मोडीत निघालेल्या ‘मोडी’ची वाढत आहे गोडी..!

१२ व्या शतकापासून चालू झालेली राजदरबारातील ‘मोडी’ लिपी वर्ष १९६० नंतर व्यवहारातूनही मोडीत निघाली; परंतु याच ‘मोडी’ची गोडी पुन्हा एकदा वाढत आहे. रत्नागिरी येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख संचालनालयाच्या वतीने २० ते २९ जानेवारी २०२५ या कालावधीत प्रथमच घेतलेल्या मोडी प्रशिक्षणात ८८ जणांनी सहभाग नोंदवला आहे. 

‘मोडी’ लिपीविषयीच्या पुस्तकाचे मुखपृष्ठ

१. यादवकाळापासून चालू झालेली ‘मोडी’

महाराष्ट्रात सुमारे १२ व्या शतकापासून ‘मोडी’ लिपीला प्रारंभ झाला, असे इतिहासकारांचे मत आहे. श्री. हेमाद्री पंत हे या लिपीचे जनक होते. न मोडता, न थांबता अत्यंत जलद गतीने लफ्फेदारपणे झरझर लिहिल्या जाणार्‍या लिपीस ‘मोडी’ असे म्हणतात. यादवकाळापासून चालू झालेला हा प्रवास शिवकाळात बहरला होता. या लिपीचा सर्रास वापर राजदरबारासमवेतच लोकांच्या दैनंदिन जीवनात २० व्या शतकाच्या शेवटपर्यंत होत असे. महाराष्ट्रातील प्राथमिक शाळेत वर्ष १९६० पर्यंत तिचा समावेश शिक्षणात होता; परंतु छपाईच्या दृष्टीने तिची मर्यादा लक्षात घेऊन काळाच्या ओघात ही मोडी लिपी मोडीत निघाली.

श्री. प्रशांत आनंदराव सातपुते

२. शिव आणि पेशवे कालीन बहुसंख्य कागदपत्रे मोडी लिपीतीलच !

मोडी लिपीचा प्रसार आणि प्रचार शिवकाळात झाला. शिवकाळ किंवा पेशवाईकाळ यामध्ये ज्यांचे अक्षर सुरेख असेल, त्यांना चिटणीस (सचिव) पदावर प्राधान्याने नोकरी दिली जात असे. आजही शिवकाळ आणि पेशवाईकाळ यांतील कागदपत्रे पाहिली, तर  बहुसंख्य कागदपत्रे ही मोडी लिपीतूनच असल्याचे दिसून येते. आजही खासगी संस्था, शासकीय-निमशासकीय कार्यालये विशेषत: जिल्हाधिकारी कार्यालये, तहसीलदार कार्यालये, भूमीअभिलेख कार्यालये, नगरपालिका या ठिकाणी जुने दस्ताऐवज (कागदपत्रे) मोडी लिपीत आहेत. जन्म-मृत्यूची नोंद, भूमीची कागदपत्रे यांचा समावेश यात आहे. महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेखागारातील पुणे पुरालेखागाराचे उदाहरण द्यावयाचे झाले, तर या ठिकाणी पेशवे दप्तरातील वर्ष १५९० पासूनचे मोडी लिपीतील अभिलेख ठेवण्यात आलेले आहेत.

बोरू

झरझर उतरणार्‍या मोडीशी बोरूचा फार घनिष्ठ संबंध आहे. १४ व्या शतकापासून लेखणी म्हणून वापरात येणारा हा बोरू वर्ष १९७० पर्यंत प्राथमिक शाळांमध्ये वळणदार अक्षरांसाठी वापरला जात होता. चिव्याच्या झाडांमधीलच एक छोटा गवती प्रकार म्हणजे बोरू ! तसा हा बांबूवर्गीय कुळातीलच ! याच्या खोडाला चाकूसारख्या धारदार शस्त्राने टोक बनवून शाईच्या दौतीत बुडवून वळणदार अक्षर काढले जायचे. विशेषतः मोडीतील सर्व कागदपत्रे या बोरूनेच लिहिलेली आढळतात. कालांतराने शाईचे निबचे पेन आले; पण, बोरूचा नाजूकपणा, अक्षरांचे सौंदर्य याच्याशी तुलना होऊच शकत नाही.

