गंगापूर येथे प्रथमच ‘महाराष्ट्र इको ग्लॅम्पिंग महोत्सवा’चे आयोजन

  • पर्यटन विभागाचा उपक्रम !

  • ३१ मार्चपर्यंत महोत्सव चालू !

नाशिक – येथील गंगापूर येथे पर्यटन विभागाकडून प्रथमच ‘महाराष्ट्र इको ग्लॅम्पिंग महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले असून यात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे. ३१ मार्च २०२५ पर्यंत हा महोत्सव असेल.

ते म्हणाले,

१. वर्ष २०२७ मध्ये नाशिक शहर आणि त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. देशपातळीवरचा हा धार्मिक सोहळा असल्याने मोठ्या संख्येने भाविक येथे येणार आहेत. सर्व यंत्रणांकडून त्याचे सूक्ष्म नियोजन असणे आवश्यक आहे. या कुंभमेळ्याच्या आयोजनच्या पूर्वसिद्धतेच्या दृष्टीने हा महोत्सव असून यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे.

२. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर ‘रिलिजिअस हब’ (धार्मिक केंद्र) म्हणून विकसित व्हावे’, असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मानस आहे. या दृष्टीने तीर्थक्षेत्र पर्यटनाद्वारे नाशिक आधुनिक शहर होण्यासाठी पर्यटन संचालनालयाकडून अधिकाधिक प्रयत्न करण्यात येणार आहे.

ग्लॅम्पिंग महोत्सवात काय असेल ?

१. पर्यटकांसाठी विविध श्रेणीच्या तंबू निवास व्यवस्थेची उभारणी, स्थानिक संस्कृतीचे दर्शन, पॅराग्लायडिंग, पॅरामोटरिंग, जलक्रीडा, गिर्यारोहण (‘ट्रेकिंग’), पर्वतारोहण (‘रॉक क्लाइंबिंग’), घोडेस्वारी असे विविध साहसी उपक्रम राबवण्यात येत आहेत.

२. स्थानिक बचतगटांचे हस्त कलाकृतींचे प्रदर्शन आणि विक्री दालन असून स्थानिक खाद्यसंस्कृती, तसेच खाद्य महोत्सव दालनही आहे. नाशिक परिसरातील विविध प्रेक्षणीय स्थळे, पुरातन मंदिरांचे दर्शन अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी पर्यटकांसाठी विविध श्रेणींतील निवास व्यवस्था उपलब्ध आहे.

३. भागधारक, ट्रॅव्हल एजन्सीचे प्रतिनिधी, टूर ऑपरेटर आणि समाजिक माध्यमांचे प्रभावक (इन्फ्ल्युएन्झर)  यांच्यासाठी परिचय सहलीचे आयोजन केले जाईल.

४. पर्यटन क्षेत्राशी निगडित भागधारक, व्यावसायिक आणि प्रवासी मध्यस्त (‘ट्रॅव्हल एजंट’) यांचा सहभाग असलेल्या परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

नाशिक या धर्मस्थळी आध्यात्मिक किंवा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन, प्रदर्शनी आदींचे भाविकांसाठी प्रेरणादायी ठरेल !