पणजी, ३ फेब्रुवारी (वार्ता.) – इंटरनेट आणि दूरचित्रवाहिनी सेवा देणार्यांनी वीज खात्याच्या खांबांवर असलेल्या ‘केबल’ पुढील १० दिवसांत काढाव्यात, अशी सूचना वीजखात्याकडून देण्यात आली आहे, अशी माहिती वीज खात्याचे कार्यकारी अभियंता काशीनाथ शेट्ये यांनी दिली आहे. ३ फेब्रुवारी या दिवशी वीज खाते आणि संघटनांचे पदाधिकारी यांच्या झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते.
ते म्हणाले, ‘‘उच्च न्यायालयाच्या २२ जानेवारीच्या आदेशानुसार इंटरनेट आणि दूरचित्रवाहिनी सेवा पुरवठादारांनी वीज खात्याकडे अर्ज करणे आवश्यक होते. नवीन दूरसंचार नियमांनुसार खात्याकडे अर्ज करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर या अर्जांवर खात्याकडून विचार करण्यात येणार होता; परंतु आतापर्यंत खात्याकडे एकही अर्ज आलेला नसल्याने सेवा देणार्यांना ‘केबल’ काढण्याची सूचना देण्यात आली आहे. त्यांनी स्वतःहून जर केबल काढल्या नाहीत, तर त्या खात्याकडून काढल्या जातील. याखेरीज अवैधपणे वीज खात्याच्या मालमत्तेचा वापर केल्याविषयी दंडही केला जाईल. त्यांनी सर्वेक्षण करून वीज खांबांवर केबल लावण्याविषयी प्रमाणपत्र मिळवणे आवश्यक होते. नियमानुसार एका खांबावर केबल घालण्यासाठी वर्षाला ३०० रुपये शुल्क आहे. संपूर्ण गोव्यात असे ३ लाख २० सहस्र खांब आहेत. शुल्क न भरल्याने खात्याचा वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे.’’