
सध्या चालू असलेल्या महाकुंभमेळ्यात गेल्या २५ दिवसांत जवळपास ४० कोटी लोकांनी त्रिवेणी संगमात ‘श्रद्धेची डुबकी’ घेतली. पुढील ३ आठवड्यांत ही संख्या ५० कोटींपर्यंत गेल्यास आश्चर्य वाटायला नको. या सर्व श्रद्धावंतांचे नशीबच म्हणायचे की, कुणा पुरो(अधो)गामी संघटनेने लक्षावधी वर्षांच्या ‘संगमस्नाना’च्या परंपरेला जलप्रदूषणाचे कारण देत विरोध केला नाही. अर्थात् जागतिक इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेला संख्यात्मक आणि श्रद्धात्मक संघटनाचा परिणाम म्हणून कि काय; परंतु हिंदुद्वेषाचा कंड शमवणार्यांना तो शमवण्याची ही वेळ त्यांच्या हिताच्या दृष्टीकोनातून चुकीची वाटली असावी. काहीही झाले, तरी चहूबाजूंनी हिंदूंवर आक्रमणे होत असण्याच्या नि बौद्धिक आतंकवादातून हिंदूंची मने कलुषित करण्याचा प्रयत्न होत असण्याच्या या युगात या महाकुंभमेळ्याकडे हिंदु पुनरुत्थानाच्या दिशेने एक महत्त्वाचा मैलाचा दगड म्हणून पहाता येईल. त्यात शेकडो वर्षांचा सांस्कृतिक इतिहास लाभलेल्या केरळच्या मंदिरांमधील हत्तींच्या वापरावर मात्र पुरो(अधो)गाम्यांकडून कुठाराघात केला जात आहे.
‘पेटा’, म्हणजेच ‘पीपल फॉर दी एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स’ (प्राण्यांना नैतिक पद्धतीने वागवण्यासाठी प्रयत्नरत लोक) या संघटनेने मंदिरांच्या उत्सवांत हत्तींच्या वापराला विरोध दर्शवला आहे. यासाठी संघटनेने केरळची सांस्कृतिक राजधानी असलेल्या त्रिशूरमधील कोंबारा श्रीकृष्ण स्वामी मंदिराच्या उत्सवासाठी ‘कोंबारा कन्नन’ नावाचे हत्तीच्या आकाराएवढे एक खेळणे भेट दिले आहे. यंदाच्या उत्सवात या ‘हत्ती’रूपी खेळण्याला प्रदर्शित करण्यात आले. त्याचे वजन ८०० किलो असून विजेवर चालणारा हा हत्ती त्याचे कान, सोंड, शेपूट हालवू शकतो. यासमवेतच तो सोंडेने लोकांवर पाणीही शिंपडू शकतो. मंदिर संस्कृतीला छेद देण्याचा हा प्रयत्न असून ‘पेटा इंडिया’ आणि सितारवादक अनुष्का शंकर यांनी हे खेळणे मंदिराला दान स्वरूपात दिले आहे. ‘पेटा’चे म्हणणे आहे की, मंदिरांच्या उत्सवांमध्ये हत्तींचे प्रदर्शन केले जाते, त्याच्या भोवती मोठ्या प्रमाणात लोकांचा गराडा असतो. त्यामुळे मुक्या प्राण्याला त्रास होतो. हिंदूंच्या परंपरांना नीच लेखणे, ही ‘पेटा’ची प्रथा राहिली आहे; परंतु आता त्याने चक्क वास्तविक हत्तीप्रमाणे हुबेहूब दिसणारे खेळणे देऊन हिंदु परंपरेवर अतिक्रमण चालवले आहे. यास हिंदूंकडून प्रखर विरोध होत असला, तरी त्याची व्याप्ती वाढली पाहिजे.
इतिहास !

हत्तींचे केरळच्या मंदिर संस्कृतीतील स्थान हे अनन्यसाधारण राहिले आहे. याचा इतिहास पाहिला, तर ‘अष्टमीप्रबंध’ नावाच्या १६ व्या शतकातील मेलपाथूर नारायण भट्टाथिरी यांनी लिहिलेल्या पुस्तकात ‘मंदिर संस्कृती आणि हत्ती यांच्या अविभाज्य संबंधा’चा उल्लेख आढळतो. यातून हत्तींची मिरवणूक काढण्याचा इतिहास किमान ५०० वर्षे प्राचीन आहे, असे म्हणायला हरकत नाही. त्रिशूरमधील ‘थिरूवामबाडी देवस्वम् बोर्डा’चे माजी अध्यक्ष आणि मंदिरांशी ३५ वर्षांहून अधिक काळ संलग्न असलेले प्रा. एम्. माधवन्कुट्टी यांनी हत्तींच्या महत्त्वावर सखोल अभ्यास केला आहे. ते म्हणतात, ‘मंदिरांच्या उत्सवांत, तसेच ‘सिवेली’ या प्रतिदिनच्या एका प्रथेमध्ये हत्तीचा उपयोग केला जाई. ‘सिवेली’चा अर्थ आहे की, प्रतिदिन ३ वेळा मंदिरातील उत्सवमूर्तीच्या प्रतिमेला हत्तीवर ठेवून मंदिराभोवती प्रदक्षिणा घालणे !’ यातून केरळच्या धार्मिक मंदिर संस्कृतीत हत्ती हा प्राणी एक अविभाज्य घटक असल्याचे लक्षात येते. एवढेच नाही, तर महर्षि पलकाप्या यांनी ‘गजशास्त्र’ नावाचा ‘हत्ती’ या प्राण्याची आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे काळजी घेण्यावर चक्क एक ग्रंथ लिहिला आहे. जागतिक स्तरावर हत्तींचे अभ्यासक या पुस्तकाला ‘सत्यनिष्ठ संदर्भ’ म्हणून मान्यता देतात. त्यामध्ये माहुतांनी स्वत:ला कशा प्रकारे प्रशिक्षित केले पाहिजे, यावर विस्ताराने प्रायोगिक स्तरावरील गोष्टी सूत्रबद्ध करण्यात आली आहेत.
