Mahakubh 2025 : पुढे अमृतस्नान नसूनही कुंभक्षेत्री भाविकांची होत आहे प्रचंड गर्दी !

भाविकांना थांबवण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न !

प्रयागराज, ८ फेब्रुवारी (वार्ता.) – महाकुंभक्षेत्रात स्नान करण्यासाठी ७ फेब्रुवारीपासून भाविकांची गर्दी पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. भाविकांचे प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणात वाढले आहे की, कुंभक्षेत्रात प्रवेश करणार्‍या रस्त्यांवर वाहने अतिशय संथगतीने पुढे जात आहेत. १ किलोमीटर अंतर कापण्यासाठीही भाविकांना काही तास लागत आहेत. भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन प्रयागराजच्या बाहेर प्रशासनाकडून भाविकांना थांबवण्याचा प्रयत्न चालू आहे. एकूण चित्रामुळे महाकुंभमेळ्याच्या संपूर्ण कालावधीत संगमस्नान करणार्‍यांची संख्या ५० कोटींहूनही अधिक होऊ शकते, असे सांगितले जात आहे.

८ फेब्रुवारीच्या सकाळपासूनच कुंभक्षेत्रात लावण्यात आलेल्या सर्व ध्वनीवर्धकांवरून प्रशासनाकडून घाट रिकामे करण्याची सूचना देण्यात येत आहे. स्नान झाल्यावर पोलीस भाविकांना घाटांवर विनाकारण थांबू न देता घाट रिकामा करण्याचे आवाहन करत आहेत. माघी अमावास्येच्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर कुंभमेळ्यात भाविकांचा येणारा ओघ काही प्रमाणात मंदावला होता; मात्र अमृतपर्वानंतर (वसंत पंचमीनंतर) गर्दी न्यून होईल, या अनुमानाने भाविक मोठ्या प्रमाणात प्रयागराज येथे येत आहेत.

प्रयागराज येथून भाविक जवळच असलेल्या अयोध्या आणि वाराणसी येथे, तसेच ५०० किमीहून अधिक अंतर असलेल्या मथुरेलाही भेट देत आहेत. त्यामुळे या धार्मिक स्थळांनाही भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. प्रयागराज येथे भाविकांची गर्दी नियंत्रित करणे पोलिसांना कठीण झाले आहे. कुंभक्षेत्राच्या बाहेरील मार्गावर मागील २४ तास वाहतूक मोठ्या प्रमाणात खोळंबली आहे. गंगेच्या पात्रात असलेल्या शास्त्री पुलावर काल रात्रीपासून वाहने मोठ्या प्रमाणात खोळंबली आहेत. चारचाकी गाडी घेऊन आलेल्या भाविकांना मोठ्या गर्दीचा सामना करावा लागत आहे. भाविकांचे स्नान लवकर आटपावे, यासाठी प्रशासनाने भाविकांना जाण्यासाठी काही पांटून पूल ठेवले आहेत. एवढ्या प्रचंड गर्दीमध्येही भाविकांमध्ये त्रिवेणी संगमावर स्नान करण्यासाठीचा उत्साह मोठा आहे.