१२ फेब्रुवारीला श्री मलंगगड उत्सवाला प्रारंभ !

कल्याण – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार वर्ष १९७८ पासून श्रीमलंगगड लढा चालू आहे. धर्मवीर आनंद दिघे यांनी हा लढा चालू ठेवला. त्यांच्यानंतर हा लढा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. श्रीमलंगगड लढ्याविषयी न्यायालयात दावे चालू आहेत. या लढ्याला नक्कीच यश येईल. ज्याप्रमाणे कल्याण येथील दुर्गाडी गडाच्या लढ्यात आपण विजयी झालो, त्याप्रमाणे श्रीमलंगगड लढाही आपण जिंकणार, असे उद्गार शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी पत्रकार परिषदेत काढले. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही १२ फेब्रुवारीपासून श्री मलंगगड उत्सव चालू होत आहे. त्याची माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत गोपाळ लांडगे बोलत होते.
श्री मलंगगड यात्रेविषयी माहिती देतांना दिनेश देशमुख म्हणाले…
१. १२ फेब्रुवारीपासून पालखी सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. त्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित रहाणार आहेत.
२. गडावर नवनाथ संप्रदायातील मच्छिंद्रनाथ यांचे स्थान आहे, तसे पुरावेही आहेत; मात्र तेथे ‘पीर हाजीमलंग साहेब दर्गा’ नावे ट्रस्ट नोंदवले असून ते चुकीचे आहे. याविषयी ‘अ’ प्रमाणपत्र मिळावे; म्हणून न्यायालयात दावा चालू आहे. हिंदूंचे अनेक पुरावे तेथे आहेत.
३. वर्षभर तेथे रामनवमी, गुरुपौर्णिमा, रक्षाबंधन, ललिता पंचमी, दहीहंडी, दिवाळी पाडवा, तसेच प्रत्येक मासात येणार्या पौर्णिमेला कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.