रत्नागिरीत क्षेत्रिय वैदिक संमेलनाचे शानदार उद्घाटन !

रत्नागिरी : संस्कृत ही भारताची पुरातन भाषा आहे. तिचे संवर्धन होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यापलीकडे जाऊन आधुनिक काळातील प्रश्न सोडवण्यासाठी या भाषेचा आणि त्यातील वाङ्मयाचा उपयोग होतो का ? आधुनिक काळातील ताण-तणावाच्या जीवनात स्वास्थ्य मिळवण्यासाठी संस्कृत वाचन, पठणातून काही उपाययोजना करता येते का ? याचे संशोधन व्हायला हवे, असे प्रतिपादन रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले. येथील क्षेत्रिय वैदिक संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
उज्जैन येथील महर्षि सांदीपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठान आणि रामटेक येथील कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरीतल्या भारतरत्न डॉ. पां.वा. काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्राच्या वतीने ३ दिवसांचे वैदिक संमेलन आजपासून माधवराव मुळ्ये भवनात चालू झाले. या संमेलनाला महाराष्ट्र, मध्यप्रदेश, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशमधून अनुमाने १०० प्रतिनिधी उपस्थित आहेत.
पोलीस अधीक्षक कुलकर्णी पुढे म्हणाले की,
जर्मनीत संस्कृत अभ्यास केंद्र आहे. ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याकडे दिवाळीत संस्कृत पूजा केली. व्हाईट हाऊसमध्येही वैदिक मंत्रोच्चारण केले गेले. मी लहानपणी रेडिओवर संस्कृतच्या बातम्या ऐकायचो. संस्कृत भाषा संगणकाला पुष्कळ उपयुक्त आहे. तिचा आधुनिक शास्त्रात वापर करता येतो. रामायण, महाभारत, भगवद्गीता, वैदिक मंत्र, स्तोत्र यांचा उपयोग आपण करतो. वैज्ञानिक भाषा म्हणून आधुनिक पद्धतीने सांगड घातली पाहिजे. संस्कृत व्याकरण म्हणजे गणितीय आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेतही (ए.आय.) संस्कृतचा उपयोग होऊ शकतो.
पुणे विद्यापिठाचे माजी विभागप्रमुख गणेश थिटे यांनी ४० वर्षांपूर्वी वर्ष १९८५ मध्ये पुण्यात झालेल्या पहिल्या वैदिक संमेलनाची माहिती दिली. हरिद्वार येथे अलीकडेच झालेल्या एका संमेलनात सैन्यातील निवृत्त अधिकारी असलेल्या उत्तराखंडच्या राज्यपालांनी सैन्यात असतांना सैनिकांना वेदांपासून कशी स्फूर्ती मिळते ? हे सांगितल्याची आठवण श्री. थिटे यांनी सांगितली.
कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरु प्रो. हरेराम त्रिपाठी म्हणाले की,
संस्कृत हा भारताचा आत्मा आहे, तर वेद हा संस्कृतचा आत्मा आहे. त्यामुळेच जगभरात कुठेही लिखित स्वरूपात पुरातन संस्कृत साहित्य असेल, तर ते जतन करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठरवले आहे. जगभरातील सर्व संप्रदायांचे मूळ वेदांत आहे. मंत्रांच्या उच्चारणामुळे चारही दिशांमध्ये सकारात्मकता पसरते. असंख्य जिवांचे रक्षण करण्याची ताकद वेदांमध्ये आहे. वेद सर्वशक्तीमान आहेत. वेदांचे अर्थासह पठण करणे आवश्यक आहे.
रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक दिनकर मराठे म्हणाले की,
या संमेलनात चारही वेदांचे पारायण होणार आहे. वेदपाठशाळांचे संवर्धन करण्याचे महर्षि सांदीपनी प्रतिष्ठान आणि कालिदास विश्वविद्यालयाचे उद्दिष्ट आहे. वेदविद्येचा प्रचार करण्याचे काम दोन्ही संस्था करत आहेत. भारताचा आत्मा वेद आहे. संस्कृत संवर्धन म्हणजे राष्ट्रहित साधणारे आहे.
या कार्यक्रमाला महर्षि सांदीपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठानचे दत्तदास शेवडे, राहुल दाभाडे, चिदानंद शास्त्री, धर्मेंद्र बारूड, डॉ. अंबरिष खरे आदी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनानंतर माधवराव मुळ्ये भवन, रत्नागिरी कर्हाडे ब्राह्मण संघाचे राणी लक्ष्मीबाई सभागृह, वेद पाठशाळा आणि गोविंद कृष्ण रानडे संस्कृत पाठशाळेत ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या चारही वेदांमधील ऋचांचे पारायण करण्यात आले.

पारंपरिक वेशभूषेत वैदिक शोभायात्रेने दिला वेद रक्षणाचा संदेश !

रत्नागिरी : ‘शिकवण आहे वेदांची नदी माता सगळ्यांची’, ‘वेद शिका’, ‘वेद वाचा देश राखा’ अशा घोषणा देत आणि फलक प्रदर्शित करत ७ फेब्रुवारी या दिवशी शहरात वेदांचा जागर करण्यात आला. निमित्त होते क्षेत्रीय वैदिक संमेलनाचे. कपाळी टिळा, पांढरे धोतर, उपवस्त्र, भगवी टोपी अशा पारंपरिक वेशभूषेतील पुरोहित, वेदाध्ययन करणारे तरुण आणि ज्येष्ठ या शोभायात्रेत सहभागी झाले. या वेळी भगवा ध्वज आणि पताकाही फडकत होत्या. या वेळी फलकांतून वेदजागरण करण्यात आले.

शोभायात्रेचे उद्घाटन श्रीफळ वाढवून विश्वविद्यालयाचे कुलगुरु प्रो. हरेराम त्रिपाठी यांनी केले. याप्रसंगी ज्येष्ठ वेद अभ्यासक डॉ. गणेश थिटे, प्रा. अंबरिष खरे, डॉ. दिनकर मराठे आदी मान्यवर उपस्थित होते. झाडगाव येथील माधवराव मुळ्ये भवन येथून चालू झालेली शोभायात्रा टिळक आळी, आठवडा बाजारामार्गे राम आळी, गोखले नाका, लक्ष्मीचौक येथून परत पोचली.
महर्षि सांदीपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठान (उज्जैन) आणि कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे (रामटेक) भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्राने क्षेत्रीय वैदिक संमेलनाचे आयोजन केले. उद्घाटनापूर्वी सकाळी दीड तास ही शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये वेदांचे पठण करणारे पुरोहितही सहभागी झाले होते. शोभायात्रेच्या प्रारंभी देवीच्या रूपातील वेशभूषा केलेल्या तरुणांच्या ढोलपथकाने सर्वांची वाहवा मिळवली.