पुणे – बनावट कागदपत्रांचा वापर, तसेच बनावट जामीनदार न्यायालयात उपस्थित करून सराईत गुन्हेगारांना जामीन मिळवून देणार्या टोळीला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. बनावट जामीनदारांच्या टोळीला साहाय्य करणार्या अधिवक्ता अस्लम सय्यद आणि अधिवक्ता सुरेश जाधव या २ अधिवक्त्यांसह ११ जणांना अटक करण्यात आली आहे. (आरोपी अधिवक्त्यांची सनद जप्त करायला हवी ! – संपादक) मुख्य आरोपी फरहान उपाख्य बबलू शेख पसार झाला आहे, अशी माहिती परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
१. येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींना जामीनदार उपलब्ध होत नसल्याने आरोपींनी अधिवक्त्यांशी संगमनत करून बनावट जामीनदार न्यायालयात सादर केले. बनावट जामीनदार गुन्हेगारांच्या नातेवाइकांशी संपर्क साधून त्यांच्याकडून पैसे घ्यायचे.
२. ही टोळी आधारकार्ड, शिधापत्रिका, सातबारा उतारे, तसेच संबंधित कागदपत्रे सादर करायची. शिधापत्रिकेवर बनावट स्वाक्षरी आणि शिक्के यांचा वापर करायची. न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून कागदपत्रे मूळ असल्याचे भासवायचे. न्यायालयाची दिशाभूल करून आरोपी गुन्हेगारांना जामीन मिळवून द्यायचे. बनावट जामीनदार मुंबई, ठाणे, ग्रामीण भागातील असल्याचे उघडकीस आले आहे.
३. बनावट जामीनदार उभे केल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलीस आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्वेषण करण्यात आले. बनावट जामीनदारांची २४ प्रकरणे उघडकीस आली आहेत.
संपादकीय भूमिकान्यायालयाची दिशाभूल करणार्यांना आजन्म कारावासाची शिक्षा व्हायला हवी ! या टोळीने अशा प्रकारे आणखी किती जणांची फसवणूक केली आहे, याचा शोध घ्यायला हवा ! |