Pakistani Hindus In Prayagraj Mahakumbh : सनातन धर्माच्या श्रद्धेची हाक ऐकून महाकुंभात पाकिस्तानातील ६८ हिंदूंचे आगमन !

प्रयागराज कुंभपर्व २०२५

महाकुंभाची दिव्य आणि भव्य व्यवस्था पाहून पाकिस्तानी भाविक भारावले !

त्रिवेणी संगम येथे स्नान करून आनंद व्यक्त करतांना पाकिस्तानी हिंदु भाविक

प्रयागराज – येथील महाकुंभात जगाच्या कानाकोपर्‍यातून भाविक पवित्र संगमात श्रद्धेने स्नान करण्यासाठी अजूनही प्रयागराज येथे येत आहेत. महाकुंभात आतापर्यंत अनुमाने ३९ कोटी ७४ लाख भाविकांनी संगमात स्नान केले आहे. सनातन धर्माच्या श्रद्धेचा संबंध इतका खोल आहे की, पाकिस्तानातील सनातन धर्माचे अनुयायीही महाकुंभातील पवित्र संगमात स्नान करण्यासाठी प्रयागराज येथे पोचले आहेत. पाकिस्तानच्या सिंध आणि पंजाब प्रांतातील ६८ हिंदु भाविकांचा समूह प्रयागराज पोचला. सर्व भाविकांनी पवित्र संगमात स्नान करून आपल्या पूर्वजांच्या अस्थींचे संगमात विसर्जन केले. महाकुंभाची व्यवस्था आणि सनातन धर्माच्या श्रद्धेचा दिव्य भव्य कार्यक्रम पाहून सर्व पाकिस्तानी भाविक भारावून गेले.

त्रिवेणी संगम येथे आलेले पाकिस्तानी हिंदु भाविक

१. पाकिस्तानातील हे सर्व भाविक त्यांच्या पूर्वजांचे अस्थीकलश विसर्जन करण्यासाठी खास ‘व्हिसा’ घेऊन प्रयागराज येथे आले होते.

२. भाविकांसह आलेले महंत रामनाथजी म्हणाले की, याआधी ते सर्वजण हरिद्वार येथे गेले होते. तेथे त्यांनी अनुमाने ४८० पूर्वजांच्या अस्थीकलशांचे विसर्जन आणि पूजा केली.

३. यानंतर त्यांनी प्रयागराज येथे येऊन महाकुंभातील संगमात स्नान केले आणि आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना केली.

आम्हाला सनातन श्रद्धेचा धागा आणि महाकुंभाची हाक येथे खेचून घेऊन आली ! – पाकिस्तानचे भाविक

‘सनातन धर्माच्या श्रद्धेचा धागा आणि महाकुंभाची हाक आम्हाला येथे खेचून घेऊन आली आहे. आमची अनेक वर्षांची इच्छा, तर होतीच; पण आमच्या पूर्वजांचीही आशा होती की, त्यांनी महाकुंभात सहभागी होऊन पवित्र त्रिवेणी संगम येथे स्नान करावे आणि येथून पाणीसमवेत घ्यावे. त्यानुसार ही इच्छा पूर्ण झाली आहे’, असे अभिप्राय पाकिस्तानातून महाकुंभासाठी आलेल्या भाविकांनी व्यक्त केले आहेत. त्यांनी भारत सरकार आणि उत्तरप्रदेशच्या योगी सरकारचे पुष्कळ आभार मानले. पाकिस्तानी भाविक म्हणाले की, योगी सरकारमुळे महाकुंभात सहभागी होण्याचे सौभाग्य मिळाले. महाकुंभाची व्यवस्था अतिशय उत्तम आहे. येथील वातावरण, भोजन, स्वच्छता व्यवस्था सर्वच कौतुकास पात्र आहे. पाकिस्तानात आम्हाला मंदिरात जायलाही मिळाले नाही. येथे येऊन आम्ही केवळ धन्यच नाही, तर आमच्या माता-पिता आणि पूर्वज यांनाही मोक्ष मिळाला आहे. लहानपणापासून आम्ही प्रयागराज आणि संगम या पवित्र भूमीविषयी ऐकले होते. माता गंगेत स्नान केल्याने आमचे जीवन यशस्वी झाले आहे.