महापुरुषांचा अपमान करणार्‍यांची जीभ किंवा हात छाटण्याचा कायदा करा ! – शिवप्रेमींची मागणी

राहुल सोलापूरकर

सातारा, ७ फेब्रुवारी (वार्ता.) – अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवरायांविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्याविषयी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. युगपुरुष श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह सर्वच महापुरुषांविषयी अपमानास्पद वक्तव्य किंवा लिखाण करणार्‍यांची जीभ किंवा हात छाटण्याची शिक्षा करणारा कायदा लागू करावा, अशी मागणी येथील शिवप्रेमी नागरिकांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

निवेदनामध्ये म्हटले आहे, ‘अशा बेताल वक्तव्यांमुळे जाती-धर्मात अशांतता आणि वितुष्ट निर्माण होऊन सामाजिक घटकांवर त्याचा विपरित परिणाम होतो. अशा प्रवृत्तींचा कायद्यातील कठोर प्रावधानांनुसार बंदोबस्त केला पाहिजे. अन्यथा अशा विकृत व्यक्तींच्या प्रवृत्तींमुळे सामाजिक शांतता भंग होण्यासमवेतच लोकांच्या मानसिकतेचा उद्रेक होऊन अनर्थ घडू शकतो. सोलापूरकर यांच्या वक्तव्यांचा आम्ही तीव्र शब्दांत जाहीर निषेध व्यक्त करतो. त्यांच्यावर राष्ट्रपुरुषांविषयी निरर्थक वक्तव्य करून सामाजिक अशांतता निर्माण केल्याविषयी गुन्हा नोंदवावा. सर्व महापुरुषांविषयी अपमानास्पद वक्तव्य किंवा लिखाण करणार्‍यांवर केंद्रशासनाने कडक शिक्षा करणारा स्वतंत्र कायदा पारित करावा. पोलिसांनीही स्वतःहून घटनेची नोंद घेऊन संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करावी.’

संपादकीय भूमिका :

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात अशी मागणी करावी लागणे संतापजनक आहे !