Microplastics In Human Brain : मेंदूत जमा होत आहे प्लास्टिकचा थर – संशोधनातून धक्कादायक माहिती उघड !

लंडन – आपल्या पृथ्वीभोवती ‘मायक्रोप्लास्टिक’ची उपस्थिती आता नवीन राहिलेली नाही. ते हवा, पाणी, अन्न आणि आपल्या शरिराच्या विविध भागांपर्यंत पोचले आहे. अलीकडेच झालेल्या एका संशोधनातून समोर आले आहे की, हे ‘मायक्रोप्लास्टिक’चे कण आपल्या मेंदूत वेगाने जमा होत आहेत. यामुळे मज्जासंस्थेच्या आजारांचा धोका वाढू शकतो. ‘नेचर मेडिसिन’ या वैद्यकीय नियतकालिकामध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासानुसार वर्ष २०१६ ते २०२४ या कालावधीत मानवी मेंदूमध्ये ‘मायक्रोप्लास्टिक’चे प्रमाण ५० टक्के वाढले आहे. या संशोधनाच्या अंतर्गत २४ मृत लोकांच्या मेंदूची चाचणी घेण्यात आली. संशोधकांना असे आढळून आले की, प्रत्येक मेंदूमध्ये सरासरी ७ ग्रॅम ‘मायक्रोप्लास्टिक’असते.

१. या अभ्यासाचे प्रमुख शास्त्रज्ञ मॅथ्यू कॅम्पेन म्हणाले की, आपल्या मेंदूत इतक्या मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आढळणे हे आपल्या आरोग्यासाठी खूप चिंताजनक आहे.

२. संशोधकांनी डिमेंशियाने ग्रस्त असलेल्या १२ रुग्णांच्या मेंदूचे विश्‍लेेषण केले तेव्हा त्यांच्यामध्ये इतर व्यक्तींपेक्षा ५ पट अधिक  ‘मायक्रोप्लास्टिक’ असल्याचे आढळून आले. ‘मायक्रोप्लास्टिक’चा अल्झायमर आणि पार्किन्सन यांसारखे रोग होण्यामागे संबंध असू शकतो’, अशी भीती निर्माण झाली आहे की,

३. शास्त्रज्ञांचा असा विश्‍वास आहे की, ‘मायक्रोप्लास्टिक’  अन्न आणि पाणी यांद्वारे मनुष्याच्या शरिरात प्रवेश करत आहे. यामध्ये असे आढळून आले की, पॉलीथिलीन (जे बाटल्या आणि प्लास्टिक कप यामध्ये वापरले जाते) मेंदूमध्ये सर्वांत अधिक प्रमाणात जमा होत आहे.

मायक्रोप्लास्टिक’पासून होणारे हानीकारक परिणाम

१. शरिरातील पेशींना हानी पोचवणे आणि जळजळ निर्माण करणे

२. मेंदूच्या कार्यात अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे स्मरणशक्ती आणि विचार करण्याची क्षमता बिघडू शकते.

३. हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि कर्करोग यांसारख्या आजारांचा धोका वाढतो

मायक्रोप्लास्टिक’चा प्रभाव कसा कमी करायचा?

१. प्लास्टिकच्या डब्यात अन्न साठवण्याऐवजी काचेच्या किंवा धातूच्या भांड्यांचा वापर करा

२. प्लास्टिकच्या बाटल्यांमधील पाणी पिण्याऐवजी फिल्टर केलेले पाणी वापरा

३. घरात उच्चदर्जाचे ‘एअर फिल्टर’ आणि धूळमुक्त वातावरण ठेवा

४. प्रक्रिया केलेले अन्न खाणे टाळा; कारण त्यात ‘मायक्रोप्लास्टिक’चे प्रमाण अधिक असते

संपादकीय भूमिका

प्लास्टिकमुळे निर्माण होणारे धोके सर्वज्ञात आहे; मात्र जागतिक पातळीवर त्यावर बंदी घालून त्याला पर्याय देण्याविषयी कुठल्याच देशाचे सरकार पुढे येत नाही, हे चिंताजनक आहे !