Nurse Use Fevikwik Instead Of Stitches : ७ वर्षांच्या मुलाच्या जखमेवर टाके घालण्याऐवजी परिचारिकेने लावले फेविक्विक  !

हानगल (कर्नाटक) येथील सरकारी रुग्णालयातील घटना

(फेविक्विक हा एक द्रव पदार्थ असून तो दोन गोष्टींना जोडण्यासाठी वापरला जातो.)

हावेरी (कर्नाटक) – येथील सरकारी रुग्णालयातील एका परिचारिकेने एका अल्पवयीन मुलाच्या जखमेवर टाके घालण्याऐवजी ‘फेविक्विक’चा वापर केल्याची घटना १४ जानेवारीला घडल्याचे आता समोर आले आहे. यानंतर या परिचारिकेला निलंबित करण्यात आले आहे.

१. हानगल तालुक्यातील अडूर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ही घटना घडली. ७ वर्षांच्या गुरुकिशन अन्नप्पा होसमणी याच्या गालावर खोल जखम झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्रावर होत असल्याने त्याचे पालक त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन गेले होते. या वेळी परिचारिकेने सांगितले की, टाके घातल्यास त्याचे व्रण अनेक वर्षे रहातात त्यापेक्षा फेविक्विक वापरणे चांगले आहे.

२. पालकांनी तक्रार केल्यावर या परिचारिकेचे अन्यत्र स्थानांतर करण्यात आले होते; मात्र त्याविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केल्यावर राज्य सचिवांनी तिला निलंबित केले.