‘प.पू. डॉक्टरांनी काही विषयांवर मला लिखाण करायला सांगितले होते. त्यासाठी त्यांनी मला पुष्कळ प्रोत्साहनही दिले; परंतु तरीही माझ्याकडून ते लिखाण होत नव्हते. याविषयीचा लेख आपण ७ फेब्रुवारी या दिवशी पाहिला. त्यानंतर त्यांनी माझ्या एका चुकीबद्दल सांगितलेले प्रायश्चित्त आणि मी अखंड क्षमायाचना केल्यावर त्यांच्यात झालेले परिवर्तन आजच्या या उर्वरित भागात देत आहे. यावरून ‘शरणागतीच्या शस्त्राने देवांनाही जिंकता येते’, हे लक्षात येईल. (भाग ३)
लेखाचा भाग २ पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/882162.html

वेळच्या वेळी लिखाण करून आणि ते पुढे देऊन गुरुमाऊलींचे मन जिंकूया !

‘एखाद्याकडून लिखाण करवून घेण्याविषयी प.पू. डॉक्टरांच्या चिकाटीचे आणि प्रीतीचे मी जे काही प्रसंग इथे लिहिले आहेत, ते प्रातिनिधिक स्वरूपाचे आहेत. ‘प.पू. डॉक्टरांनी लिखाण करायला सांगणे’, हे केवळ माझ्यासाठीच नाही, तर सनातनच्या प्रत्येक साधकासाठी आहे आणि त्यासाठी प्रोत्साहन देणारेही तेच आहेत. त्यांच्यामुळे आज जवळपास प्रत्येक साधकाला स्वतःला आलेल्या अनुभूती, त्रास, शिकायला मिळालेली सूत्रे, सुचलेल्या कविता, राष्ट्र-धर्म यांवरील किंवा विविध विषयांवर आधारित लेख, समाजात किंवा आपल्या सभोवताली घडणार्या घटनांवर आपले अभिप्राय, सूक्ष्मातून ज्ञान प्राप्त करून त्यासंबंधीचे केलेले लिखाण, हे आणि इतर सर्व प्रकारचे लिखाण करायची सवय लागली आहे. यासाठी साधकांना त्यांनीच प्रोत्साहन दिले आणि ते अजूनही देत आहेत अन् लिहूनही तेच घेत आहेत. त्यांची चिकाटी इतकी असते की, ते केवळ सांगून थांबत नाहीत, तर स्वतः पाठपुरावा घेतात. ‘अमुक अमुक यांना विचार, त्यांना हे लिखाण करायला सांगितले होते, ते त्यांनी केले का?’, तसेच एखादे लिखाण आवडल्यावर संबंधित साधकांना खाऊ द्यायला सांगतात. खाऊ देतांना त्या साधकाची आवड-नावड विचारून ‘त्याला गोड आवडते कि तिखट ?’ हे जाणून घेऊन त्यानुसार त्याला खाऊ द्यायला सांगतात. काही वेळा लिखाण वैशिष्ट्यपूर्ण असतेच असे नाही; पण त्या साधकाने प्रथमच प्रयत्न केला असेल किंवा ते लिखाण करतांनाचा त्याचा भाव चांगला असेल, तसेच एखाद्याने पुष्कळ मनापासून लिहिले असेल, तर त्यांना खाऊ मिळतो, हे निश्चित. असे असले, तरीही ‘त्यांनी स्थुलातून खाऊ दिला, तरच त्यांना लिखाण आवडले’, असे नसते. ‘एखाद्याने लिखाण केले’, हेच मुळात त्यांना आवडते. त्यामुळे ‘आपल्या गुरूंना आवडणारी कृती आपल्याकडून घडली’, याहून प्रत्येक साधकासाठी दुसरा अनमोल खाऊ काय असणार ?
त्यामुळे मी केलेली चूक कोणीही करू नका. ‘माझ्या प्रसंगातून सर्वांनी शिकून त्या-त्या वेळी लिखाण करून पुढे देऊया आणि आपल्या गुरुमाऊलीला प्रसन्न करून घेऊया’, अशी माझी सर्वांच्या चरणी नम्र प्रार्थना आहे.
माझे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक, तसेच इतरही अनेक प्रकारचे अडथळे, जे मला ज्ञातही नाहीत, अशा अनेक अडथळ्यांवर मात करून घेऊन आणि अत्यंत चिकाटीने माझा सतत पाठपुरावा घेऊन माझ्याकडून हे लिखाण करवून घेतल्याबद्दल प.पू. डॉक्टर, तुमच्या सुकोमल चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सुश्री (कु.) पूनम साळुंखे
१६. सतत साधकांचाच विचार करणारे प.पू. डॉ. आठवले !