– श्री. प्रशांत आनंदराव सातपुते

३. पुणे लेखागारात २७५ वर्र्षांची मोडी लिपीतील कागदपत्रे इतिहास संशोधकांची करत आहेत प्रतीक्षा !

पुणे लेखागाराचे वैशिष्ट्य सांगायचे झाल्यास एका लिपीतील, एका भाषेतील, एका राजवटीतील, एका राज्याचा इतिहास आणि माहिती सांगणारी वर्ष १५९० ते १८६५ पर्यंत, म्हणजे अनुमाने २७५ वर्र्षांची ऐतिहासिक मोडी लिपीतील कागदपत्रे इतिहास संशोधकांची प्रतीक्षा करत आहेत. अशा प्रकारची आणि मोठ्या संख्येची कागदपत्रे अन्यत्र दुसरीकडे कुठेही आढळून येत नाहीत. यासमवेतच कोल्हापूर पुरालेखागार, मुंबई पुरालेखागार या ठिकाणी लाखोंच्या संख्येत मोडी लिपीतील कागदपत्रे जतन करून ठेवण्यात आलेली आहेत; मात्र आजच्या स्थितीत मोडी जाणकार किंवा मोडी लिपीतील अभिलेखांचे वाचन करणारे अत्यंत अल्प असल्याने या अभिलेखाचे वाचन होत नाही.

४. अभिलेखागारातील मोडी कागदपत्रांचे वाचन होण्यासाठी प्रशिक्षणवर्गाचा उपक्रम

भारतीय ऐतिहासिक अभिलेख आयोगाच्या वर्ष १९७९ च्या औरंगाबाद येथील ४६ व्या अधिवेशनात ‘मोडी लिपीच्या संवर्धनासाठी पुराभिलेख संचालनालयाचे महाराष्ट्र शासनाच्या साहाय्याने आवश्यक ती उपाययोजना करावी’, असा ठराव संमत केला होता. त्यानुसार पुराभिलेख संचालनालयाने मोडी लिपी प्रशिक्षणवर्ग चालू करण्याचे निश्चित केले.

अभिलेखागारातील या कागदपत्रांचे वाचन व्हावे, इतिहास संशोधनास प्रोत्साहन मिळावे, यासाठी शासनाच्या पुराभिलेख संचालनालयाने मोडी लिपी प्रशिक्षणवर्गाचा उपक्रम हाती घेतला. तत्कालीन सचिव संजीवनी कुट्टी यांनी या उपक्रमास प्रोत्साहन देण्यासाठी शासनाची मान्यता मिळवून दिली. तत्कालीन सांस्कृतिक कार्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही या उपक्रमास उत्तेजन दिले. मोडीलिपी प्रशिक्षणवर्ग चालू करण्याचे श्रेय हे माजी संचालक डॉ. भास्कर धाटावकर यांना जाते. ३ डिसेंबर २००३ या दिवशी मुंबईमध्ये पहिल्या मोडीलिपी प्रशिक्षणवर्गाचा शुभारंभ झाला.

५. मोडी प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग

राज्यशासनाच्या पुराभिलेख संचालनालयाच्या वतीने मोडीचे प्रशिक्षण देण्यात येत असते. १० दिवसांच्या या प्रशिक्षणानंतर १०० गुणांची लेखी परीक्षा होते. उत्तीर्ण होण्यासाठी कमीत कमी ५० गुणांची आवश्यकता असून उत्तीर्ण होणार्‍या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रही देण्यात येते.

पुणे येथील ‘सी डॅक’च्या वतीने ‘मोडी लिपी शिका’, हे मोबाईल ॲप विकसित करण्यात आले आहे. https://cdac.in/index.aspx?id=lu_modi_script  या ॲपच्या माध्यमातून अत्यंत सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने माहिती दिली आहे.

मोडी प्रशिक्षण घेतलेले काही विद्यार्थी आज स्वत:चे भवितव्य तर अजमावत आहेतच. त्याखेरीज ही भाषा जतन आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीकोनातून प्रचारकाचे कामही उत्तमरित्या पार पाडत आहेत. प्रथमच भरवलेल्या या प्रशिक्षणासाठी मिळालेला प्रतिसाद पाहून, मोडीत निघालेल्या मोडीची पुन्हा एकदा गोडी निर्माण झाली आहे, हे यावरून दिसून येते.

– श्री. प्रशांत आनंदराव सातपुते, जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी.