उद्यापासून पर्वरीमध्ये पाणीपुरवठा सुरळीत
पणजी, ३ फेब्रुवारी (वार्ता.) – तिलारी धरणाच्या मुख्य कालव्याला २४ जानेवारी या दिवशी साटेली-भेडशी-भोमवाडी येथे कालवा फुटून भगदाड पडल्याने गेले १० दिवस पर्वरी येथे होणारा पाणीपुरवठा बंद आहे. या कालव्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून ३ फेब्रुवारीला पाणी गोव्यात सोडण्यात आले आहे. उद्या, ४ फेब्रुवारीपासून पर्वरी येथील पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पाणी मर्यादित स्वरुपात सोडले असल्याने सोमवारी सांयकाळी ते डिचोली भागात आणि मंगळवारी सायंकाळपर्यंत पर्वरी भागात उपलब्ध होईल. साटेली-भेडशी-भोमवाडी या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून मातीचा भराव टाकून केलेल्या कालव्यात मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. कालवे बांधून ४० वर्षे झाली, तरी हे कालवे पक्क्या स्वरूपात बांधण्याविषयी किंवा पुन्हा दुरुस्त करण्याविषयी लक्ष दिलेले नाही, असा आरोप येथील स्थानिक शेतकर्यांनी केला आहे. तिलारी धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यांची कामे गोवा राज्यात अतिशय चांगल्या दर्जाची आहेत; मात्र महाराष्ट्रात कामाचा दर्जा चांगला राखला जात नसल्याने याचे गंभीर परिणाम शेतकर्यांना भोगावे लागत आहेत. कालवा फुटल्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत, जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, मुख्य अभियंता प्रमोद बदामी आणि इतर अधिकार्यांनी तातडीने जाऊन कालव्याची पहाणी केली होती.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार ! – मुख्यमंत्री प्रमोद सावंत
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कालवा फुटल्याच्या प्रश्नावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन महाराष्ट्राच्या हद्दीतील कालव्यांचे काम दर्जेदार व्हावे आणि पाणीपुरवठा सुरळीत करावा, यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सांगितले.