परदेशात मराठीचे जतन-संवर्धन करणार्‍या मराठी माणसांच्या संस्थांना आर्थिक साहाय्य देणार ! – उदय सामंत, मराठी भाषा मंत्री

चौथे विश्व मराठी संमेलन नाशिक येथे होणार ! – मंत्री सामंत यांची घोषणा

मराठी भाषा मंत्री, उदय सामंत

पुणे – शासनाचे कोणतेही आर्थिक साहाय्य न घेता परदेशात मराठी माणसे मराठीचे संवर्धन आणि जतन करत आहेत. त्यांच्या कार्याची नोंद घेऊन मराठीचे काम करणार्‍या परदेशातील संस्थांच्या मागे राज्यशासन आर्थिक सामर्थ्य निश्चितपणे उभे करेल, अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली. पुढील वर्षात होणारे चौथे विश्व मराठी संमेलन हे नाशिक येथे आयोजित करण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी या वेळी केली. फर्ग्युसन महाविद्यालय येथे आयोजित तिसर्‍या विश्व मराठी संमेलनाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. व्यासपिठावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, अभिनेते सयाजी शिंदे, रितेश देशमुख, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, माजी आमदार उल्हास पवार, पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे आदी उपस्थित होते.

१. मंत्री उदय सामंत पुढे म्हणाले की, मराठी भाषेचा मंत्री असणे यामुळे मी मला भाग्यवान समजतो, अशी भावना व्यक्त करून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी ही २ सहस्र वर्षांपूर्वीची असल्याचे पुरावे केंद्राकडे सादर करण्यासाठी १२ वर्षे लागली; परंतु गतवर्षी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. आता राज्याच्या अर्थसंकल्पात मराठी भाषा विभागाला भरीव प्रावधान करण्यात आले आहे.

२. अभिनेते रितेश देशमुख म्हणाले, ‘‘मराठी घरात जन्म घेणे हेच आपले भाग्य असते. गेल्या १३ वर्षांत केवळ मराठी चित्रपटांचीच निर्मिती केली आहे.’’

३. अभिनेते सयाजी शिंदे म्हणाले, ‘‘माझे आयुष्य पुस्तकातून घडले. दुसर्‍याने सांगून विचार पालटत नसतात. आपण आपल्यापासून आरंभ केल्यावरच पालट होऊ शकतो. आपल्याला इतर कोणत्याही भाषेतील चित्रपटात काम करायचे असल्यास त्यातील संवाद मराठीतच लिहून घेतो आणि बोलतो.’’