सातारा नगरपालिकेकडून ५ कोटी ४४ लाख रुपयांचा महसूल जमा !

सातारा, ५ फेब्रुवारी (वार्ता.) – सातारा नगरपालिकेच्या वसुली विभागाने उद्दिष्टपूर्तीसाठी जोरदार मोहीम चालू केली आहे. गत २ वर्षांत कर थकवणार्‍या थकबाकीधारकांचे दुकानगाळे अथवा सदनिका लाखबंद (सिल) करण्याचा सपाटा नगरपालिकेने लावला आहे. यामुळे कर थकवणार्‍यांचे धाबे दणाणले आहे. सातारा नगरपालिकेने १ ते ३१ जानेवारी २०२५ या कालावधीमध्ये ५ कोटी ४४ लाख ३६ सहस्र १२० रुपयांची वसुली केली आहे. ही वसुली ८३ टक्के असल्याची माहिती कर अधिकार्‍यांनी दिली.

वसुली विभागाच्या वतीने शहरामध्ये पालिकेची ३ वसुली पथके स्वतंत्रपणे कार्यरत आहेत. गत आठवड्यामध्ये २१ गाळे लाखबंद (सिल) करण्यात आले आहेत, तसेच घरपट्टी थकीत असणार्‍यांना जप्ती आदेश ठोठावल्याने डिसेंबरमध्ये २ कोटी १४ लाख रुपयांचा महसूल जमा झाला. जानेवारीमध्ये हीच रक्कम ५ कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. नगरपालिकेने यावर्षी ४८ कोटी रुपयांचे वसुलीचे उद्दिष्ट ठरवले आहे. गत ३ मासामध्ये पालिकेने अनुमाने २४ कोटी रुपयांची कर वसुली केली आहे. १५ फेब्रुवारीनंतर पालिकेचे प्रशासकीय अंदाजपत्रक मांडण्यात येणार आहे. शहराच्या सीमेमध्ये ३६ सहस्रांहून अधिक सदनिका असून त्यातील सर्वात जुन्या थकबाकीदारांचे प्रमाण ६ टक्के आहे. यावरच लक्ष केंद्रित करून नियोजनबद्ध वसुलीचा कार्यक्रम राबवल्यामुळे पालिकेच्या महसुलामध्ये तातडीने भर पडत आहे. थकबाकीधारकांनी कारवाईचे कटू प्रसंग टाळण्यासाठी आपली प्रलंबित देयके तातडीने भरावीत आणि नगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

संपादकीय भूमिका

एवढी थकबाकी का रहाते ? प्रत्येक वर्षी वसुली पूर्ण होण्याचे ध्येय प्रशासनाने घेणे आवश्यक आहे !