‘उपशामक काळजी (पॅलिएटिव्ह केअर)’ या विषयावर नागेशी देवस्थानात झाला परिसंवाद !

रुग्णांच्या मन:स्वास्थ्यासह आध्यात्मिक साधनेच्या आवश्यकतेवर डॉक्टरांचा भर !

डावीकडून श्री. प्रवीण काकोडे, डॉ. दत्ताराम देसाई, डॉ. पियुष गुप्ता, डॉ. वल्लभ धायमोडकर, श्री. सागर जावडेकर, श्री. प्रमोद आचार्य आणि श्री. दामोदर भाटकर

नागेशी (फोंडा), ७ फेब्रुवारी (वार्ता.) – येथील श्री नागेशी महारुद्र देवस्थानात ‘उपशामक काळजी (पॅलिएटिव्ह केअर)’ या महत्त्वपूर्ण विषयावर ७ फेब्रुवारीच्या सायंकाळी परिसंवाद पार पडला. याला राज्यातील अनेक डॉक्टर, परिचारिका, तसेच अन्य नामवंत मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाचा आरंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष ‘प्रूडंट मीडिया’चे संपादक श्री. प्रमोद आचार्य, मुख्य अतिथी दैनिक ‘तरुण भारत’चे संपादक श्री. सागर जावडेकर, ‘डॉ. वल्लभ धायमोडकर फाऊंडेशन’चे संस्थापक डॉ. वल्लभ धायमोडकर, ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’चे गोवा राज्याचे अध्यक्ष डॉ. दत्ताराम देसाई, ‘श्री नागेशी महारुद्र संस्थान’चे अध्यक्ष श्री. दामोदर भाटकर, ‘ग्लोबल चेंबर ऑफ सारस्वत एन्टरप्रेनूअर्स’चे अध्यक्ष श्री. प्रवीण पै काकोडे आणि ‘नॅशनल असोसिएशन ऑफ पॅलिएटिव्ह केअर अँड इंटिग्रेटिव्ह मेडिसीन’चे (‘नॅपकॅम’चे) राष्ट्रीय सचिव डॉ. पियुष गुप्ता या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला. परिसंवादात मरणासन्न अवस्थेत असलेल्या रुग्णांना मन:स्वास्थ्य प्रदान करण्यासह त्यांनी आध्यात्मिक साधना करण्याच्या आवश्यकतेवर विविध डॉक्टरांनी त्यांच्या संभाषणात भर दिला.

१. ‘श्री नागेशी महारुद्र संस्थान’, ‘डॉ. वल्लभ धायमोडकर फाऊंडेशन’, ‘सारस्वत चेंबर’, ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ आणि ‘नॅपकॅम’ या संस्थांनी परिसंवादाचे आयोजन केले होते.

२. उद्घाटन सत्रात मान्यवरांनी केलेल्या भाषणात ‘उपशामक काळजी’ या विषयावर थोडक्यात प्रकाश टाकत या वैद्यकीय शाखेच्या आवश्यकतेवर भर दिला. सध्याच्या जगात कुटुंबसंस्था अत्यंत सीमित होत चालली असून रुग्णांची काळजी घेतली जाणे, त्यांना प्रेम आणि वेळ देणे, त्यांना मानसिक आधारासह आध्यात्मिक दिशा देणे अधिक आवश्यक झाले आहे. या दृष्टीकोनातून ‘उपशामक काळजी’ शाखेला प्राधान्य दिले गेले पाहिजे.

३. तरुण भारत’चे संपादक प्रकाश जावडेकर म्हणाले की, डॉक्टर हे देवदूतासम असून त्यांच्यात ‘हृदय’ असणे आवश्यक आहे. यासाठी डॉक्टर झटत असून ते ‘उपशामक काळजी’ ही कठीण असलेली कृती सहजपणे करू शकतात.

४. ‘प्रूडंट मीडिया’चे संपादक प्रमोद आचार्य म्हणाले की, फोंड्यातील ‘दिलासा पॅलिएटिव्ह केअर’सारखे उपक्रम गोव्यातील प्रत्येक तालुक्यात चालू झाले पाहिजेत.

५. डॉ. दत्ताराम देसाई यांनी ‘आय.एम्.ए. फोंडा’ शाखेचे कौतुक करत सांगितले की, राज्यातील सर्वांत कृतीशील आणि अनेक उपक्रम करणारी ही शाखा आहे.

६. डॉ. वल्लभ दायमोडकर यांना या वेळी वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कार्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

७. परिसंवादात डॉ. वल्लभ धायमोडकर, ‘हॅपी टू एज’च्या संस्थापक संचालिका सुगंधी बळिगा, ‘सहभाव’ संस्थेच्या संचालिका डॉ. मिनी पानिकर, तसेच डॉ. निधी अग्नी यांनी संबोधित केले.

८. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मीना परुळेकर यांनी, तर आभारप्रदर्शन डॉ. वंदना पाटणकर यांनी केले. कार्यक्रम श्री नागेशी महारुद्र देवस्थानातील मयुरेश सभागृहात पार पडला.

उपशामक काळजी म्हणजे काय ?

उपशामक काळजी, म्हणजेच ‘पॅलिएटिव्ह केअर’ ही तुलनात्मकदृष्ट्या कमी प्रचलित असलेली वैद्यकीय शाखा आहे. भारतात गेल्या काही वर्षांपासून ती मूळ धरत असून यांतर्गत बरे न होणारे आजार असलेले असे रुग्ण ज्यांची घरी काळजी घेणे शक्य होत नाही, त्यांच्या मन:स्वास्थ्यासाठी, तसेच त्यांचा मृत्यू सहजपणे व्हावा, यासाठीचे वैद्यकीय शास्त्र म्हणजे ‘उपशामक काळजी’ !

संपादकीय भूमिका

मानवी जीवनात अध्यात्माखेरीज तरणोपाय नाही, हे आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या जगतातही डॉक्टरांसारख्या बुद्धीमंतांनाही लक्षात येऊ लागले आहे. हे लक्षात घेता सरकारने शालेय जीवनापासून व्यावहारिक शिक्षणासमवेत अध्यात्माचे धडे शिकवून मुलांकडून साधना करून घेतली पाहिजे. यानेच दु:ख भोगण्याची क्षमता वृद्धींगत होण्यासह सुदृढ समाजनिर्मिती शक्य आहे, हे लक्षात घ्या !