राज्यात औरंगजेबाचे छायाचित्र किंवा भित्तीपत्रक झळकवण्यावर बंदी घाला !

हिंदु जनजागृती समितीची निवेदनाद्वारे मागणी

धुळे येथे महसूल अधिकार्‍यांना निवेदन देतांना धर्मप्रेमी

धुळे – महाराष्ट्र ही छत्रपती शिवराय आणि धर्मवीर शंभूराजे यांना मानणारी भूमी आहे. ज्या क्रूरकर्मा औरंगजेबाने हिंदूंची मंदिरे तोडली, जिझिया कर लावला, लाखो हिंदूंची कत्तल केली, एवढेच नाही, तर धर्मवीर शंभूराजांचा छळ करून त्यांची हत्या केली, त्या खुनी औरंगजेबाला या भूमीतून हद्दपार केले पाहिजे. यासाठी राज्यात औरंगजेबाचे भित्तीपत्रक, बॅनर लावणे किंवा झळकावणे आदी सर्वांवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या नावे निवेदन देऊन करण्यात आली. धुळे येथे जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल अधिकारी श्री. चव्हाणकर यांना हे निवेदन देण्यात आले. या वेळी समितीच्या वतीने सर्वश्री पियुष खंडेलवाल, किशोर अग्रवाल, मयूर बागुल, भरत सरग, धनंजय वाघ, उज्ज्वल पाटील, दर्शन राजपूत उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील औरंगाबाद जिल्ह्याचे नामांतर झाल्यापासून हेतूपुरस्सर राज्यात औरंगजेबाचे बॅनर लावणे, स्टेटस ठेवणे, धार्मिक मिरवणुकीत फलक झळकावणे आदी प्रकार वाढलेले आहेत. मध्यंतरी कोल्हापूर येथे आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला होता. जळगाव जिल्ह्यात जानेवारी २०२५ मध्ये २ ठिकाणी काढलेल्या संदलमध्ये अनावश्यक आणि जाणीवपूर्वक औरंगजेबाचे पोस्टर झळकवल्याप्रकरणी गुन्हे नोंदवण्यात आले. सध्या राज्यात शिवराय आणि शंभूराजे यांना मानणारे शासनकर्ते सत्तेत आलेले आहेत. त्यामुळे शंभूराजे यांची क्रूरपणे हत्या करणार्‍या औरंगजेबाचे बॅनर, पोस्टर यांवर संपूर्ण राज्यभरात बंदी घालण्यात यावी.