पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात साजरा करण्यासाठी तो ‘मराठी भाषा गौरवदिना’ला, म्हणजेच २७ फेब्रुवारीला ‘गेटवे ऑफ इंडिया’ येथे होणार !

मुंबई – राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने ‘मराठी भाषा गौरवदिना’निमित्त विविध साहित्यिक आणि प्रकाशन संस्था यांना गौरवण्यात येणार्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे, अशी माहिती उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मंत्री सामंत म्हणाले…,
१. ‘मराठी भाषा गौरवदिना’निमित्त दिला जाणारा पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या दिमाखात साजरा होेणे आवश्यक आहे. त्यामुळे यावर्षीपासून हे पुरस्कार ‘गेटवे ऑफ इंडिया’ येथे भव्य स्वरूपात प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
२. या पुरस्कार निवडीसाठी साहित्य क्षेत्रातील तज्ञ समित्या कार्यरत आहेत. निवड प्रक्रियेत कुठलाही हस्तक्षेप किंवा वशिलेबाजी होणार नाही.
३. पुरस्कार वितरण सोहळा २७ फेब्रुवारीच्या संध्याकाळी ६ वाजता गेटवे ऑफ इंडिया, मुंबई येथे पार पडेल. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होईल.
४. मंत्री उदय सामंत यांनी राज्य शासनाच्या वतीने सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आणि ‘मराठी भाषा गौरवदिना’निमित्त आयोजित कार्यक्रमांना साहित्यप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहनही केले.
ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब गंगाराम बोराडे, तसेच ‘ज्योत्स्ना प्रकाशन, पुणे’ ठरले पुरस्कारांचे मानकरी !
या वर्षीचा प्रतिष्ठेचा ‘विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब गंगाराम बोराडे यांना, तर ‘श्री. कु. भागवत पुरस्कार’ हा ‘ज्योत्स्ना प्रकाशन, पुणे’ या प्रकाशन संस्थेला देण्यात येणार आहे.
‘कवितांचं गाव’ आणि ‘पुस्तकांचं गाव’ हे नावीन्यपूर्ण उपक्रम चालू करणार !
‘मराठी भाषा गौरवदिना’निमित्त दोन महत्त्वपूर्ण उपक्रम चालू करण्यात येत आहेत. ‘कवितांचं गाव’ ही संकल्पना कुसुमाग्रजांचे वास्तव्य असलेल्या नाशिकमधील शिरवाड येथे राबवली जाणार आहे. या उपक्रमांतर्गत गावातील ३५ घरांमध्ये वाचनालय स्थापन करून येथे केवळ कवितांची पुस्तके ठेवली जातील, तर ‘पुस्तकांचं गाव’ रत्नागिरी जिल्ह्यातील स्मारक गावात चालू करण्यात येणार आहे. येथे ३५ घरांमध्ये प्रत्येकी १ सहस्र नवी कोरी पुस्तके ठेवली जाणार आहेत, म्हणजे लहान मुले, युवक आणि वाचकवर्ग यांना दर्जेदार साहित्य वाचता येईल.
‘कवितांचं गाव’ या उपक्रमाचे उद्घाटन २७ फेब्रुवारीला कुसुमाग्रजांच्या वास्तव्यस्थानी होईल, तर ‘पुस्तकांचं गाव’ पुढील महिन्यात औपचारिकरित्या चालू करण्यात येणार आहे.
संपादकीय भूमिकापुढील वर्षी हे पुरस्कार राजधानी देहलीत देण्यावर राज्यशासनाने विचार करावा. याने ‘माय मराठी’ला राष्ट्रीय महत्त्व प्राप्त होऊ शकेल ! |