सेवा केल्याने साधकांना होणार्‍या लाभाविषयी देवद येथील सनातनच्या आश्रमातील साधिका सौ. मीना खळतकर यांची झालेली विचारप्रक्रिया !

१. सेवा हे आनंदप्राप्तीचे साधन असणे 

सौ. मीना खळतकर

‘सेवा ही साधनेची संधी आहे. साधकांनी ‘सेवेची संधी मिळणे’, हा गुरुदेवांचा कृपाप्रसाद आहे’, असे समजावे. सेवा करणे, म्हणजे मोक्षाकडे जाणार्‍या मार्गावरून मार्गक्रमण करणे, असे आहे. सेवा हे आनंदप्राप्तीचे साधन आहे. सेवा केल्याने तन, मन आणि धन यांचा त्याग होतो.

२. सेवेमुळे होणारे लाभ

अ. सेवेमुळे सतत सत्मध्ये रहाता येते.

आ. सेवा करतांना स्वतःमधील स्वभावदोष लक्षात येतात आणि ते दूर करण्यासाठी उपाययोजना राबवता येते. स्वतःमधील स्वभावदोष दूर झाल्यावर साधनेत एकेका टप्प्याने प्रगती होते.

इ. सेवेमुळे ‘कोणते गुण अंगी बाणवायला हवे ? आणि कोणत्या गुणांची वृद्धी करायला हवी ?’, हे आपल्या लक्षात येते.

ई. सेवेत असतांना आपले आपल्या मनात येणार्‍या विचारांकडे दुर्लक्ष होते.

उ. सेवेमुळे सत्मध्ये राहिल्याने शरीर, मन आणि बुद्धी यांवर काळे (त्रासदायक) आवरण येत नाही. सेवेमुळे देहशुद्धी होते.

ऊ. देहभान हरपून सेवा केल्यामुळे स्वतःमधील मीपणा आणि कर्तेपणा न्यून होतो.

ए. सेवेच्या माध्यमातून गुरुमाऊलींचा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा) सत्संग लाभतो.

ऐ. सेवेत असतांना सतत गुरुदेवांच्या अनुसंधानात रहाता येते.

ओ. सेवेमुळे मनाला शांती लाभते.

औ. गुरुचरणांची पूजा केल्याचे फळ प्राप्त होते.

अं. सेवेमुळे प्रारब्ध नष्ट होते.

क. निष्काम सेवेमुळे पुण्याचे फळ (सुख) भोगण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही.

ख. सेवेच्या माध्यमातून मुक्ती सुलभ होते.’

– सौ. मीना खळतकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२८.९.२०२४)