‘गुरुच भक्ताचा योगक्षेम चालवतात’, हे अनुभवणार्‍या पुणे येथील सौ. भाग्यदा भास्करवार !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधिकेला अध्यात्मप्रसार करण्याविषयी विचारलेला प्रश्न काही दिवसांतच खरा ठरणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘एकदा मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. तेव्हा त्यांनी जे सांगितले, ते नंतर तंतोतंत खरे ठरले. ते येथे दिले आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : तुला अध्यात्म प्रसारासाठी जायचे आहे का ?

मी : नको.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : का नको ?

मी : मला येथे रामनाथी आश्रमातच सेवा करायला आवडते. या आश्रमाने मला पुष्कळ काही दिले आहे. त्यामुळे मला येथेच रहावेसे वाटते आणि तुम्ही येथेच आहात, तर मी आश्रम सोडून बाहेर जाणार नाही.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : मी प्रसारातसुद्धा आहेच ना !

मी : पण तेथे तुम्ही मला दिसत नाही.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : काही दिवसांनी मी तुला प्रसारातही दिसेन आणि तुझ्या मनात तसेच विचार येतील !

त्यानंतर सप्टेंबर २०२३ मध्ये माझे प्रसारात सेवा करणारे साधक श्री. तुषार भास्करवार यांच्याशी लग्न ठरले. त्यामुळे मी आता प्रसारातील सेवा शिकत आहे.’

– सौ. भाग्यदा तुषार भास्करवार (पूर्वाश्रमीची कु. निकिता झरकर), पुणे (२.४.२०२४)

१. साधिकेची काळजी घेणारे आणि तिने सांगितल्यानुसार कृती करणारे सासू-सासरे  

१ अ. श्री. विकास भास्करवार (सासरे, वय ६१ वर्षे), चंद्रपूर

श्री. विकास भास्करवार

१ अ १. वडिलांप्रमाणेच काळजी घेणारे सासरे मिळणे : ‘माझा विवाह झाल्यावर मी सासरी चंद्रपूर येथे गेले होते. त्या वेळी तेथील थंडी मला सहन होत नव्हती. ‘मला थंडीचा त्रास होत आहे’, असे पाहून माझे सासर्‍यांनी माझे पती (श्री. तुषार भास्करवार) यांना माझ्यासाठी पायमोजे आणि चपला आणून देण्यास सांगितले, तसेच याविषयी श्री. तुषार यांच्याकडे पाठपुरावाही केला. ‘सासरे सुनेचा इतका विचार करू शकतात’, हे मी पहिल्यांदाच अनुभवले.

१ अ २. सुनेचे ऐकून तशी कृती करणे : पूर्वी सासर्‍यांना एखादा पदार्थ आवडला नाही, तर ते टाकून देत असत. साधारण १ मासानंतर मी त्यांना म्हणाले, ‘‘आपण अन्न टाकतो. त्यामुळे त्या अन्नाचा अपमान होतो. तुम्ही प्रथम थोडेसेच अन्न घेत जा.’’ त्या दिवसापासून त्यांना एखादा पदार्थ आवडला नाही, तरी ते तो टाकून देत नाहीत. सुनेचे बोलणे ऐकून त्यानुसार कृती करणे सहसा कठीण असते; पण लहानपणापासून सवय असूनही सासर्‍यांनी त्यात सहज पालट केला. यावरून ‘अहं अल्प असल्यानेच ते सर्व ऐकून घेतात’, असे मला वाटले.

१ आ. सौ. वंदना भास्करवार (सासूबाई, वय ५७ वर्षे), चंद्रपूर 

सौ. वंदना भास्करवार

१ आ १. सासूबाईंनी मुलीप्रमाणेच काळजी घेणे आणि सर्व कृती विचारून करणे : माझ्या सासूबाईसुद्धा मुलीप्रमाणेच माझी काळजी घेतात. त्यांच्या बोलण्यात कुठेच अधिकार किंवा शिकवणे, असे काही नसते. उलट काही करायचे असेल, तर त्या मला विचारतात. खरे तर मला व्यवहारातला कोणताच अनुभव नाही. त्या त्यांच्या मनाने ठरवू शकतात; पण त्या तसे कधीच करत नाहीत. त्यांच्यात साधकत्व असल्यानेच त्या असे वागू शकतात.

१ आ २. साधिकेला तिची सेवा आणि साधना यांकडे लक्ष देण्यास सांगणे : ‘कोणते कर्मकांड कर किंवा अमुक सण साजरे कर’, असे सासूबाई मला म्हणत नाहीत. केवळ ‘तुझी सेवा आणि साधना होईल’, याकडे लक्ष दे’, असे त्या सांगतात.

२. घरातही सर्व नियोजन आश्रमाप्रमाणे केल्याने घर आश्रमाप्रमाणे वाटणे 

श्री. तुषार भास्करवार

२ अ. ‘सदनिकेत लागणारे साहित्य आश्रमासाठीच खरेदी करत आहोत’, असा भाव ठेवणे : पुण्यात रहायला आल्यावर आमच्या सदनिकेत (फ्लॅटवर) काहीच साहित्य नव्हते. तेव्हा सर्व साहित्य खरेदी करतांना ‘आपल्याला आश्रमासाठी साहित्य घ्यायचे आहे’, असा भाव ठेवून आम्ही ते खरेदी केली. घरातील साहित्य त्या त्या ठिकाणी लावतांनाही असेच वाटत होते. त्यामुळे घरी वावरतांनाही ‘मी आश्रमात आहे’, असेच मला वाटते. आम्ही दोघेच घरी असतो. त्या वेळी आश्रमासारखेच नियोजन करतो.

सौ. भाग्यदा भास्करवार

२ आ. एकदा माझे मामा घरी आले असतांना मला म्हणाले, ‘‘इथे आल्यावर असे वाटते की, तू आश्रमातच रहात आहेस !’’ देवानेच मला ही अनुभूती दिली आहे.

३. लग्नाला तीनच मास झाले असतांनाही यजमानांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवेसाठी जाण्यास अनुमती देणे : माझ्या लग्नाला साधारण ३ मास पूर्ण झाले असतांना मला रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातून एका सेवेसाठी येण्याविषयी विचारले. माझ्या मनात विचार आला, ‘आताच लग्न झाले, तर मी आश्रमात जाण्याविषयी कसे विचारू ?’ यजमानांना विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘तू गेलीस, तर माझाही त्याग होईल आणि त्यातून माझी साधना होईल. त्यामुळे तू आश्रमात जा.’’ त्यांचा विचार ऐकून मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.

या सर्व प्रसंगांतून ‘गुरु भक्ताचा योगक्षेम कसा चालवतात’, हे मी अनुभवते. आई-वडिलांप्रमाणे असलेले सासू-सासरे, साधनेसाठी पूरक असे यजमान आणि वातावरण देऊन माझ्या साधनेची सर्वतोपरी काळजी घेणार्‍या गुरुमाऊलीच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. भाग्यदा भास्करवार (पूर्वाश्रमीची कु. निकिता झरकर), पुणे (२.४.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक