भटकळ (कर्नाटक) येथील श्रीमती महादेवी वेंकटापूर यांच्या आजारपणात, त्यांच्या निधनाच्या वेळी आणि निधनानंतर त्यांचा मुलगा अन् सून यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

१.१२.२०२२ या दिवशी भटकळ (कर्नाटक) येथील श्रीमती महादेवी वेंकटापूर (वय ६१ वर्षे) यांचे निधन झाले. त्या रुग्णाईत असतांना, त्यांच्या निधनाच्या वेळी आणि निधनानंतर त्यांचा मुलगा श्री. प्रसन्न वेंकटापूर आणि सून सौ. तेजस्वी वेंकटापूर यांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत. 

(कै.) श्रीमती महादेवी वेंकटापूर

१. श्री. प्रसन्न वेंकटापूर ((कै.) श्रीमती महादेवी वेंकटापूर यांचा मुलगा), भाग्यनगर, तेलंगाणा.

श्री. प्रसन्न वेंकटापुर

‘माझी आई श्रीमती महादेवी वेंकटापूर (वय ६१ वर्षे) भटकळ (कर्नाटक) येथे रहात होती. २०.११.२०२२ या दिवशी तिचा रक्तदाब अधिक (२४० mm Hg) झाल्यामुळे तिच्या मेंदूमध्ये एका बाजूला रक्ताच्या गुठळ्या झाल्या होत्या. (‘निरोगी व्यक्तीचा रक्तदाब १२०/८० mm Hg पेक्षा अल्प असतो.’ – संकलक) आईला ११ दिवस २ रुग्णालयांतील अतीदक्षता विभागात ठेवले. त्यानंतरही तिच्या प्रकृतीत काहीच सुधारणा झाली नाही. १.१२.२०२२ या दिवशी दुपारी २.३८ वाजता आईचे निधन झाले. त्या कालावधीत मला आलेल्या अनुभूती मी श्रीगुरुचरणी अर्पण करतो.

१ अ. ‘रुग्णालयाचा संपूर्ण व्यय करण्याची क्षमता परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिली’, असे जाणवणे : आईला रुग्णालयात अतीदक्षता विभागात ठेवल्यामुळे ‘एवढा व्यय मी एकटा कसा करू शकणार ?’, याची मला अतिशय काळजी वाटत होती. हा विचार मी सूक्ष्मातून गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) सांगितल्यावर माझे काही मित्र आणि नातेवाईक मला आर्थिक साहाय्य करण्यासाठी आले; परंतु ‘रुग्णालयाचा संपूर्ण व्यय करण्याची क्षमता गुरुदेवांनी मला दिली’, असे मला जाणवले.

१ आ. आई रुग्णालयात असतांना मला ‘ऑनलाईन’ भक्तीसत्संग ऐकण्याचीही संधी  मिळाली. 

१ इ. पाकिटातील प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र २ वेळा खाली पडणे आणि त्यानंतर आईची प्रकृती गंभीर होणे : २६.११.२०२२ या दिवशी मी माझ्या पाकिटात ठेवलेले

प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांचे छायाचित्र २ वेळा खाली पडले. त्या वेळी मी त्यांना सूक्ष्मातून विचारले, ‘प.पू. बाबा, आपण मला कोणता संकेत देत आहात ?’ त्यानंतर थोड्याच वेळात मला समजले, ‘आईची प्रकृती गंभीर झाली आहे आणि तिला ‘व्हेंटिलेटर (टीप)’वर ठेवले आहे.

टीप १ – रुग्णाला कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्यास साहाय्य करणारे साधन.

१ ई. तिरुपति येथील ‘नारायणवनम्’ येथे श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यासाठी साड्या विकत घेणे : ऑक्टोबर २०२२ मध्ये आम्ही सहपरिवार तिरुपति बालाजी येथे दर्शनासाठी गेलो होतो. तेव्हा तेथील ‘नारायणवनम्’ येथून आम्ही श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यासाठी २ साड्या विकत घेतल्या होत्या. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ भाग्यनगरला आल्या होत्या. तेव्हा आम्ही त्यांना त्या दोन्ही साड्या भेट दिल्या होत्या.

टीप २ – जेथे तिरुपति श्री वेंकटेश्वर स्वामींचा विवाह  झाला, ते क्षेत्र.

१ उ. आईची प्रकृती गंभीर असतांना ‘आध्यात्मिक आई असलेल्या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना साड्या आवडल्या आहेत’, असा निरोप येणे आणि तो ऐकून भावजागृती होणे : २७.११.२०२२ या दिवशी माझ्या आईला ‘व्हेंटिलेटर’वर ठेवण्यात आले होते. त्याच दिवशी श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) यांचा निरोप आला, ‘त्या दोन्ही साड्या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना पुष्कळ आवडल्या आहेत.’ हा निरोप ऐकून माझी भावजागृती झाली आणि मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. त्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘माझी जन्मदाती आई जरी मला सोडून कायमची दूर जात असली, तरी माझ्या आध्यात्मिक आई (श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ) नेहमी माझ्या समवेत आहेत.’

