‘माझी व्यष्टी साधना योग्य प्रकारे होत नसल्याने माझे मन अतिशय उदास झाले होते. एकदा मी साधना नीट होत नसल्याविषयी चिंतन करत असतांना माझ्या लक्षात आले की, माझा नामजप एकाग्रतेने होत नाही. त्याचे प्रमुख कारण म्हणजे माझे नाम श्वासाशी जोडले जात नाही. ‘यासाठी काय प्रयत्न करावेत ?’, असा मी विचार करत असतांना देवाच्या कृपेने काही विचाररूपी मोती मनातून घरंगळत आले. ते मी माझ्या ओंजळीत पकडण्याचा प्रयत्न करत असतांना त्यांची शब्दरूपी माळेत गुंफण झाली. ही शब्दरूपी मौक्तिकमाला कृतज्ञताभावाने स्फुरणदात्या श्री गुरुचरणी अर्पण करते.

श्वास नेहमी आपल्याच धुंदीत मस्त असे ।
कधी जलद, तर कधी संथ गतीत त्याचे चालणे असे ।। १ ।।
क्रोधाच्या आहारी गेल्यास गती जलद होई ।
तर दु:खाच्या आहारी गेल्यास त्याची गती संथ होई ।। २ ।।
प्रत्येक अवस्थेत तो त्याच्या मस्तीतच दंग असे ।
कुणासाठी न थांबता अखंड त्याचे चालणे असे ।। ३ ।।
कालांतराने मात्र गंमतच झाली ।
एकट्या असलेल्या श्वासाला नामाची जोड मिळाली ।। ४ ।।
बिचारे नाम श्वासाच्या गतीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करू लागले ।
परंतु त्याला ते फारच कठीण जाऊ लागले ।। ५ ।।
हार न मानता नाम स्वतःच्या गतीत पालट करू लागले ।
अथक प्रयत्नांनी (टीप) नामाला श्वासाशी जुळवून घेता आले ।। ६ ।।
दोघे एका लयीत समेवर आले ।
गात्रागात्रांमधून आनंदाचे तुषार उडाले ।। ७ ।।
अशी जमली गुरुकृपेने श्वास आणि नाम यांची जोडी ।
तिने वाढवली माझ्या नामसाधनेची गोडी ।। ८ ।।
श्वास आणि नाम यांचे अद्वैत झाले ।
अंतर्मुखतेने मी आनंदाच्या डोहात तरंगू लागले ।। ९ ।।
जिवाची शिवाकडे जाण्याची ओढ वाढली ।
द्वैत-अद्वैताशी पुसटशी ओळख झाली ।। १० ।।
टीप १ : मनाकडून असंख्य अडथळे येऊनही त्यावर मात करून
– श्रीमती रजनी साळुंके, फोंडा, गोवा. (२२.१.२०२५)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |