
१. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी सूक्ष्मातून पुढे येणार्या आपत्तीविषयी जाणून घेऊन कांचीपूरम् येथील ‘गुरुनिवास’ या वास्तूतील वास्तूशांत करण्याचा दिवस ठरवणे आणि तशी सिद्धताही चालू करणे
‘कांचीपूरम् येथे ‘गुरुनिवास’ या वास्तूचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आम्ही वास्तूशांत करण्याचा मुहूर्त ठरवला. पुरोहितांनी वास्तूशांत करण्यासाठी २९.११.२०२४ किंवा ५.१२.२०२४ असे २ दिवस सांगितले. मी श्री. बालाजीअण्णांना सांगितले, ‘‘आपण २९ नोव्हेंबरला वास्तूशांत करूया.’’ (श्री. बालाजीअण्णांनी २ माळ्यांचे घर बांधले आहे. त्यातील पहिल्या माळ्यावरची जागा त्यांनी साधकांना रहाण्यासाठी दिली आहे.) तेव्हा माझ्या मनात ‘पुढे पाऊस येईल आणि गृहप्रवेश समारंभासाठी येणारे पाहुणे अन् साधक यांना अडथळे येतील’, असा विचार आला आणि तो विचार मी श्री. बालाजीअण्णांना सांगितला. आम्ही २९ नोव्हेंबर या दिवशीच वास्तूशांत करण्याचे ठरवले आणि तशी सिद्धताही चालू केली.
२. वास्तूशांतीच्या दिवशी ‘वादळ येण्याची शक्यता आहे’, असे वृत्त ऐकून सर्वांनाच प्रश्न पडणे

त्यापूर्वी ‘२९ नोव्हेंबर या दिवशी मोठे वादळ येण्याची शक्यता आहे. हे वादळ बंगालच्या उपसागराकडून येणार आहे’, असे वृत्त आमच्या कानावर येत होते. ‘आता काय करायचे ?’, असा प्रश्न सर्वांच्याच मनात आला. तोपर्यंत सर्वांनाच वास्तूशांतीची निमंत्रणे गेली होती. श्री. बालाजीअण्णा यांच्याकडून एकूण १७५ माणसे येणार होती.
३. गुरुदेवांच्या कृपेमुळे कार्यक्रम कुठलाही अडथळा न येता पार पडणे आणि त्यानंतर जोरात वादळी पाऊस चालू होणे
आम्ही सर्वकाही गुरुदेवांवर (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर) सोपवले आणि काय आश्चर्य ! त्या दिवशी सकाळी केवळ वास्तूशांतीच्या होमाच्या वेळी आशीर्वाद म्हणून पाऊस पडला. नंतर मात्र सर्व कार्यक्रम ठरल्या वेळेत आणि कुठलाही अडथळा न येता पार पडला; मात्र सर्व पाहुणे घरी व्यवस्थित पोचल्यानंतर पुष्कळ जोरात वादळी पाऊस चालू झाला.
४. पाहुण्यांनीही गुरुदेवांच्या सामर्थ्याची अनुभूती घेणे आणि त्यांनी गुरुदेव अन् वास्तू यांची प्रशंसा करणे
गुरुदेवांनी आम्हा सर्वांचीच काळजी घेतली. सर्व पाहुण्यांनीही गुरुदेवांच्या सामर्थ्याची अनुभूती घेतली. सर्व जण म्हणत होते, ‘‘ही वास्तू खरोखरच दैवी आहे. गुरुदेवांची तुम्हा सर्वांवर कृपा आहे.’’ काही जण म्हणत होते, ‘येथे आम्हाला काही वेगळेच जाणवते. येथे वेगळीच शांती आहे. येथे प्रसन्न वाटते.’’
५. ‘पंचमहाभूते गुरूंचे सर्व ऐकतात’, याचीच अनुभूती घेतली’, असे श्री. बालाजीअण्णांनी सांगणे
खरेच, एवढे मोठे वादळ परतवण्याचे सामर्थ्य केवळ गुरुदेवांमध्येच आहे. गुरुदेवांचे पंचमहाभूतांवर आधिपत्य असल्याचीच प्रचीती आम्हाला यातून आली. श्री. बालाजीअण्णांनी याविषयी चांगल्या प्रकारे सांगितले. ते म्हणाले, ‘‘पंचमहाभूते गुरूंचे सर्व ऐकतात !’, याचीच मी अनुभूती घेतली.’’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, तिरुवण्णामलई, तमिळनाडू. (१४.१२.२०२४)
|