
काशी येथील पंडित प्रवर गणेश्वरशास्त्री द्रविड यांना २६ जानेवारी या दिवशी ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा जणू त्या पुरस्काराचाच सन्मान होय. वेदोपनिषद वा पुराण यांची वचने त्यांच्या मुखी सहज असतात. न्याय, ज्योतिष आदींचा अफाट अभ्यास असणार्या गुरुजींनी श्रीराम जन्मभूमीची ‘प्रमाणे’ न्यायालयासमोर मांडली होती. शेकडो पृष्ठांमध्ये सामावलेली ही ‘प्रमाणे’ असलेली त्यांची पिशवी एका प्रवासात भाग्यनगर रेल्वेस्थानकावरून चोरीला गेली. एखादा माणूस अशा गोष्टीमुळे हताश झाला असता; पण ‘डोक्यात असलेले कोण चोरणार ?’ असे म्हणत त्यांनी पुनश्च बैठक मारून शेकडो पृष्ठे पुन्हा लिहून काढली आणि ती न्यायालयासमोर सादर केली. पुढचा इतिहास आपणा सर्वांना ज्ञात आहेच !

अत्यंत निगर्वी असून मृदू भाषेत ठाम प्रतिपादन करण्याची त्यांची शैली विशेष आहे. कटीला धोतर आणि अंगावर केवळ शाल असा त्यांचा वेष असतो. ते अनवाणी फिरतात. काशीच्या सांगदेव विद्यालयाचे ते सर्वेसर्वा आहेत. तेथील वाचनालयात ६० सहस्र ग्रंथ आहेत. आजवर गुरुजींची ७-८ वेळा भेट झाली असून त्यांच्या सहवासात कित्येक घंटे घालवता आले, हे आमचे भाग्य !
जानेवारी २०१९ मध्ये त्यांच्या शुभहस्ते आम्ही पितापुत्रांनी (डॉ. सच्चिदानंद शेवडे आणि डॉ. परिक्षित शेवडे यांनी) लिहिलेल्या ‘राममंदिरच का ?’ या पुस्तकाचे प्रकाशन परभणी येथे झाले होते.