठी असलेला ब्रिटिशांचा विरोध मोडून काढला. – श्री. यज्ञेश सावंत