१ ऊ. आईची गंभीर स्थिती पाहून वाटणारी चिंता परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना केल्यावर दूर होणे : आईला ‘व्हेंटिलेटर’वर ठेवलेले पाहून मला पुष्कळ भीती वाटली आणि माझी चिंता वाढली. त्यासाठी मी माझ्या मनाला स्वयंसूचना दिल्या, तरीही काळजीचे विचार माझ्या मनातून जात नव्हते. त्या वेळी मी गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) संपूर्ण शरण जाऊन प्रार्थना केली, ‘मला या परीक्षेत अनुत्तीर्ण व्हायचे नाही; परंतु या भीतीच्या विचाराला नष्ट करणे माझ्या हातात नाही. पुढे काहीही घडले, तरी मला स्थिर रहाता येऊ दे. प्रभु, मला वर्तमान आणि भविष्य सर्वकाही आपल्या श्री चरणी अर्पण करता येऊ दे. या स्थितीतून आपणच मला बाहेर काढा. मला हे प्रारब्ध स्वीकारता येऊ दे.’ मी ही प्रार्थना केल्यानंतर गुरुकृपेने माझी चिंता न्यून झाली आणि मला धैर्याने पुढची प्रक्रिया करण्यासाठी बळ मिळाले.

१ ए. ‘त्रास सहन करणे’, हे आईचे प्रारब्ध असून ‘ते त्रास पाहून तुझ्या मनाला यातना होणे’, हे तुझे प्रारब्ध आहे’, असे प.पू. भक्तराज महाराज यांनी सूक्ष्मातून सांगणे आणि त्यानंतर मन शांत होणे : आईला होणारे शारीरिक त्रास मला पहावत नव्हते. ‘तिला त्या त्रासातून लवकर सुटका का मिळत नाही ?’, असे मी मनातल्या मनात प.पू. भक्तराज महाराज यांना विचारले. तेव्हा त्यांनी माझ्या लक्षात आणून दिले, ‘हे त्रास सहन करणे’, हे आईचे प्रारब्ध आहे आणि ते त्रास पाहून तुझ्या मनाला ज्या यातना होत आहेत, ते तुझे प्रारब्ध आहे.’ त्यानंतर माझे मन शांत झाले आणि मी मनाने स्थिर राहून काम करू लागलो.

१ ऐ. शेवटी १.१२.२०२० या दिवशी दुपारी २.३८ वाजता अतीदक्षता विभागात माझ्या आईचे निधन झाले. 

१ ओ. आईच्या आजारपणात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पावलोपावली सांभाळणे : या सर्व प्रक्रियेत (१६ दिवसांत) माझी मनःस्थिती ४ – ५ वेळा बिघडली होती; परंतु श्री गुरूंनी मला पावलोपावली सांभाळले. त्यांनी मला सूक्ष्मातून आध्यात्मिक दृष्टीकोन दिले आणि भावनावश होऊ दिले नाही. ‘एका जिवाचा पृथ्वीवरील जीवनाचा कालावधी संपला आहे आणि त्या जिवाला भावपूर्ण रितीने देवाकडे जाऊ द्यायला पाहिजे’, असा विचार करून मी सर्व अंत्यविधी पूर्ण केले.’

२. सौ. तेजस्वी वेंकटापूर ((कै.) श्रीमती महादेवी वेंकटापूर यांची सून), भाग्यनगर, तेलंगाणा.

सौ. तेजस्वी वेंकटापूर

२ अ. लहान मुलाला घेऊन बसने लांब पल्ल्याचा प्रवास करणे कठीण वाटणे; परंतु परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने संपूर्ण प्रवासात कोणतीही अडचण न येणे : ‘सासूबाईंना रुग्णालयात भरती केल्यावर चि. बलराम (माझा मुलगा, वय ५ वर्षे) याला घेऊन मला भाग्यनगरहून भटकळ येथे १५ घंट्यांचा बसचा प्रवास करून जायचे होते. ‘लहान मुलाला घेऊन बसने एवढ्या लांब पल्ल्याचा प्रवास करणे कठीण होईल’, असे मला वाटत होते; परंतु संपूर्ण प्रवासात बलरामला सांभाळण्यात मला कसलीच अडचण आली नाही. गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) प्रत्येक क्षणी आमचे रक्षण केले.

२ आ. घरी जाण्यासाठी माझ्या मनाचा पुष्कळ संघर्ष होत होता. याविषयी मी साधकांशी बोलले. ‘घरातील कामेही साधना म्हणून करायची आहेत’, असा भाव ठेवून मी प्रयत्न केले. त्यामुळे मायेत राहूनही मला तेथील नातेवाइकांचे प्रेम अनुभवता आले.

२ इ. यजमान कठीण प्रसंगीही स्थिर असणे : सासूबाईंची प्रकृती गंभीर होती आणि रुग्णालयात माझे यजमान श्री. प्रसन्न हे एकटेच सर्वकाही पहात होते. त्यानंतरही ते मनाने पुष्कळ स्थिर होते आणि गुरुदेवांच्या कृपेने ते जराही विचलित किंवा भावनाप्रधान झाले नाहीत.

२ ई. माझ्या सासूबाई साधना करत नव्हत्या; परंतु घरात तीव्र आध्यात्मिक त्रास असल्यामुळे आम्ही सासूबाईंना ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप करायला सांगितला होता. मागील ३ – ४ मासांपासून सासूबाई तो नामजप करत होत्या. 

२ उ. सासूबाईंच्या अंत्यविधीच्या वेळी दाब जाणवत नव्हता. सर्व विधी निर्विघ्नपणे वेळेत पार पडले.’    

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक