प.पू. स्वामी वरदानंद भारती यांचे धर्माविषयी अमूल्य मार्गदर्शन असणारी लेखमाला !

प्रश्न : किं स्वित् मित्रं मरिष्यतः ?
अर्थ : मरणार्याचा मित्र कोण ?
उत्तर : दानम् ।
अर्थ : दानधर्म करणे, हेच मरणार्याचा मित्र आहे.
ब्रह्मदेवाने ज्याच्या त्याच्या कल्याणाचा मार्ग सांगतांना –
१. विलासी देवांना सांगितले, ‘इंद्रियांचे दमन करा. संयमाने वागा.’
२. स्वार्थी वृत्तीच्या क्रूर राक्षसांना सांगितले, ‘प्राणीमात्रांविषयी दया बाळगा.’
३. संग्रह आणि संचय यांचा अनिवार लोभ असलेल्या माणसांना सांगितले, ‘तुम्ही दान करा.’
१. दान करतांनाची स्थिती कशी असावी ?
उपनिषदांनीही दानाला एक प्रकारचे तप मानले आहे. माणसाने दानधर्म अवश्य करावा. तो श्रद्धेने आणि स्वतःच्या संपत्तीला अनुरूप अशा प्रकाराने करणे सगळ्यात चांगले. श्रद्धा नसली, तरी ‘लोक काय म्हणतील’, या भीतीने का होईना, होईल तितके दान करावे. संपत्ती मिळवण्याच्या प्रयत्नात समाजाचे जे कळत नकळत शोषण होते, त्यामुळे जे अस्वास्थ्य आणि संघर्ष निर्माण होण्याची शक्यता असते, तो धोका योग्य त्या प्रकारे केलेल्या दानाने टळतो. दान देतांना भावना कर्तव्याची असावी. ‘परोपकार करतो’, या अहंकाराने दान देणे चांगले नाही.
२. मृत्यूनंतर केवळ कर्मच स्वतःसमवेत जाते !
‘आपण पुनर्जन्म मानतो’, हा विषय केवळ श्रद्धेचा नाही. पुनर्जन्म-पूर्वजन्म ही वस्तूस्थिती आहे. आपणास पटते कि पटत नाही, ही गोष्ट वेगळी. वस्तूस्थिती जशी असायची तशीच असते. आपल्या कळण्या न कळण्यावर, पटण्या न पटण्यावर तिचे अस्तित्व काही अवलंबून असत नाही.
‘मृत्यूनंतर पुन्हा अपरिहार्यपणे येणार असलेला माणसाचा जन्म चांगला सुख-समाधानाने भरलेला असावा’, असे वाटत असेल, तर त्याची सोय आता लाभलेल्या आणि कर्मस्वातंत्र्य असलेल्या जन्मातच करून ठेवलेली असली पाहिजे. मृत्यूनंतर जीवासवे जाते, ते त्याचे कर्म. इतर कुणी जाऊ शकत नाही.
धनानि भूमौ पशवश्च गोष्ठे
भार्या गृहद्वारि जनः स्मशाने ।
देहश्चितायां परलोकमार्गे
कर्मानुगो गच्छति जीव एकः ।।
अर्थ : (मृत्यूनंतर) धन भूमीवर, पशू गोठ्यात, पत्नी घरात, नातेवाईक स्मशानात आणि देह चितेवर रहातो. परलोकाच्या मार्गावर केवळ कर्मच जीवासह जाते.
३. ‘दान’ सत्कर्म असल्याने ते जिवाची दुर्गती होऊ देत नाही !
स्वर्ग-नरक, चांगला जन्म-वाईट जन्म, हे सगळे प्रकार त्यातूनच संभवतात. दानाला मरणार्याचा मित्र म्हटले आहे, ते यासाठीच. दान हे सत्कर्म असल्याने ते जिवाची दुर्गती होऊ देत नाही. पापाचे निवारण करणे आणि हित साधून देणे, ‘पापान्निवारयति योजयते हिताय ।’ (नीतीशतक, श्लोक ७३), म्हणजे ‘दुष्कर्मांतून सोडवतो, सन्मार्गाला लावतो’, हे मित्रकर्तव्य ते योग्य रितीने पार पाडत असते.
– प.पू. स्वामी वरदानंद भारती (पूर्वाश्रमीचे अनंतराव आठवले)
(साभार : ग्रंथ ‘यक्षप्रश्न’)