प्रयागराज कुंभपर्व २०२५
‘१३.१.२०२५ पासून भारतातील तीर्थराज प्रयाग (उत्तरप्रदेश) येथे चालू झालेल्या महाकुंभमेळ्याच्या संदर्भात माझ्या मनात जिज्ञासा निर्माण झाली आणि मला पुढील प्रश्न पडले. तेव्हा माझ्या खोलीतील भिंतीवर लावलेल्या शिवाच्या चित्राकडे माझे सहज लक्ष गेले. त्यानंतर शिवाने सूक्ष्मातून माझ्यावर कृपाकटाक्ष टाकला. तेव्हा शिवाच्या जटेमधून वहाणार्या गंगेच्या प्रवाहातील एक लहानसा प्रवाह माझ्या दिशेने आला आणि तो माझ्या सहस्रारावाटे माझ्या देहात गेला. तेव्हा शिवाकडून माझ्याकडे ज्ञानगंगेचा एक ओघ कार्यरत झाल्यामुळे मला महाकुंभाविषयीच्या प्रश्नांच्या संदर्भात पुढील ज्ञानसूत्रे सुचली. ही प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात प्राप्त झालेली सर्व ज्ञानसूत्रे मी शिवचरणी कृतज्ञताभावाने लेखबद्ध करून समर्पित करते. (भाग १)
१. प्रश्न क्र. १. आता प्रयागराज येथे महाकुंभ चालू आहे. अर्धकुंभ, पूर्णकुंभ आणि महाकुंभ यांत काय भेद असतो ?
१ अ. उत्तर : ‘अर्धकुंभ, पूर्णकुंभ आणि महाकुंभ’, हे कुंभमेळ्याचे ३ प्रकार आहेत.
२. प्रश्न क्र. २. आपल्याला स्थूल डोळ्यांनी कुंभमेळा दिसतो; पण सूक्ष्मातून काय घडते ?
२ अ. उत्तर : कुंभमेळ्याच्या प्रकारानुसार प्रत्येक ६ किंवा १२ वर्षांनी संबंधित ४ तीर्थक्षेत्रांपैकी एका तीर्थक्षेत्री समुद्रमंथनातून निघालेल्या अमृतकुंभातून पडलेल्या थेंबांचे तत्त्व कार्यरत होते. त्यामुळे या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणच्या नद्यांच्या पाण्यामध्ये स्वर्गीय अमृताचा अंश चैतन्याच्या स्वरूपात कार्यरत होतो. परिणामी अर्धकुंभ, पूर्णकुंभ किंवा महाकुंभ असतांना कुंभक्षेत्री मनुष्य स्थुलातून दिवसा स्नान करतात, तर ब्राह्ममुहूर्तावर हिमालय, नैमिषारण्य आणि सप्तर्षीलोक येथील असंख्य ऋषिमुनी ज्योतीस्वरूपात अन् स्वर्गादी विविध लोकांमध्ये वास करणार्या विविध देवदेवी तेजोमय आभांच्या स्वरूपात प्रगट होऊन कुंभक्षेत्रातील नद्यांमध्ये स्नान करतात. त्यामुळे कुंभक्षेत्रांतील नद्या अतिशय पावन होतात. अशा पवित्र नद्यांमध्ये कुंभकाळात स्नान केल्यामुळे श्रद्धाळू, धार्मिक आणि भाविक यांना आध्यात्मिक स्तरावर पुष्कळ लाभ होतो.

३. प्रश्न क्र. ३. कुंभमेळ्यातील अमृत स्नानांच्या दिवशी सूक्ष्मातून कोणती प्रक्रिया घडते ?
३ अ. उत्तर : यावर्षी महाकुंभाच्या ठिकाणी पौष पौर्णिमा (१३.१.२०२५), मकरसंक्रांत (१४.१.२०२५), मौनी अमावास्या (सोमवती अमावास्या, २९.१.२०२५), वसंतपंचमी (३.२.२०२५), माघ पौर्णिमा (१२.२.२०२५) आणि महाशिवरात्र (२६.२.२०२५) या तिथींना अमृत स्नान असणार आहे. या दिवशी तिथी शुभ असल्यामुळे तीर्थराज प्रयाग येथे कालचक्रामध्ये कार्यरत असणार्या महाकालेश्वर शिवतत्त्वाचा ओघ कार्यरत होऊन त्याचे चैतन्य महाकुंभक्षेत्राच्या वातावरणात आणि नद्यांच्या संगमक्षेत्री कार्यरत होणार आहे. त्यामुळे इतर दिवसांच्या तुलनेत अमृत स्नानांच्या दिवशी महाकुंभाच्या ठिकाणी स्नान केल्यावर निर्गुण स्तरावर अधिक प्रमाणात लाभ होऊन हा लाभ २०० टक्के होणार आहे.
४. प्रश्न क्र. ४. कुंभमेळ्यामुळे पूर्ण विश्वावर काय परिणाम होतो ?
४ अ. उत्तर : कुंभमेळ्याच्या परिसरात आल्यावर देहावरील रज आणि तम यांचे आवरण न्यून होते. कुंभमेळ्याच्या ठिकाणी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यामुळे समस्त पाप आणि अधर्म भाविकांच्या श्रद्धेनुसार २० ते १०० टक्के न्यून होतात. त्यामुळे कुंभमेळ्यात स्नान करून गेलेल्या धार्मिक वृत्तीच्या जिवांना मृत्यूत्तर सद्गती लाभते, म्हणजे स्वर्गलोक, महर्लाेक, जनलोक इत्यादी उच्च लोकांमध्ये स्थान प्राप्त होते.’
(क्रमशः)
या लेखातील भाग २ पाहण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/882506.html
– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.१.२०२५)
|