१६ अ. एकदा रात्री आध्यात्मिक त्रास होत असलेल्या साधिकेसाठी प.पू. डॉक्टरांना उपाय विचारण्यासाठी मी त्यांना दूरभाषवर संपर्क करणे : ‘लिखाण वेळेत न केल्याने मी प.पू. डॉक्टरांची मनोमन क्षमायाचना करत होते. तेव्हा क्षमा मागण्यावरून मला प.पू. डॉक्टर यांच्या समवेतचा एक प्रसंग आठवला. प्रसंग पुष्कळ पूर्वीचा आहे. मी सेवा पूर्ण करून जातांना ‘कोणती सेवा झाली ? सेवेत काय शंका आहेत आणि उद्या काय काय करायचे आहे ?’, अशा प्रकारचे आमचे बोलणे व्हायचे; पण त्या दिवशी प.पू. डॉक्टर सत्संगाची ध्वनीचित्रफीत (व्हिडिओ) बघत होते. त्यामुळे आमचे सेवेविषयी बोलणे झाले नाही. मी सेवेच्या ठिकाणी आल्यानंतर मला एका साधिकेने तिला होणार्या आध्यात्मिक त्रासाविषयी प.पू. डॉक्टरांना उपाय विचारायला सांगितले. मी त्यांना दूरभाष करायचा विचार केला; पण त्यांच्या खोलीत दूरभाष केला, तर त्यांना दूरभाषपर्यंत उठून चालत जावे लागेल. (त्यांची प्राणशक्ती पुष्कळ अल्प असल्याने खोलीतल्या खोलीत चालतांनाही त्यांचा तोल जात असे.) त्यामुळे त्यांना चालावे लागू नये; म्हणून मी खोलीच्या बाहेर असलेल्या क्रमांकावर दूरभाष केला आणि तेथे सेवा करणार्या साधकाला दूरभाष नेऊन द्यायला सांगितले.
१६ आ. प.पू. डॉक्टरांनी त्यांच्या खोलीत दूरभाष न करण्याचे कारण विचारले असता त्यांची अपराधीभावाने क्षमा मागणे आणि त्यामुळे काही क्षणांपूर्वीचा त्यांचा नाराजीचा सूर जाऊन ते आनंदाने बोलणे : तो साधक प.पू. डॉक्टरांना दूरभाष द्यायला गेला. तेव्हा त्यांनी तो हातातही घेतला नाही आणि ते म्हणाले, ‘‘पूनमने दूरभाष बाहेर का केला ? तिला खोलीत दूरभाष करायला सांग.’’ माझा दूरभाष चालू असल्यामुळे मला त्यांचे बोलणे ऐकू आले. तेव्हा माझ्या मनात केवळ हाच विचार होता, ‘त्यांना ही गोष्ट आवडली नाही, म्हणजे मी योग्य केले नाही. माझे चुकले आहे.’ त्यामुळे मी मनातून त्यांची क्षमायाचना करत करतच त्यांच्या खोलीत दूरभाष केला. दूरभाष उचलल्यावर त्यांनी मला पहिला प्रश्न विचारला, ‘‘ तू दूरभाष खोलीत का केला नाहीस ?’’ तेव्हा अपराधीपणाने मी त्यांना म्हणाले, ‘‘परम पूज्य, माझी चूक झाली. मला क्षमा करा.’’ तेव्हा काही क्षण ते काहीच बोलले नाहीत आणि नंतर ते मला सेवेविषयी विचारू लागले. त्या वेळी प्रतिदिन जसे ते अतिशय आनंदाने बोलत, तसे बोलत होते. काही क्षणांपूर्वी असलेला त्यांचा नाराजीचा सूर त्यांच्या नंतरच्या बोलण्यात कुठेच नव्हता. सेवेचे बोलून झाल्यावर त्यांनी दूरभाष करण्याचे कारण विचारले आणि त्या साधिकेसाठी नामजपादी उपाय सांगितले.
