प्रयागराज कुंभपर्व २०२५
१. अमृत स्नानासाठी शासनाची चांगली सिद्धता !
वसंतपंचमीच्या अमृत स्नानाच्या वेळी पोलीस आणि प्रशासन यांची चांगली सिद्धता केल्याचे लक्षात आले. या वेळी प्रशासनाकडून कोणते पांटून पूल बंद आहेत ? आणि कोणते चालू आहेत ?, याची माहिती प्रसारमाध्यमांतून देण्यात आली. प्रशासनाकडून आदल्या दिवशीपासून ‘स्नानासाठी सर्व घाटांवर जावे, सर्व कुंभक्षेत्रच त्रिवेणी संगम असल्याने संगम नोजवर गर्दी करू नये’, अशा सूचना केंद्रीय उद्घोषणा केंद्रातून देण्यात आल्या होत्या. त्यामुळे गंगानदीच्या घाटांवरच भाविकांनी स्नान केले. बॅरिकेडींग कधी काढण्यात येतील, गर्दी केल्यास पूल बंद करावे लागतील, अशाही सूचना देण्यात येत होत्या. त्याचा गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी चांगला परिणाम झाला.

२. दुचाकी वाहतूक चालू ठेवल्यामुळे लोकांची गैरसोय टळली !
चौकाचौकात लावलेल्या मोठ्या स्क्रीनवर अरैल येथे कोणत्या पुलावरून जावे ?, झुंसी येथे कोणत्या पुलावरून जावे ?, आदी माहिती दिली जात होती. त्यामुळे भाविकांना वाहतूक कशी आहे ? हे लक्षात येत होते. त्यामुळे एरव्ही जाणवणारी प्रचंड गर्दी जाणवली नाही. दुचाकी वाहतूक चालू ठेवल्यामुळे लोकांना नदीपार करून संबंधित सेक्टरमध्ये जाणे सुलभ झाले.
३. लेटे हनुमान मंदिराच्या केवळ कळसाचे दर्शन घेण्याचे पोलिसांचे आवाहन !
कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेले लेटे हनुमान मंदिरात दर्शनासाठी प्रचंड गर्दी असते. आज अमृत स्नानाच्यावेळी गर्दी होऊ नये म्हणून लेटे हनुमान मंदिर बंद ठेवण्यात आले होते. भाविकांनी कळसाचे दर्शन घेतल्यास त्यांना देवदर्शनाचा लाभ होईल हे उद्घोषणेद्वारे वारंवार सांगण्यात येत होते.
मान्यवरांच्या प्रतिक्रिया
१. महाकुंभ विश्वासाठी आध्यात्मिक प्रेरणेचा स्रोत ! – मुख्यमंत्री योगी

वसंतपंचमी या पवित्र तिथीला महाकुंभपर्वात अमृतस्नान करणारे साधु-संत, धर्माचार्य यांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वंदन केले, तसेच कल्पवासी आणि सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या. योगी पुढे म्हणाले, ‘‘महाकुंभ केवळ भारतासाठी नव्हे, तर पुर्ण विश्वासाठी आध्यात्मिक प्रेरणेचा स्रोत आहे.’’
२. सनातन धर्म जपान आणि विश्वात परत आणणार ! – महामंडलेश्वर राजेश्वरी
निर्मोही अग्नी आखाड्याच्या महामंडलेश्वर रोजश्वरी म्हणाल्या, ‘‘मी जपानमधून आले आहे. आखाड्यासमवेत अमृतस्नान करणे, ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. अमृतस्नानानंतर आम्ही शिष्यांसमवेत येथे साधना करू. सनातन धर्म जापान आणि विश्वात परत आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.’’