Illegal Indian Immigrants In US : १७ सहस्र ९४० भारतियांच्या पायाला बांधण्यात आले ‘डिजिटल ट्रॅकर’ !

  • अमेरिकेत २० सहस्र ४०७ अवैध भारतीय स्थलांतरित

  • २ सहस्र ४६७ भारतीय ‘डिटेंशन सेंटर’मध्ये

(‘डिजिटल ट्रॅकर’, म्हणजे यामध्ये उपकरण, अ‍ॅप आदींच्या माध्यमांतून संबंधिताचा मागोवा घेणे आणि लक्ष ठेवणे आदी केले जाते)
(‘डिटेंशन सेंटर’, म्हणजे बेकायदेशीरपणे देशात प्रवेश केलेल्या लोकांना ठराविक कालावधीसाठी ठेवण्यासाठी नियुक्त केलेली जागा)

डिटेंशन सेंटर (डावीकडे) पायाला बांधण्यात येणार ‘डिजिटल ट्रॅकर’ (उजवीकडे)

न्यूयॉर्क (अमेरिका) – अमेरिकेने १०४ भारतियांना बेकायदेशीररित्या देशात राहिल्याच्या गुन्ह्यानंतर भारतात परत पाठवले आहे. अमेरिकेने आतापर्यंत वैध कागदपत्रांच्या अभावी देशात रहाणार्‍या २० सहस्र ४०७ भारतियांची ओळख पटवली आहे. या सर्वांना ‘अवैध भारतीय स्थलांतरित’ म्हटले जात आहे. ते ‘अंतिम बेदखल आदेशा’च्या (‘फायनल रिमूव्हल ऑर्डर’च्या) प्रतीक्षेत आहेत. यांपैकी १७ सहस्र ९४० भारतियांच्या पायांना ‘डिजिटल ट्रॅकर’ असणारे ‘अँकल मॉनिटर’ लावण्यात आले आहे. या सर्वांच्या ठिकाणांवर स्थानिक पोलीस ठाणे किंवा ‘इमिग्रेशन अँड कस्टम एन्फोर्समेंट (आयसीई)’ यांच्याकडून २४ घंटे लक्ष ठेवले जात आहे. सध्या ‘आयसीई’च्या ‘डिटेंशन सेंटर’मध्ये २ सहस्र ४६७ भारतीय आहेत. यापैकी १०४ भारतियांना भारतात परत पाठवण्यात आले आहे.

‘आयसीई’च्या माहितीनुसार त्यांच्या ‘डिटेंशन सेंटर’मध्ये क्षमतेच्या तुलनेत १०९ टक्के लोक अधिक आहेत. गृह विभागानुसार या केंद्रांची एकूण क्षमता ३८ सहस्र ५२१ खाटांची आहे. सध्या या केंद्रात ४२ सहस्र अवैध स्थलांतरित आहेत. यांपैकी निम्म्या लोकांना मेक्सिको सीमेवर अटक करण्यात आली होती.

संपादकीय भूमिका

केवळ भारतच नव्हे, तर जगभरातील घुसखोरांना अमेरिका देशातून हाकलून लावत आहे. त्यासाठी अशा प्रकारे युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. भारताने किमान बांगलादेशी आणि रोहिंग्या यांच्या संदर्भात तरी प्रथम प्रयत्न केले, तरी पुरेसे आहे, अशीच राष्ट्रप्रेमींची अपेक्षा आहे !