केरळच्या समृद्ध मंदिर परंपरेच्या अंतर्गत चालणारे उत्सव वर्षातील ५ महिने चालतात. त्यात हत्तींचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. आताच्या निधर्मी सरकारांकडून हत्तींसंबंधीच्या कायद्यांमुळे हत्तींची संख्या न्यून झाल्याने मंदिरांमधील आहे त्या हत्तींवर ताण पडत आहे, हे सूत्र नाकारता येणार नाही. इतिहास डोकावल्यास मंदिरांची काळजी वहाणारे केरळचे राजेशाही परिवार हत्तींची अत्यंत कष्टाने काळजी घेत आले आहेत. वेळोवेळी त्यांना तेलाने अंघोळ घालणे, नारळाच्या काथ्याने (मल्याळम् भाषेत ‘चकिरी’ने) त्यांचे शरीर स्वच्छ करणे, पौष्टिक अन्न देणे, आजारी असतांना आयुर्वेदिक औषधे पुरवणे आदी अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांची काळजी घेण्याची ही परंपरा आजतागायतही काही प्रमाणात अस्तित्वात आहे. प्राण्यांची काळजी कशा प्रकारे घेतली जावी, याचा आदर्श जगासमोर ठेवण्याची आणि त्याला प्रोत्साहित करण्याची संधी ‘पेटा’ला होती; परंतु मुळात ही हिंदूंची परंपरा असल्याने ‘पेटा’ला अजीर्ण झाले असावे. त्यामुळे हे खेळणे, म्हणजे हिंदूंच्या या परंपरेला फाटा देण्याचा ‘पेटा’चा कुटील डाव !
‘धर्म’ग्रहण !
हत्तीचे खेळणे भेट देण्यात ‘पेटा’समवेत अनुष्का शंकर नावाच्या कुणा सतारवादिकेचा अभ्यास करता लक्षात येते की, त्या ‘भारतरत्न’प्राप्त जगप्रसिद्ध सतारवादक रविशंकर यांच्या कन्या होत. रविशंकर स्वत: संगीत क्षेत्रात नावाजलेले असले, तरी ते धार्मिक आणि आध्यात्मिक विचारसरणीचे होते. २० व्या शतकातील प्रसिद्ध भक्तीयोगी संत आनंदमयी मां यांचे ते नि:स्सीम भक्त होते. असा वारसा प्राप्त असलेल्या; परंतु ब्रिटनमध्ये वाढलेल्या अनुष्का यांच्या विचारसरणीवरील हिंदुद्वेषाचा पगडा धक्कादायक आहे. ज्या मंदिरात ‘हत्ती’रूपी खेळण्याची मिरवणूक काढण्यात आली, त्या कोंबारा श्रीकृष्ण स्वामी मंदिराचे अध्यक्ष रवि नंबूथिरी यांनी या खेळण्याचे स्वागत करत ‘पेटा’चे आभार मानले आहेत. ते म्हणाले, ‘‘आम्हाला स्पष्टपणे वाटते की, मंदिरांच्या उत्सवांत हत्तींशी चुकीचा व्यवहार केला जातो. त्यामुळे म्हणे, हे पाऊल स्वागतार्ह आहे !’’ रविशंकर यांसारख्यांच्या पोटी अनुष्का यांसारखे जीव निपजणे आणि मंदिरांच्या समित्यांवर हिंदुद्रोही नि परंपराद्वेष्टे अध्यक्ष नेमले जाणे, हे धर्मावरील ग्रहण नव्हे का ? बकरी ईदच्या वेळी सहस्रो बकर्यांच्या ‘कुर्बानी’च्या विरोधात चकार शब्दही न काढणारी ‘पेटा’ हत्तींप्रमाणे बकर्यांची खेळणी बनवून मुसलमानांना भेट देण्याचे धाडस का दाखवत नाही ? केरळमधील अनेक चर्च आणि मशिदी यांच्या उत्सवांतही हत्तींची मिरवणूक काढण्याच्या परंपरेला ‘पेटा’ विरोध का करत नाही ? अशा हिंदुद्वेष्ट्यांच्या प्रयत्नांना खीळ बसावी, यासाठी केंद्र सरकारनेच ‘पेटा’ला देशविघातक ठरवून तिला देशातून हद्दपार केले पाहिजे आणि गौरवशाली प्रथा-परंपरांना प्रोत्साहन देत धर्मरक्षणाचा वसा उचलून धरला पाहिजे !
केरळ मंदिर संस्कृतीचा अविभाज्य घटक असलेल्या हत्तींऐवजी त्यांचे खेळणे दान देणार्या ‘पेटा’ला आता देशातून हद्दपार केले पाहिजे ! |