
‘केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ’ (सी.बी.एस्.ई.) आणि ‘इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन’ (आय.सी.एस्.ई.) यांच्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास केवळ ४ ओळींमध्ये शिकवला जात होता अन् मोगलांच्या इतिहासावर मात्र मोठे धडे देण्यात आलेले होते. महाराजांचा जाज्ज्वल्य पराक्रम दडपण्याचा आणि भारतियांच्या क्षात्रवृत्तीचे खच्चीकरण करण्याचाच हा भाग होता. त्यामुळे इंग्रजाळलेल्या नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचे महत्त्वच लक्षात येत नाही. या मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्ण नावही सांगता येत नाही इतकी लाजिरवाणी स्थिती असते. वरील केंद्रीय शिक्षण मंडळांमुळे महाराष्ट्राचा इतिहास जाणूनबुजून पुसण्याचा प्रयत्न केला जात होता. सध्याची अशी शिक्षणव्यवस्था देशाला महासत्ता बनवण्यापासून काही वर्षे लांब घेऊन गेली. जी स्वदेश, स्वधर्म विद्यार्थ्यांना विसरायला लावून केवळ पाश्चात्त्य बनवण्याकडे झुकली आहे. भारतात हिंदूंच्या इतिहासाचे खर्या अर्थाने पुनरुज्जीवन करायचे असेल, तर छत्रपतींचा इतिहास लिहिला आणि वाचला पाहिजे. या इतिहासात मातृऋण आणि देशऋण फेडण्याची शक्ती आहे.
ज्या मोगलांनी भारतावर आक्रमण करून प्रचंड नरसंहार केला, हिंदु महिलांवर बलात्कार केले, मंदिरे नष्ट केली, अशा आक्रमकांना नायक ठरवण्याचा प्रयत्न देशात उघड उघड झाला आणि होत आहे. देशात आजही अनेक गावे, शहरे, रस्ते आदींना अकबर, बाबर, औरंगजेब, गझनी आदी इस्लामी आक्रमकांची नावे आहेत. ज्याने भारताची अमाप लूट केली, अशा ‘वास्को द गामा’चे नाव गोवा राज्यातील एका शहराला आजही आहे. अलीकडच्या काही वर्षांत तर कर्नाटक आणि अन्य ठिकाणी लाखो हिंदूंचे धर्मांतर करणारा अन् असंख्य हिंदु महिलांची अब्रू लुटणारा क्रूरकर्मा टिपू सुलतान याची जयंती साजरी केली जात आहे. अत्याचारी अकबराचे उदात्तीकरण करून त्याची चांगली प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज नसते, तर हिंदुस्थानचे इस्लामीकरण झाले असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी व्यवस्थापनशास्त्राला दूरदृष्टीची जोड देऊन स्वराज्य निर्माण केले. आज ३९६ वर्षांनंतरही छत्रपतींचे आदर्श विचार जिवंत आहेत. सिंगापूरमधील शालेय अभ्यासक्रमातही छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचा उल्लेख आहे. व्हिएतनामचा आदर्श म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत ! केवळ महाराष्ट्र वा भारतातच नाही, तर संपूर्ण विश्वात अतुलनीय, अद्वितीय, अलौकिक असा दुसरा शिवाजी राजा सापडणे अवघड आहे. त्यामुळे त्यांच्या खर्या इतिहासाचे गुणगान सतत व्हायला हवे !
– सौ. अपर्णा जगताप, पुणे