(म्हणे) ‘विधानसभा निवडणुकांच्या वेळी महाराष्ट्रात अनेक नवीन मतदार वसवले गेले !’ – काँग्रेस नेते राहुल गांधी 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पत्रकार परिषदेत आरोप

काँग्रेस नेते राहुल गांधी

नवी देहली – निवडणूक आयोगाने आम्हाला महाराष्ट्रातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील मतदार सूची द्याव्यात, अशी मागणी आम्ही वारंवार करूनही त्यांनी आमच्या मागणीकडे लक्ष दिले नाही. त्यात मतदारांची नावे, पत्ते आणि छायाचित्रही हवीत. आम्हाला हे पहायचे की, लोकसभा निवडणुकीपेक्षा विधानसभा निवडणुकीच्या वेळी हे नवे मतदार कोण आले आहेत ! अनेक मतदारांची नावे हटवण्यात आली. अनेक मतदारांची नावे एका बुथमधून दुसर्‍या बुथमध्ये समाविष्ट करण्यात आली, असे लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, तसेच उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हेही उपस्थित होते.

राहुल गांधी यांनी मांडलेली सूत्रे

१. ‘लोकसभा निवडणूक २०२४’पर्यंत ३२ लाख मतदारांचा नव्याने समावेश करण्यात आला; पण लोकसभा २०२४ ते विधानसभा २०२४ या ५ महिन्यांत ३९ लाख नवे मतदार समाविष्ट झाले. ५ महिन्यांत समाविष्ट झालेले मतदार एवढे अधिक कसे ? संपूर्ण हिमाचल प्रदेशमध्ये ३९ लाख मतदार आहेत.

२. महाराष्ट्रात विरोधी पक्षांना जितक्या मतदारांनी मतदान केले, त्यांची संख्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत अजिबात न्यून झालेली नाही. आमची मते न्यून झालेली नाहीत; परंतु नवीन लोकसंख्या आणून वसवल्यामुळे भाजपची मते वाढली.

३. निवडणूक आयोगाचे आयुक्त एका समितीकडून नेमले जात होते. त्यात सरन्यायाधीश, विरोधी पक्षनेते आणि पंतप्रधान होते. ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वी सरन्यायाधिशांना त्यातून बाहेर काढून भाजपच्या व्यक्तीला त्या समितीत घेण्यात आले. लोकसभा निवडणुकीच्या आधी निवडणूक आयुक्तांना हटवण्यात आले आणि नव्या आयुक्तांना तिथे नेमण्यात आले.

मुख्यमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष यांची प्रतिक्रिया

‘जेव्हा एकच विनोद पुन्हा पुन्हा ऐकवला जातो, तेव्हा त्यावर हसू येत नाही’, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे. फडणवीस यांनी ही ‘पोस्ट’ काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना जोडली आहे. (‘टॅग’ केली आहे.) नवी देहली येथे राहुल गांधी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

निवडणूक आयोगाने यापूर्वीच मतदार वाढीविषयी वारंवार स्पष्ट उत्तरे दिली आहेत, तरीही दिशाभूल करणारे आरोप करून लोकशाहीची अपकीर्ती करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सातत्याने केला जात आहे, असे या संदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.