मुंबई महापालिकेचा ७४ सहस्र कोटींचा अर्थसंकल्प सादर !

इयत्ता १० वी पर्यंत विनामूल्य शिक्षण, ३२ सहस्र घरे बांधणार आणि राणीच्या बागेत विदेशी प्राण्यांची भर

मुंबई – देशातील सर्वांत श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी ४ फेब्रुवारी या दिवशी सादर केला. या बजेटमध्ये ७४ सहस्र ४२७.४१ कोटींचे प्रावधान करण्यात आले आहे. मुंबई महापालिका बजेटमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. आतापर्यंतचा हा सर्वांत मोठा अर्थसंकल्प असून १४.१९ टक्के वाढ झालेली आहे. यामध्ये मुंबईकरासांठी अनेक महत्त्वाची प्रावधाने करण्यात आली असून आरोग्य विषयक सोयीसुविधांसाठी ७ सहस्र कोटींचे, शिक्षण सुविधांसाठी ४ सहस्र कोटींचे प्रावधान करण्यात आले आहे.

अर्थसंकल्पातील काही सूत्रे

१. प्रीमियम एफ्.एस्.आय. शुल्कापैकी ५० टक्के वाटा महापालिकेस ३०० कोटी अपेक्षित

२. झोपडपट्टीतील व्यावसायिक आस्थापनावर मालमत्ता कर आकारणी होणार

३. ‘प्रधानमंत्री सूर्य घर मुफ्त बिजली योजना सोलर पॅनल’ महापालिकेच्या मालमत्तांसाठी राबवणार

४. आजतागायत १ सहस्र ३३३ किमी रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण पूर्ण, या वर्षी ६९८ रस्त्यांचे काम प्रगतीपथावर, तसेच फेज २ मध्ये १४२० रस्त्यांचे काम अंतर्भूत !

५. महामार्गालगत वाहनतळ उभारणार आणि ‘डिजिटल पार्किंग ॲप’द्वारे वाहनतळ आरक्षण होणार, दक्षिण मुंबईत बहुस्तरीय यांत्रिकी वाहनतळ (रोबोटिक पार्किंग) !

६. मरीन ड्राईव्ह सागरी किनारा मार्ग पहिला टप्प्यातील मरीन ड्राईव्ह ते वांद्रे ९५ टक्के काम पूर्ण. सागरी किनारा मार्ग दुसरा टप्प्यात वांद्रे-वर्सोवा-दहिसर-भाईंदर काम प्रगतीपथावर !

७. मलजल प्रक्रिया केंद्रांचे काम प्रगतीपथावर !

८. रुग्णालयांचा पुनर्विकासातून मुंबईत ३ सहस्र ५१५ अतिरिक्त खाटा उपलब्ध होणार

९. अतिरिक्त २५ ‘आपला दवाखाना’ चालू होणार !

१०. नायर येथे कॅन्सर रुग्णालयाचे काम चालू !

११. मुंबईतील पालिकेच्या विविध वॉर्ड मध्ये सी.बी.एस्.ई. बोर्डाच्या ४ शाळा उभारणार येणार.

१२. बेस्टला १ सहस्र कोटी अर्थसाहाय्य

१३. राणीच्या बागेत जिराफ, झेब्रा, पांढरा सिंह, जॅग्वार हे विदेशी प्राणी आणणार