Illegal Indian Immigrants In US : अमेरिका आणखी ४८७ भारतीय अवैध स्थलांतरितांना परत पाठवणार !

बेड्या घालण्यावरून भारताने नोंदवला आहे आक्षेप !

भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी (वर्तुळात)

नवी देहली – अमेरिकेने आणखी ४८७ भारतीय स्थलांतरितांच्या सूची दिली आहे. अमेरिकेने यापैकी २९८ जणांची चौकशी करण्यास सांगितले आहे. या सर्व अवैध भारतीय स्थलांतरितांना हद्दपार करण्याचे अंतिम आदेश जारी केले आहेत, अशी माहिती भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ फेब्रुवारीपासून २ दिवसांच्या अमेरिका दौर्‍या जाणार असून यात ते राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांची भेट घेतील. ते १० ते १२ फेब्रुवारीला फ्रान्समध्ये असतील.

१. यापूर्वी १०४ भारतियांना परत पाठवतांना त्यांच्या हाता-पायांत बेड्या घालण्यात आल्याच्या सूत्रावर विक्रम मिसरी म्हणाले की, आम्ही भारतीय स्थलांतरितांना बेड्या घालण्यावरून अमेरिकेकडे आक्षेप नोंदवला आहे. हे टाळता आले असते. अमेरिकेने अधिक मानवीय वृत्ती दाखवायला हवी होती. भारताची स्पष्ट भूमिका आहे की, अमेरिकेतून पुढील हद्दपारीच्या वेळी अवैध स्थलांतरितांशी कोणतेही गैरवर्तन होऊ नये.

२. मिसरी पुढे म्हणाले की, आम्ही अमेरिकेने दिलेल्या आकडेवारीवर अवलंबून आहोत. अवैध स्थलांतर हे कर्करोगासारखे आहे. ते रोखले पाहिजे.

३. परदेशात लोकांची बेकायदेशीर वाहतूक आणि नोकरी यांच्या नावाखाली होणारी फसवणूक रोखण्यासाठी केंद्र सरकार एक नवीन कायदा आणणार आहे. हा नवीन कायदा ४२ वर्षे जुन्या पारपत्र कायद्याची जागा घेईल. विविध मंत्रालयांमध्ये आणि परराष्ट्र मंत्रालयाशी संलग्न स्थायी समितीत या प्रारूपावर चर्चा चालू आहे. सूचना आणि हरकती मागवल्या जातील. ते अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडले जाऊ शकते. कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांना ५ ते ७ वर्षांचा कारावास आणि ५ लाख रुपये दंड, अशी शिक्षा होईल. जर महिला आणि मुले यांना लक्ष्य केले गेले, तर ही शिक्षा ७ वर्ष ते १० वर्षांपर्यंत अन् १५ लाख ते २० लाख रुपये दंड, अशी असू शकते.