१६ इ. साधिकेकडून झालेली चूक सांगण्यासाठी सद्गुरु मुकुल गाडगीळकाकांना थांबवणे आणि त्या वेळी प.पू. डॉक्टरांच्या चेहर्यावर आनंद अन् हसू असणे : दुसर्या दिवशी मी सेवेसाठी गेले. तेव्हा प.पू. डॉक्टर संगणकावर धारिका वाचत होते. त्या वेळी पू. गाडगीळकाकाही (आताचे सद्गुरु मुकुल गाडगीळ) तेथील संगणकावर सेवा करायचे. नेमके त्याच वेळी ते कुठेतरी जात होते. तेवढ्यात प.पू. डॉक्टरांना मी तेथे आल्याचे कळल्यावर त्यांनी पू. गाडगीळकाकांना हाक मारून थांबवले आणि ते म्हणाले, ‘‘गाडगीळ, तुम्हाला कळले का, हिने काल काय केले ते ?’’ प.पू. डॉक्टर माझ्याविषयी बोलत होते आणि त्यांनी पू. काकांना बोलवून घेतले होते; म्हणून आम्ही दोघेही त्यांच्या समोर जाऊन उभे राहिलो. ‘प.पू. डॉक्टर आदल्या दिवशीच्या दूरभाषविषयी सांगणार आहेत’, हे माझ्या लक्षात आले. तेव्हा माझ्या मनात विचार आला की, त्यांना मी केलेली कृती इतकी आवडली नाही का की, ते दुसर्या दिवशीही तिच्याविषयीच बोलत आहेत. मला याचे वाईट वाटून मी मनातून पुन्हा त्यांची क्षमायाचना चालू केली आणि त्यांच्यासमोर खाली मान घालून उभी राहिले. इतरांना कुणालाही काहीही ठाऊक नव्हते; म्हणून सर्व जण माझ्याकडे आणि प.पू. डॉक्टरांकडे बघत होते. प.पू. डॉक्टर एकदम आनंदाने पू. गाडगीळकाकांना सांगू लागले, ‘‘काल पूनमकडून एक चूक झाली. तेव्हा मला वाटले, ‘एरव्ही तिला रागवण्यासारखे काही नसते. आता या चुकीच्या निमित्ताने तिला भरपूर रागवूया. असा विचार करून मी तिला विचारले, ‘‘तू असे का केलेस ?’ तर तिने काय केले असेल ?’’ एवढे बोलून ते माझ्याकडे बघायला लागले. त्यामुळे पू. काकांनी मला विचारले, ‘‘तुम्ही काय केलेत ?’’ मी मान वर करून हळूच प.पू. डॉक्टरांकडे बघितले, तर त्यांच्या चेहर्यावर आनंद आणि हसू होते. ते बघून ‘ते रागावले आहेत किंवा नाराज आहेत’, असे वाटत नव्हते. त्यामुळे ‘मलाही कळत नव्हते की, ‘काय चालले आहे आणि प.पू. डॉक्टरांना काय म्हणायचे आहे ?’; पण त्यांनी एवढेच बोलून सर्वांची उत्कंठा वाढवली होती.
१६ ई. साधिका झालेल्या चुकीबद्दल सतत शरणागतभावाने क्षमायाचनाच करत असणे : मी मात्र क्षमायाचना करतच होते; कारण एरव्ही प.पू. डॉक्टर कधीच एखाद्या चुकीसाठी आदल्या दिवशीचा प्रसंग काढून किंवा आधीचा प्रसंग पुनःपुन्हा सांगत नाहीत. ते सतत वर्तमानात रहात असल्यामुळे आणि ते सर्वांवर केवळ अन् केवळ प्रीतीच करत असल्यामुळे त्यांच्या लक्षात आलेली चूक संबंधितांना सांगितली की, ते पुन्हा त्यांच्या नेहमीच्या मूळ स्वभावानुसार म्हणजे अतिशय प्रेमाने आणि ‘जणू काही झालेच नाही’, असे वागत असतात. तेव्हा कुणालाही प्रश्न पडावा की, ‘काही क्षणांपूर्वी पुष्कळ रागावले होते, ते हेच होते का ?’ मी त्यांना नेहमी असेच बघितले असल्यामुळे या वेळी मला वाटत होते, ‘देवा, मी तुला इतके दुखावले आहे का ? तुला ते इतके आवडले नाही का की, तू आजही त्याविषयी सांगत आहेस. तुला अप्रिय असे वागले, तुला त्रास दिला आणि तुला आजही पुन्हा रागावण्यासाठी त्रास देत आहे, त्यासाठी मला क्षमा कर.’ असे सर्व माझ्या मनात चालू होते.
