India Slamed Bangladeshi Envoy : शेख हसीना यांच्या विधानाशी आमचा काहीही संबंध नाही !

  • भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने बांगलादेशी उच्चायुक्तांना बोलावून सुनावले !

  • शेख हसीना यांच्या विधानावरून भारतावर केली होती टीका

भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल व बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना

नवी देहली – भारतातील बांगलादेशाचे कार्यवाहक उच्चायुक्त महंमद नुरुल इस्लाम यांना ७ फेब्रुवारीला संध्याकाळी परराष्ट्र मंत्रालयात बोलावण्यात आले. या वेळी त्यांना सांगण्यात आले की, भारत बांगलादेशाशी चांगले संबंध इच्छितो, जे अलिकडच्या उच्चस्तरीय बैठकांमध्ये अनेक वेळा पुन्हा सांगितले गेले आहे; पण बांगलादेशी अधिकारी भारताविरुद्ध विधाने करत आहेत, तसेच अंतर्गत गोष्टींसाठी भारतावर आरोप करत आहेत, हे दुःखद आहे. बांगलादेशाने आमच्यावर खोटे आरोप करणे थांबवावे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी दिली.

१. बांगलादेशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने ६ फेब्रुवारी या दिवशी एक निवेदन जारी करून भारतासमोर निषेध व्यक्त केला होता. भारताला पदच्युत माजी पंतप्रधान शेख हसीना यांना वक्तव्य करण्यापासून रोखण्याची मागणी बांगलादेशाने केली होती. युनूस सरकारने भारताच्या राजदूतांना बोलावून सांगितले होते की, शेख हसीना भारतात राहून खोटी आणि बनावट विधाने करत आहेत.

२. ५ फेब्रुवारीला रात्री जिहादी मुसलमानांनी ढाका येथील शेख हसीना यांचे वडील आणि बांगलादेशाचे संस्थापक शेख मुजीबुर रेहमान ‘बंगबंधू’ यांच्या निवासस्थानाची तोडफोड केली. यानंतर हसीना यांनी फेसबुकवर त्यांच्या समर्थकांना संबोधित केले. ‘इतिहास सूड घेतो’, असे म्हणत हसीना यांनी चेतावणी दिली होती.