Indian Company Banned By US : इराणशी मैत्री केल्याकारणाने अमेरिकेने भारतावर केली कारवाई : भारतीय आस्थापनावर बंदी !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन – अमेरिकेत सत्तेत आल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी इराणवरील कारवाई अधिक तीव्र केली आहे. इराणवर अधिकाधिक दबाव आणण्याच्या त्यांच्या धोरणाचा एक भाग म्हणून ट्रम्प प्रशासनाने भारतासोबतच्या इराणच्या मैत्रीवरही आक्रमण करायला चालू केले आहे. अमेरिकेने इराणच्या चाबहार बंदरात भारताला दिलेली सूट रहित करण्याचा निर्णय घेतला आहे, तसेच ‘मार्शल शिप मॅनेजमेंट कंपनी’ या भारतीय आस्थापनावर बंदी घातली आहे. अमेरिकेने भारतीय आस्थापनावर इराणला चीनसोबत  तेल व्यापारात साहाय्य केल्याचा आरोप केला आहे. इस्रायलशी झालेल्या युद्धानंतर इराण अणूबाँब बनवण्यात व्यस्त आहे, अशी भीती अमेरिकेला आहे. (‘शत्रूचा मित्र हा शत्रूच असतो’, यानुसार पाकिस्तानला पाठिंबा देणार्‍या अमेरिकेकडून भारताने वेगळी अपेक्षा करणेच चुकीचे ठरेल ! – संपादक)

१. यापूर्वी ४ फेब्रुवारी या दिवशी अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने इराणवर अधिकाधिक आर्थिक दबाव आणण्याचे आदेश दिले होते. अमेरिकेला असे वाटते की, या दबावांद्वारे इराणचा प्रभाव न्यून करता येईल.

२. अमेरिकेने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, इराण प्रतिवर्षी तेल विकून अब्जावधी डॉलर्स कमवत आहे आणि याद्वारे ते संपूर्ण प्रदेशात अस्थिरता पसरवणार्‍या कारवाया करत आहे. इराण हमास, हिजबुल्ला आणि हुती या संघटनांच्या आतंकवाद्यांना पाठिंबा देत आहे.

३. अमेरिकेने असेही म्हटले आहे की, इराण सरकार तेलातून पैसे कमवून अणूकार्यक्रम चालवत आहे, तसेच क्षेपणास्त्रे आणि ‘किलर ड्रोन’ बनवत आहे.