बांगलादेशात पुन्हा हिंसाचार !
ढाका (बांगलादेश) – बांगलादेशात पुन्हा एकदा हिंसाचाराची ठिणगी उसळली आहे. देशातील २४ हून अधिक जिल्ह्यांमध्ये निदर्शकांनी माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाच्या नेत्यांच्या घरांवर आक्रमण केले आणि त्यांना आग लावली. बांगलादेशाचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान ‘बंगबंधू’ यांची भित्तीचित्रे नष्ट करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी चालू झालेल्या जाळपोळीच्या घटना थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत.
१. ५ फेब्रुवारीच्या रात्री शेख हसीना यांच्या ऑनलाइन भाषणाच्या वेळी हिंसाचार पेटला. अवामी लीगचे नेते शेख सलीम यांच्या ढाक्यातील घराला आग लावण्यात आली.
२. शेख मुजीबूर रहमान यांचे धनमोंडी-३२ येथील निवासस्थान जाळून टाकण्यात आले. तसेच नोआखाली येथील आवामी लीगचे सरचिटणीस आणि माजी मंत्री ओबैदुल कादर यांच्या घरावर निदर्शकांनी आक्रमण केले. घरासमोर उभ्या असलेल्या एका चारचाकी गाडीलाही आग लावण्यात आली.
३. बाघा उपजिल्ह्यातील चाकासिंगा मोहल्ला येथे निदर्शकांच्या एका गटाने माजी परराष्ट्र राज्यमंत्री शहरयार आलम यांच्या तीन मजली घराला आग लावली.
लोकांची आणि त्यांच्या मालमत्तेची सुरक्षा सुनिश्चित करण्यास सिद्ध ! – अंतरिम सरकारमहंमद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने देशभरात चालू असलेल्या तोडफोडीच्या आणि जाळपोळीच्या घटनांचा तीव्र निषेध केला असल्याचे म्हटले जात आहे. सरकारने म्हटले आहे की, ते लोकांची आणि त्यांच्या मालमत्तेची सुरक्षा सुनिश्चित करण्यास सिद्ध आहे. (लोकांमध्ये शेख हसीना यांचा ‘अवामी लीग’ पक्ष आणि त्यांचे नेते-कार्यकर्ते, तसेच अल्पसंख्यांक हिंदू मोडत नाहीत, हेही तितकेच खरे ! – संपादक) |