शिवाजीनगर पोलीस वसाहतीतील इमारतीमधील वीजदेयक प्रशासनाने न भरल्याने पाणीपुरवठा खंडित !

पुणे – शिवाजीनगर पोलीस वसाहतीमधील २२ मजली इमारतीमध्ये पाणीपुरवठा खंडित केला आहे. २२ मजली इमारतीमध्ये पाणीपुरवठा, लिफ्ट (उद्वाहक) आणि वापरातील जागेत बसवलेल्या दिव्यांसाठी ३ वीज मीटर बसवले आहेत. शासन या ३ मीटरचे वीजदेयक जमा करते. पोलीस आयुक्त कार्यालयाच्या वतीने महावितरणला हे देयक देण्यात येते; मात्र शासनाने एप्रिल २०२४ पासून देयकाचे पैसे पोलीस आयुक्त कार्यालयात जमा न केल्याने महावितरणने पाणीपुरवठा करणार्‍या पंपाचा वीजपुरवठा खंडित केला आहे. लिफ्टचाही वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. जर लिफ्ट बंद पडली तर २२ मजली इमारतीत वरच्या मजल्यावर रहिवासी जाणार कसे ? असा प्रश्न रहिवाशांनी उपस्थित केला आहे.

शिवाजीनगर पोलीस वसाहतीमध्ये लिफ्ट आणि पाणीपुरवठा करण्यासाठी वेगळे मीटर आहेत. पाणीपुरवठ्यासाठी जोडलेल्या मीटरचे देयक ३४ लाख रुपये असून त्यापैकी १७ लाख रुपये पोलीस आयुक्त कार्यालयाने दिले आहेत. उर्वरित देयकाचे पैसे शासन लवकरच जमा करेल, असे शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

असे प्रशासन स्वच्छ कारभार कसा करणार ?