History Cannot Be Wiped Out : शेख हसीना यांच्या वडिलांच्या घराची तोडफोड, तर चुलत भावांची घरे पाडली !

बांगलादेशात पुन्हा हिंसाचार

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशात ५ फेब्रुवारीच्या रात्री पुन्हा मोठा हिंसाचार झाला. माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे वडील आणि बांगलादेशाचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांच्या ढाक्यातील ‘धनमोंडी-३२’ येथील निवासस्थानी आक्रमण करून प्रचंड तोडफोड करण्यात आली. आक्रमणाच्या वेळी सुरक्षादलही तिथे उपस्थित होते; मात्र ते ही घटना थांबवू शकले नाही. याच वेळी खुलना शहरामध्ये शेख हसीना यांचे चुलत भाऊ शेख सोहेल आणि शेख जेवेल यांची घरे बुलडोझरने पाडण्यात आली. शेख हसीना यांचे काका ऑगस्टमध्ये देश सोडून पळून गेले. त्यांच्या घरी रात्री ९ वाजता तोडफोड झाली. विद्यार्थी चळवळीच्या नेत्यांनी महानगरपालिकेचे २ बुलडोझर बोलावले आणि त्यांचे घर पाडले.

१. शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाने त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना ६ फेब्रुवारी या दिवशी रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले होते. शेख हसीना यांच्यावर प्रविष्ट (दाखल) केलेल्या खटल्यांच्या आणि अल्पसंख्यांकांवर होणार्‍या आक्रमणांच्या निषेधार्थ पक्षाने मोर्चाचे आवाहन केले होते. शेख हसीना रात्री ९ वाजता त्यांच्या समर्थकांना ऑनलाईन मार्गदर्शन करणार होत्या. त्यापूर्वी ‘२४ रिव्होल्यूशनरी स्टुडंट-जनता’ नावाच्या विद्यार्थी संघटनेने याच्या निषेधार्थ रात्री ९ वाजता ‘बुलडोझर फेरी’ काढण्याची घोषणा केली होती. शेख हसीना यांच्या वडिलांचे घर पाडले जाईल, असे सांगण्यात आले होते.

२. १५ ऑगस्ट १९७५ या दिवशी या घरात ‘बंगबंधू’, त्यांची पत्नी, मुलगा, सून आणि अनेक नातेवाईक यांची हत्या करण्यात आली होती. यानंतर घराचे स्मारक संग्रहालयात रूपांतर करण्यात आले. यापूर्वी ५ ऑगस्ट २०२४ या दिवशी शेख हसीना देश सोडून गेल्यानंतर या घरावर जमावाने आक्रमण केले होते. त्याची तोडफोड करून आग लावण्यात आली. तेव्हापासून हे घर ओसाड पडले होते.

तुम्ही घर पाडू शकता; पण इतिहास पुसून टाकू शकत नाही ! – शेख हसीना

शेख हसीना

आम्ही बहिणी (शेख हसीना या त्यांची धाकटी बहीण शेख रेहाना यांच्यासमवेत भारतात आल्या होत्या) धनमोंडीच्या त्या आठवणींसाठी जगतो, आता आंदोलक ते घर उद्ध्वस्त करत आहेत. मागच्या वेळी त्यांनी या घराला आग लावली होती आणि आता घर पाडत आहेत. ते हे घर पाडू शकतात, पण इतिहास पुसण्यात ते यशस्वी होणार नाहीत, असे विधान शेख हसीना यांनी घरावरील झालेल्या आक्रमणावरून केले. त्या त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना ऑनलाईन मार्गदर्शन करतांना बोलत होत्या.
हसीना पुढे म्हणाल्या की, महंमद युनूस आणि त्यांच्या सरकारने मला अन् माझ्या बहिणीला मारण्याचा प्रयत्न केला. जर अल्लाने मला या आक्रमणानंतरही जिवंत ठेवले असेल, तर मी नक्कीच काहीतरी मोठे केले असेल. जर हे घडले नसते, तर मी इतक्या वेळा मृत्यूला कसे हरवू शकले असते ? मी बांगलादेशाच्या लोकांकडून न्यायाची मागणी करते. मी माझ्या देशासाठी काहीच केले नाही का ? मग इतका अपमान का ?