Jamaat-e-Islami Pakistan : भारत पाकच्या नागरिकांना ठार करत असतांना सरकार गप्प !

‘जमात-ए-इस्लामी पाकिस्तान’ची स्वतःच्या सरकारवर टीका

हाफिज नईम

लाहोर (पाकिस्तान) – ‘जमात-ए-इस्लामी पाकिस्तान’चा प्रमुख हाफिज नईम याने लाहोरमधील एका कार्यक्रमात भारताबद्दल मोठा दावा केला आहे. नईम म्हणाला, ‘‘पाकिस्तानसाठी ही लज्जास्पद गोष्ट आहे की, भारत आणि त्याची गुप्तचर संस्था ‘रॉ’ (रिसर्च अँड अ‍ॅनिलिसेस विंग – संशोधन आणि विश्‍लेषण शाखा) यांनी गेल्या काही वर्षांत पाकिस्तानमध्ये अनेक नागरिकांना मारले आहे. हे आपल्या स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व यांवर आक्रमण आहे; पण पाकिस्तान सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही.’’ या वेळी नईम यांनी पाकिस्तानच्या माजी सैन्यदलप्रमुखांनी भारतासमवेत एक गुप्त करार केल्याचा दावाही केला.

(म्हणे) ‘काश्मीर ही पाकिस्तानच्या गळ्याची नस असल्याने आम्ही ते हिंदूंच्या हातात देऊ शकत नाही !’

काश्मीर ही पाकिस्तानच्या गळ्याची नस आहे आणि आम्ही ते हिंदूंच्या हातात राहू देऊ शकत नाही, असे विधानही हाफिज याने केले. (गेले ७८ वर्षे काश्मीर भारताच्या हातात आहे आणि पाक ते घेऊ शकलेले नाही आणि पुढेही घेऊ शकणार नाही, ही वस्तूस्थिती त्याने लक्षात ठेवावी ! – संपादक)

(म्हणे) ‘काश्मीरवर भारताशी चर्चा व्हावी !’ – पंतप्रधान शाहबाज शरीफ

पंतप्रधान शाहबाज शरीफ

आम्हाला वाटते की, काश्मीरसह सर्व प्रश्‍न चर्चेद्वारे सोडवले जावेत. भारताने ५ ऑगस्ट २०१९ (भारताने काश्मीरला लागू केलेले ३७० कलम रहित करण्याच्या) मानसिकतेतून बाहेर पडून संयुक्त राष्ट्रांना दिलेली आश्‍वासने पूर्ण करावीत आणि चर्चा चालू करावी, असे आवाहन पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केले.

ते पुढे म्हणाले की,

शस्त्रास्त्रे जमा केल्याने शांतता येणार नाही आणि या प्रदेशातील लोकांचे भवितव्य पालटणार नाही. पाकिस्तान आणि भारत यांसाठी संवाद हाच एकमेव मार्ग आहे. (इतक्या वर्षांत संवाद म्हणजे भारताने पाक समोर रडगाणे गायचे आणि पाकने भारतासमवेत युद्ध करायचे अन् यात पराभूत झाल्यावर जिहादी आतंकवादी कारवाया करायच्या, असे चालू होते. हे भारताने आता थांबवले असून भविष्यात पाक नावाचा देशही संपवणे भारताचे ध्येय असणार आहे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

याचे कारण आता काळ पालटला आहे. आता भारत गांधीगिरी करत नसून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांनुसार वागत आहे. भविष्यात जगाच्या नकाशावरून पाकचे अस्तित्वच नष्ट करणे, हे भारताचे अंतिम लक्ष्य असणार आहे !