महाकुंभपर्वात स्नान करणार्‍या भाविकांची संख्या ४० कोटी पार !

योगी सरकारचा अंदाज ठरला अचूक

प्रयागराज, ७ फेब्रुवारी (वार्ता.) – महाकुंभपर्वात आतापर्यंत सहभागी भाविकांची संख्या ४० कोटींच्या वर गेली आहे. महाकुंभपर्वाच्या आधीपासूनच शासनाने ‘या महाकुंभपर्वास ४० कोटी भाविक येतील’, असे वारंवार सांगितले आणि ठामपणे सांगितले होते. अनेकांनी याविषयी शंका उपस्थित केल्या होत्या; परंतु शासनाने मात्र ४० कोटींच्या वर भाविक येतील, असे सांगितले. आता प्रत्यक्षातही ही संख्या ४० कोटींच्या वर गेली आहे. ७ फेब्रुवारी या एकाच दिवशी सायंकाळी ४ वाजेपर्यंत ७८ लाख ७८ सहस्र भाविकांनी संगमात स्नान केले. या आकडेवारीसह ही संख्या ४० कोटींच्या वर गेली आहे.

नवा विक्रम !

यापूर्वी कुंभपर्वात वर्ष २०१३ मध्ये १३ कोटी, तर वर्ष २०१९ मध्ये २४ कोटी भाविक आले होते. आता वर्ष २०२५ मधील महाकुंभपर्वात आतापर्यंत ४० कोटींहून अधिक भाविक आल्याने गर्दीचा नवा विक्रम नोंदवला गेला आहे. त्रिवेणी संगमात स्नान करण्यासाठी आजही मोठ्या संख्येने भाविक येत आहेत. १३ जानेवारीला चालू झालेला महांकुभ २६ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. त्यामुळे भाविकांची एकूण संख्या ५० कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.