पुणे – महापालिकेचा मिळकतकर थकवलेल्या मिळकतींवर महापालिका प्रशासन आता जप्तीची कारवाई करणार आहे. प्रतिदिन अनुमाने १० कोटी रुपयांपर्यंतचा मिळकतकर वसुली करण्याच्या सूचना अधिकार्यांना दिल्या आहेत. यंदा समाविष्ट गावांमधील मिळकतींचा मिळकतकर आणि दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी राज्य सरकारने स्थगिती दिल्याने कर आकारणी विभागाच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
महापालिका प्रशासनाच्या करआकारणी आणि संकलन विभागाने वर्ष २०२४-२५ साठी समाविष्ट ३४ गावांसह २८०० कोटी रुपयांचा मिळकतकर जमवण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यांपैकी २००० कोटी रुपयांचा मिळकतकर विभागाने गोळा केल्याची माहिती विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी दिली. उर्वरित मिळकतकर गोळा करण्यासंदर्भात जगताप यांनी अधिकार्यांना सूचना दिल्या असून अधिकार्यांना थकबाकी असणार्या किमान १० मिळकतींवर प्रतिदिन कारवाई करण्यास सांगितले आहे. मिळकतींवर जप्ती, तसेच लिलावाचीही कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पुढील ६० दिवसांत ६०० कोटी रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी मिळकतकर विभाग प्रयत्नरत असेल. यासाठी कर्मचार्यांच्या सुट्ट्या ही रहित केल्या आहेत. शहरातील सिंहगड शैक्षणिक संस्थेकडे असलेल्या १८ कोटी रुपये मिळकतकराची थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिका प्रशासन सिंहगड संस्थेच्या मिळकतींचा लिलाव करील, असेही जगताप यांनी सांगितले.
संपादकीय भूमिका :ही वेळ का येते ? त्या त्या वेळी करआकारणी पूर्ण करण्याचे ध्येय महापालिका का ठेवत नाही ? |