‘स्व’चे ज्ञान !

‘स्व’च्या ज्ञानाने (आत्मज्ञान) परमशांतीची प्राप्ती होते. शिक्षणाचे ज्ञान वेगळे आणि ‘स्व’चे ज्ञान वेगळे आहे. ऐहिक शिक्षणाचे ज्ञान पोट भरण्याच्या कामी येते. त्याची आवश्यकता आहे; पण आत्मिक ज्ञानाची त्याहून अधिक आवश्यकता आहे. ऐहिक ज्ञान हिटलरकडेही होते; पण आत्मशांती नव्हती. तो स्वतःही दुःखी होता आणि दुसर्‍यांनाही दुःखाच्या, मृत्यूच्या दारी पोचवत होता. ऐहिक ज्ञान कंस आणि रावणाकडे होते; पण स्वतःला शांत करण्याचे ज्ञान नव्हते. श्रीकृष्णामध्ये ऐहिक ज्ञानही आहे आणि ‘स्व’ला आनंदीत, शांत अन् समाधीस्थ करण्याचे ज्ञानही आहे. श्रीरामामध्ये ऐहिक ज्ञानही आहे आणि ‘स्व’ला शांत करण्याचे सामर्थ्यही आहे. पूर्ण जीवन त्यांचेच असते, जे आत्मशांती मिळवणे जाणतात. कार्य करण्याच्या पूर्वी आणि कार्य केल्यानंतरही शांती असते. कार्य अशा पद्धतीने करा की, तुम्हाला जेव्हा वाटेल, तेव्हा परमशांतीचा आस्वाद घेऊ शकाल. जेव्हा वासनेच्या अधीन होऊन कर्म करता, तेव्हा भय, अशांती, उद्वेग आणि चिंता तुमच्या शक्ती क्षीण करून टाकतात. जेव्हा वासना सोडून कर्तव्य समजून कर्म करता, फळाची आकांक्षा ठेवत नाही, तेव्हा तुम्हाला शांती, सामर्थ्य, प्रसन्नता आणि निश्चिंतता इत्यादी सद्गुण येऊन मिळतात.’ (साभार : ‘ऋषीप्रसाद’, मे २०२१)