मिरज (जिल्हा सांगली) येथील मनोविकार तज्ञ डॉ. अरुण रुकडीकर आणि त्यांच्या पत्नी डॉ. मेरी रुकडीकर लिखित ‘मानसिक आजार, आरोग्य आणि आपण’, हे पुस्तक अलिकडेच ‘एकलव्य फाऊंडेशन’च्या व्यासपिठावरून डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते पुणे येथे प्रकाशित करण्यात आले. हे पुस्तक म्हणजे लेखकद्वयाच्या ‘मेंटल डिसऑर्डर अँड यू’ या इंग्रजी पुस्तकाच्या दुसर्या आवृत्तीचे मराठी भाषांतर आहे.
‘मनोविकार तज्ञ’ या नात्याने रुकडीकर दांपत्याने मिरज येथील प्रसिद्ध ‘वानलेस रुग्णालया’त दीर्घकाळ, तसेच अन्यत्र रुग्णसेवा केली. ५० हून अधिक वर्षे रुग्णसेवा करतांना त्यांनी मानसिक आजार म्हणजे काय ? हे रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी यांनाही नेमके समजावे; या रुग्णाकडे, तसेच या आजारावरील उपचारांकडे इतरांचा पहाण्याचा दृष्टीकोन पालटून तो सकारात्मक व्हावा, यांसाठी अथक प्रयत्न केले. त्यांच्याकडून माझ्यासारख्या अनेक वैद्यकीय विद्यार्थ्यांना कुणाही रुग्णाकडे विशेषकरून मानसिक आजाराने पीडितांकडे किती समजूतदारपणे, करुणेने पहायला हवे, याचा चालता बोलता वस्तूपाठ मिळाला.

१. प्रत्यक्ष उदाहरणे देऊन विषय सोपा करण्याचा प्रयत्न
सकृतदर्शनी ‘मानसिक आजार’ ही एकच संज्ञा असली, तरी त्याचे अनेक प्रकार असून त्यातील प्रत्येक आजाराची लक्षणे आणि त्यावरील उपचार भिन्न असतात. या पुस्तकात ‘क्सिझोफ्रेनिया’, ‘भावस्थितीचे आजार (मूड डिसोर्डर)’, ‘ताणतणावांशी निगडित विकार’ ‘व्यसनाधीनतेशी संबंधित आजार’, ‘अपस्मार’,’ गर्भधारणेशी निगडित मानसिक आजार’, यांसह अन्य मानसिक आजारांची लक्षणे, त्यावरील उपचारपद्धत यांविषयी यथास्थित माहितीसह बर्याच ठिकाणी विषय समजणे सोपे व्हावे, यासंबंधाने त्यांच्याकडे आलेल्या रुग्णांची उदाहरणे दिलेली आहेत.
२. मानसिक आजार, प्रबोधन आणि शासकीय सुविधा यांविषयी सविस्तर माहिती देणारे पुस्तक !
बर्याचदा मानसिक आजार ही दीर्घकालीन समस्या असल्याने त्या संदर्भात किमान रुग्ण आणि त्याच्याशी संबंधित नातेवाईक यांचे योग्य प्रबोधन झाले, तरच त्या दोघांना योग्य तो लाभ मिळून रुग्ण अन् त्याचे कुटुंब एक सकारात्मक जीवन जगू शकते. हे घडून येण्यासाठी लेखकांनी आपल्या व्यावसायिक जीवनात अनेक प्रकारे प्रयत्न केले, याविषयीची माहिती पुस्तकात आहे. बालवयातील आाणि पौगंडावस्थेतील मुलांच्या मानसिक समस्यांविषयी यांत स्वतंत्र प्रकरण आहे. मानसिक अपंगत्व आलेल्या रुग्णांचे कल्याण आणि पुनर्वसन यांसाठी स्वतंत्र प्रकरण आहे. यांत मानसिक रुग्णांसाठी अपंगत्वासंबंधीचे प्रमाणपत्र मिळणे, करसवलती, प्रवास सवलती, अन्य सरकारी सुविधा आणि पुनर्वसनासाठीचे मार्ग यांसारख्या गोष्टींची माहिती आहे. भारतातील ‘मेंटल हेल्थ ॲक्ट’, म्हणजे ‘मानसिक आरोग्य कायदा’ याविषयीही स्वतंत्र प्रकरण असून ते बेळगाव (कर्नाटक) येथील ‘के.एल्.इ. वैद्यकीय महाविद्यालया’तील सन्माननीय प्राध्यापक डॉ. नानासाहेब पाटील यांनी लिहिले आहे.
३. ‘मानसिक आजार’ या विषयावर मराठीतील पहिलेच शास्त्रीय पुस्तक !
एकूण हे पुस्तक रुग्ण, त्यांचे नातेवाइक, मानसिक आरोग्यविषयक क्षेत्रात कार्यरत व्यक्ती यांच्यासाठी उपयुक्त आहे. चांगल्या दर्जाच्या कागदावर, तसेच योग्य वाचनीय आकाराच्या फाँटमधील ९०० पृष्ठसंख्येच्या या पुस्तकात मूलत: या विषयाचे काठिण्य पहाता सुलभ शब्दयोजना, वाक्यरचना, तक्ते, प्रसिद्ध व्यक्तींची वचने, विविध चित्रे, ठळक केलेली सूत्रे आदींच्या आधारे विषय मांडण्यात आल्याने त्याचे वाचन, तसेच त्यातून आकलन होणे हे सोपे जाते. अभिजात (समृद्ध) भाषेचा दर्जा मिळालेल्या मराठीच्या दालनात ‘मानसिक आजार’ अशा वेगळ्या विषयावरील आणि तेही प्रदीर्घ अनुभवसिद्ध व्यक्तीने लिहिलेले पहिलेच शास्त्रीय पुस्तक असावे, म्हणून त्याचे विशेष स्वागत ! हे पुस्तक ‘ॲमेझॉन’च्या संकेतस्थळावर (https://amzn.in/d/0B8cUmB) उपलब्ध आहे.
– आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत, एम्.डी. (मेडिसीन), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.२.२०२५)