अभिनेते वीर पहारिया यांच्यावर विनोद करणार्या प्रणित मोरे याच्यावरील आक्रमणाचे प्रकरण

सोलापूर – विनोदी कलाकार प्रणित मोरे याला येथे झालेल्या मारहाणप्रकरणी पोलिसांनी आरोपी तन्वीर शेख याच्यासह त्याच्या १० ते १२ जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. प्रणित यांनी अभिनेते वीर पहारिया यांच्यावर विनोद केल्याने एका गटाकडून त्याला मारहाण करण्यात आली होती.
या प्रकरणी अभिनेते वीर पहाडिया यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, प्रणित मोरे याच्या समवेत जे काही घडले, ते वाचून मला धक्का बसला आहे. या घटनेशी माझा काहीच संबंध नाही. कोणत्याही प्रकारच्या हिंसेचा मी तीव्र निषेध करतो. ‘ट्रोलिंग’ला (टिकेला) मी कधीच मनावर घेत नाही. उलट मी ते सहजतेने स्वीकारतो. माझ्या टीकाकारांशीसुद्धा मी प्रेमाने वागतो. त्यामुळे कुणाची वैयक्तिक हानी करण्यास मी प्रोत्साहन देणार नाही किंवा त्याचे समर्थन करणार नाही.
माझ्याप्रमाणे सर्जनशील क्षेत्रात काम करणार्या सहकलाकारावर झालेल्या आक्रमणाचे मी समर्थन करणार नाही. प्रणित आणि त्याच्या चाहत्यांना मी सांगीन की, या घटनेशी माझा काहीही संबंध नाही, तरीही यासाठी मी तुमची माफी मागतो; कारण कोणतीही व्यक्ती अशा गोष्टींसाठी पात्र नाही. या आक्रमणासाठी जे उत्तरदायी आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, यासाठी मी स्वत: लक्ष घालीन.