
सांगली, ६ फेब्रुवारी (वार्ता.) – कृष्णानदी ही सांगलीकरांसाठी जलजीवन वाहिनी आहे. वर्षभरातून एकदा गंगानदी ही कृष्णानदीच्या भेटीसाठी येते. त्याच्या निमित्ताने सांगली महापालिका, श्री कृष्णामाई महोत्सव समिती आणि श्री गणपति पंचायत संस्थान यांच्या वतीने ७ ते १२ फेब्रुवारी या कालावधीत कृष्णामाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात ७ फेब्रुवारीला भव्य शोभायात्रा, १ सहस्र दिव्यांचा दीपोत्सव यांसह विविध कार्यक्रम होणार आहेत, तरी अधिकाधिक नागरिकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकाचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी महापालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत केले.
उत्तरप्रदेश येथील प्रयागच्या धर्तीवर प्रतिदिन महाआरती, जलपूजन, तसेच धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन ! – श्री. महेंद्र चंडाळे, संयोजक, श्री कृष्णामाई महोत्सव समिती
ज्या ज्या भाविकांना कुंभमेळ्यात जाता आले नाही, त्यासर्वांना या महोत्सवाच्या निमित्ताने स्नान करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. या नदीत आम्ही प्रयाग येथील पवित्र जल प्रवाहित करणार आहोत, तसेच येथे ११ पवित्र नदीतील जलांचे पूजनही केले जाणार आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण नदीकाठ, आयर्विन पूल, सरकारी काठ भगव्या वस्त्रांनी, भगव्या झेंड्यांनी सजवण्यात आला आहे. उत्तरप्रदेश येथील प्रयागराजच्या धर्तीवर प्रतिदिन महाआरती, जलपूजन, तसेच धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
हा सोहळा संपूर्ण सांगलीकरांचा आहे. त्यामुळे प्रत्येकाने यात सहभागी व्हावे. या निमित्ताने आयुर्विन पुलाला ७५ फुटांचा भव्य हार घालण्यात येणार आहे. कृष्णा नदीच्या काठावर भव्य व्यासपीठ उभारण्यात येणार आहे. ७ फेब्रुवारीला सकाळी ८.१५ वाजता युवराज आदित्यराजे विजयसिंहजराजे पटवर्धन यांच्या हस्ते धर्म ध्वजारोहण होईल. या वेळी कलशपूजन आणि कृष्णामाई साडी-चोळी ओटी भरणे कार्यक्रम होईल. दुपारी ४ वाजता श्री गणपति मंदिर ते कृष्णानदीपर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. प्रतिदिन भजन-कीर्तन असेल. १२ फेब्रुवारीला सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी शाहीस्नान करण्यात येणार आहे. हे सर्व कार्यक्रम कृष्णामाई मंदिर, सरकारी घाट येथे होतील. या निमित्ताने वर्षभर नदीची आरती होईल, यासाठी आमचे प्रयत्न असणार आहेत.