१७. ‘झालेली चूक शरणागतीने स्वीकारणे, म्हणजे ‘शरणागतीच्या शस्त्राने देवाला जिंकणे’, असे प.पू. डॉक्टरांनी सांगणे
प.पू. डॉक्टर सर्वांची उत्कंठा संपवत सांगू लागले, ‘‘मी तिला विचारले, ‘पूनम, तू असे का केलेस ?’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘चूक झाली डॉक्टर (परम पूज्य). क्षमा करा.’’ त्यानंतर मला पुढे काही बोलताच आले नाही. मी इतके ठरवले होते की, ‘हिला आता पुष्कळ रागवायचे; पण तिने शरणागतीचे चांगले शस्त्र वापरले ना ! त्यापुढे मला काही बोलताच आले नाही.’ तेव्हा पू. गाडगीळकाका म्हणाले, ‘‘हो. शरणागतीच्या शस्त्रानेच देवाला जिंकता येते आणि यांनी तेच शस्त्र वापरले आणि देवाला जिंकले.’’ तेव्हा प.पू. डॉक्टरही एकदम प्रसन्न होऊन म्हणाले, ‘‘हो. अगदी बरोबर. शरणागतीच्या शस्त्रानेच देवाला जिंकता येते आणि जिंकले ना तिने !’’
१८. या प्रसंगात साधिकेचे झालेले चिंतन
तेव्हा मला काल रात्रीचा घटनाक्रम आठवला. ‘बाह्यतः पाहिले, तर माझा उद्देश ‘त्यांना त्रास होऊ नये’, हा होता. ‘ते देव आहेत ना’, त्यामुळे त्यांच्याबद्दलच्या काळजीनेच मी तसे केले. हे त्यांना कळले नसेल, असे नाही; पण माझ्या मनात त्या वेळी असा किंवा इतर कोणताही स्पष्टीकरणाचा विचार आला नाही. मला त्या वेळी इतकेच वाटले होते, ‘प.पू. डॉक्टरांना आवडले नाही ना, म्हणजे ते योग्य नाही. मग ते काहीही असो किंवा त्यामागचा उद्देश काहीही असो. त्यांना आवडले नाही, म्हणजे माझे १०० टक्के चुकलेलेच आहे.’ त्यामुळे मी मनापासून क्षमायाचना करत होते. तेव्हा ‘दूरभाषवर बोलतांना प.पू. डॉक्टरांचा आरंभीचा सूर इतका नाराजीचा असूनही मी क्षमा मागितल्यावर ते काही क्षण शांत का होते ? नंतर ते अकस्मात् काही न झाल्यासारखे आनंदाने कसे बोलायला लागले ?’, हे माझ्या लक्षात आले. त्यांच्या वरील (शरणागतीचे शस्त्र वापरण्याच्या) बोलण्यानंतर मला आदल्या दिवशीच्या या प्रसंगाचा उलगडा झाला.
हे सर्व ऐकून माझ्या जिवात जीव आला. ‘चला, देवाला आपल्यामुळे त्रास झाला नाही, तर उलट ते संतुष्ट आहेत’, या विचाराने माझ्या डोळ्यांत आनंदाने आणि कृतज्ञतेने पाणी आले अन् माझ्याकडून ‘देवा, तुला आवडेल, असेच प्रयत्न तू माझ्याकडून नेहमी करवून घे’, अशी प्रार्थना होत होती. माझ्या लिखाण न करण्याच्या चुकांसाठी क्षमा मागतांना मला हा प्रसंग आठवला. त्या वेळी मला प.पू. भक्तराज महाराज भजनानंतर म्हणत असलेली एक प्रार्थना आठवली. तिचा आशय थोडक्यात असा आहे, ‘हे प्रभो, मी पुष्कळ पातकी आहे. पदोपदी मी चुका करतो; परंतु तरीही तू मला क्षमा करशील, याविषयी मला पूर्ण भरवसा (निश्चिती) आहे.’
या ओळी आठवल्या आणि मला प.पू. डॉक्टर अन् सर्व साधक यांच्या चरणी क्षमायाचना करण्याचा धीर आला. ‘पश्चात्तापाचा एक अश्रू सर्व पापे धुवून टाकतो’, असे म्हणतात. प.पू. डॉक्टर, मी ही धारिका पश्चात्ताप, शरणागती आणि क्षमायाचना या भावांनी टंकलिखित केली आहे; कारण प्रारब्ध कितीही तीव्र असेल, जगात कोणीही रागावले, अगदी साक्षात् देवता जरी रागावल्या, तरी गुरु वाचवतील; पण जर गुरुच रागावले, तर त्रैलोक्यात कुणीही वाचवू शकणार नाही.
‘प.पू. डॉक्टर, माझ्याकडून झालेल्या चुकांसाठी मी कान पकडून तुमच्या चरणी नतमस्तक होऊन शरण जाऊन क्षमा मागते. मी आता ‘नियमित लिखाण करणे’, हा कृतीच्या स्तरावर प्रयत्न करीन. त्यामुळे प.पू. डॉक्टर, तुम्ही मला क्षमा कराल ना ?’
सुश्री (कु.) पूनम साळुंखे (वर्ष २०२४ मधील आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (समाप्त)